पुणे - फर्माईशः जीवन जिज्ञासा!

जीवन जिज्ञासा यांच्या फर्माईशीवरून रचलेली कविता. ही 'गझल' नाही हे माझे स्वतःचेच मत आहे. तसेच ती फर्माईश चिडवून केली होती की प्रेमाने हे माहीत नाही. मी आपली ही कविता रचली. ( कारण पुणे मेरी जान है!)

पुणे:

वैभवे रेखाटताना मीच पुसलेले पुणे
मागते अस्तित्व आता धूळ बसलेले पुणे

बोळ, वाडे, खेळ, सुट्ट्या, रातदिन उंडारणे
प्राण होता आमचा निष्प्राण असलेले पुणे

भांडणे खोटी, चहाड्या, दिलजमाई सारखी
दूर भावंडे अता, बेसूर रुसलेले पुणे

आज छायाचित्र आजीचे बघावे लागते
आठवावे लागते निर्व्याज हसलेले पुणे

माणसे थोडी तरी सारी कुटुंबासारखी
मारते हाका तयांना पूर्ण फसलेले पुणे

चोरट्या प्रेमास वळसा घालणारी ती मुठा
सभ्य काठाबाजुनी लाजून वसलेले पुणे

शांतता, माणूसकी, शेजारधर्माच्या कथा
'सांगते कानात सारे त्यास दिसलेले', पुणे

स्फोट, अतिवृष्टी, तबाही झेलते मुंबापुरी
थोपटे ताईस तेव्हा जान नसलेले पुणे

माणसे नसतात केवळ 'सोडणारी' मित्रहो 
सोडुनी गेले कधी 'मजवर बरसलेले' पुणे