विडंबन कार्यशाळा

अनेक 'सरदारांच्या' विनंतीला मान देऊन केलेली रचना... 
वृत्त : फिरतपंखा,  ताल : बेताल,  लय : द्रुत विडंबित,  राग : मौनपुरी

कवी म्हणती स्वतःला पण 'उतारे' घोटले नाही
विडंबन काय असते हे अजूनी समजले नाही

शहाणे ते स्वतःला मानती अन बोलती इतके
जिथे वेडातही कोणी कुणाला बोलले नाही

इथे जागॄत होण्याला विवेकाची सुधा प्याली
विडंबन जाहले तेंव्हा....  फुकटचे व्यायले नाही

विडंबन वाचतो मी रोजचे प्रत्येक कवितेतुन
जसे काव्यात असते नेहमी... जे प्रकटले नाही

तुम्ही खोड्या कुणाच्या काढता... नाही महत्त्वाचे
तुम्ही निष्पाप असता लोक म्हणती, 'बोचले नाही.. '

उण्या व्यंगातही साधे कुणाला तत्त्व विश्वाचे
विडंबनही तसे... केवळ जिभेचे चोचले नाही

'विडंबन हे कवीचे पाहिजे की फक्त कवितेचे?'
अशा प्रश्नात समजे की कुणाला सोसले नाही...!

अरे, धादांत खोट्या समजुतीतुन मोकळे व्हा ना!
तुम्हां समजेल 'मार्मिक आतले'... जे उमटले नाही

तशी घेणार होतो मी 'विडंबन कार्यशाळा'... पण -
इथे मी बिंग कोणाचे अजूनी फोडले नाही...!

=========================