घर कुठलंही असो, सकाळी साडे आठ- नऊची वेळ
तव्यावरच्या पोळीला, कुणी बाई लावत असते तेल ।
ओट्यामागच्या खिडकीतून येत असतो सूर्यप्रकाश
पोळ्या लाटून भाजायचं काम, चालू असतं सावकाश ।
ज्याला कधीच 'पोळत' नाही, अशा गोल 'पोळ'पाटावर
भाजली जाणारी प्रत्येक पोळी, लाटली जाते काठावर ।
एखादी पोर जशी वाढते, बापाच्या अंगा-खांद्यावर खेळत
तशीच पोळी गोल होते, पोळपाटावर लोळत ।
सासरी जाताना, लेक रडते बापाच्या गळ्यात पडून
तशीच कधी राहते पोळी, पोळपाटावर अडून ।
तरी जावंच लागतं पोरीला, बापाचं घर सोडून,
पोळीलाही तव्यावर ठेवतात, उचलून अगर तोडून ।
तव्यासारखा तापट नवरा, शेगडीसारखी सासू
तरी फुलायचं आनंदानं, लपवायचे आसू ।
असंच करते पोळी, अन् पोळली जाते, भाजली जाते
तोडून, चावून चवीने मग, जेवणामध्ये खाल्ली जाते ।
ती पोळ्या करणारी बाईसुद्धा पोळीच असते खरोखर
पोळले जातात तिचेही हात, पोळीच्याचबरोबर ।
पूर्वी काय, आत्ता काय, चूल तीच, शेगडी तीच
पोळून काढते सगळीकडून अशी त्यातली आग तीच ।
पण ती बाई रडते का? - रडत नाही, काम करते,हसत असते
ओट्यामागच्या खिडकीबाहेर, मोगऱ्याची वेल बघत असते ।
पोळ्या लाटताना होणारा बांगड्यांचा आवाज असतो सोबत
तुटूनसुद्धा तृप्ती द्यायला बाई असते राबत ।
मग ती पगारी बाई असो,
आजी किंवा आई असो
पोळ्या करणारी बाई घेऊन येते पोळीचाच 'वारसा',
पण, आपण फक्त पोळी खातो, गरम पोळी
त्या वारशाशी आपला संबंध नसतो फारसा !!