तू म्हणे केव्हातरी...!

...........................................
तू म्हणे केव्हातरी...!
...........................................

... त्याच वांझोट्या अपेक्षांच्या सकाळी जाग आली!
अन् नव्या रात्री निराशाही निराशेलाच व्याली!

रोज मी माझ्या मनाला बांधतो एकाच जागी...
पाहतो चोहीकडे मी रोज त्याच्या हालचाली!

चालला माझाच माझ्याशी कधीपासून कज्जा...
(का कुणी अद्यापही तो काढला नाही निकाली? )

एवढा विश्वास कवितेतून शब्दांना मिळावा...
...आणि व्हावे आशयानेही स्वतः त्यांच्या हवाली!

ही कथा एकाच ओळीची...पुढे सरलीच नाही...
'सांगता माझ्या कथेची पूर्ततेआधीच झाली! '

सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा उदयास आला...
रंगली चर्चा किती ही पाहण्याआधीच लाली!

तू म्हणे केव्हातरी होतास हिरवागारसुद्धा...
सांग आयुष्या तुझ्या काढू किती सोलून साली?

- प्रदीप कुलकर्णी

.................................
रचनाकाल ः २४ मार्च २००९
.................................