तू पुन्हा केव्हा जरी...!

आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णींची सुरेख गझल तू म्हणे केव्हातरी...!

...........................................
तू पुन्हा केव्हा जरी...!
...........................................


... आज मज थोडी उशीराने  सकाळी जाग आली!
कालच्या रात्री जराशी वारुणी मी जास्त प्याली!

रोज मी माझ्या मनाला सांगतो की आज नाही...
आणि संध्याकाळ होता  बारची मी वाट चाली!

चालली आहे हिच्याशी ही कधीपासून मज्जा...
प्रश्न  बापाने तिच्या हा टाकला होता निकाली!

तू पुन्हा केव्हा जरी दिसलास ह्या गल्लीतसुद्धा...
सांगतो आहे तुझ्या मी काढेन रे सोलून साली!

एवढा हा ढोस मजला आणि शब्दांनी मिळाला...
(... वाटला होता मला बाबा तिचा पुरता मवाली! )

ही कथा एकाच ओळीची...पुढे सरलीच नाही...
'सांगता अमुच्या कथेची शेवटी मदिरेत झाली! '

सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा तय्यार  होतो...
रंगते चर्चा जुनी अन ओतता पेल्यात लाली!

तू म्हणे केव्हातरी लिहितोस "केश्या" काव्यसुद्धा...
सांग मग तू का कवींच्या काढशी सोलून साली?

- केशवसुमार

.................................
रचनाकाल ः २४ मार्च २००९
.................................