मी येतो..!

 मी येतो..!


मी श्वेतकिरण तुज गोऱ्या कांतीवरती;
मी स्मृति सरेने गंधाळलेली धरती!
तू अवघे स्मरता, मी ईथुन नाहीसा होतो;
अन् थेट तुझ्या नयनांमधुनी येतो!


मी काचेमागे लखलखणारा पारा;
शृंगार तुझा या नयनांमध्ये सारा!
तू जरा राहता उभी पुढे अरशाच्या;
मी प्रतिकृतीच्या वदनामधुनी येतो!


मी मनमेघातील स्मृतीरुपी जलभार;
तुज विरहातील हर श्वासावर मी स्वार!
तू जरा बनुनी धरा व्याकुळ होता;
मी कृष्णसावळ्या गगनामधुनी येतो!


मी तुज कंठातील दागिन्यातला मोती;
त्या पैंजणात मी सदैव जे रूणझुणती!
तू जरा माळता केसांमध्ये गजरा;
मी गजऱ्यामधल्या सुमनामधुनी येतो!


मी जगरणातील आठवणींचा अंगार;
तुज झोप लागता पापण्यांवरी भार!
तुज लागतो परी उशीरा जेव्हा डोळा;
मी तुर्त तुझ्या हर स्वप्नांमधुनी येतो!


                            अनिरुध्द.