भैरवी

काळ्या-करड्या डोहाने गोंडस सोनेरी हरीण गिळून टाकावे तसे रात्रीने दिवसाला कणाकणाने गिळून टाकले. कोपऱ्यावरच्या पानाच्या टपरीत पेट्रोमॅक्स झगझगली आणि निळ्या-पांढऱ्या रंगाचा सिगरेटच्या जाहिरातीचा पत्रा जूनपणे लकाकू लागला.

खरे तर त्यांच्या भेटीच्या ठरवलेल्या वेळेला अजून चांगला अर्धा तास अवकाश होता. पण त्याला तिथे उभा राहून अर्धा तास लोटला होता. घडणारे सारे त्याच्या दृष्टीने बरेचसे अकल्पित होते. त्यासंबंधी विचार करायला हीच जागा बरी असे ठरवून तो इथे येऊन थांबला होता. शिवाय ते ठरलेल्या वेळेच्या किती आधी येते हे बघायची चोरटी उत्सुकता होतीच. त्याने पाचवी अर्ध-ओढली सिगरेट बुटातळी तुडवली, आणि खांदे मागे खेचून छाती पुढे रेटीत मणका ताणून घेतला.

तंग आवळ कपडे आणि सुजट हत्तीच्या पायाच्या मापाचे बूट घातलेल्या त्या तरुणाने एकदा घड्याळ पाहून घेतले आणि शेजारीच उभ्या असलेल्या त्याच्या वाहनाच्या बैठकीवर थाप मारली.

सुजयने सिगरेटचे पाकीट विकत घेतले तेव्हा त्या तरुणाने बुजत-बाचकत एक गोल्डफ्लेक खरेदी केली होती, आणि अंगठा-तर्जनीच्या चिमटीत पकडून ती तळव्याच्या करवंटीत लपवत घाईघाईने ओढून टाकली होती. मग त्याने बडीशेपेचा तोबरा भरला होता. तरीही त्याचे कावऱ्या-बावऱ्या नजरेने आसपास पाहणे चालूच होते. सिगरेटचे थोटूक तर त्याने पायाने लोटत केव्हाच गटारार्पण केले होते.

स्वतःच्या स्त्रीत्वाची आणि शरीरसौष्ठवाची पुरेपूर जाणीव असलेली एक तरुणी दरवळत आली. तिला पाहताच त्या तरुणाने घाईघाईने वाहनावर पुन्हा थाप मारली, किल्ली खाली पाडली, ती उचलून लावून वाहन सुरू केले, आणि त्या तरुणीला मागे बसवून तो निघून गेला.

सुजय हसून स्वतःशीच गुणगुणला.

फांदीवर एका दोन जीव ते बसले

कूजन त्यांचे कानात माझिया हसले

एकावर दोन जरी डोळ्यांना हे दिसती

दोघांत असे एकाचिच त्या वसती

माधवीची आणि त्याची ओळख होऊन फार काळ उलटला नव्हता. बागेत तो बाकावर बसला असताना ती हिरवळीवर येऊन पहुडली आणि दोन हातांवरच्या बाकाकडे बिलकूल लक्ष न देता तिने पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. सुजय हाडे वितळून गेल्यासारखा जागीच खिळून ढेप होऊन बसला.

त्या बिंदूपासून सुरुवात करून आज दोघांनी समुद्रावर फिरायला जाण्यापर्यंत त्याने ही रेषा ओढत आणली होती. पुढे काय होणार याचे सौम्य कुतूहल बाळगीत तो रेषेवर स्वार झाला होता.

शारीरिक अस्तित्व असलेली स्त्री आतापर्यंतच्या त्याच्या जीवनात उमटलीच नव्हती. तशा त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात अनेक दिवल्या नाचून गेल्या होत्या, पण आतापर्यंत त्यातून एकही सावली आकारली नव्हती.

सावरीचा कापूस हवेच्या अस्पष्ट झुळुकीवर तरंगत यावा तशी माधवी तिथे आले. सेकंदकाटा बाराला बिलगत असताना ती त्याच्यासमोर येऊन पोचली. दोघेही चालू लागले.

समुद्र किनारा निर्मनुष्य होता. ओहोटीच्या धक्क्यातून सावरून समुद्र भरतीच्या तयारीला लागला होता. ओहोटीच्या ओलसर जखमा अजून भरून यायच्या होत्या.

एका बिनचेहऱ्याच्या जागी ते दोघेही बसले. माधवीने तिचा पदर दोन्ही खांद्यांवरून लपेटून घेतला आणि पदराचे टोक चिमटीत धरून दोन्ही हातांचे पंजे समोर उंचावलेल्या गुडघ्यांवरून वेटाळून घेतले.

क्षीण तेजाळणाऱ्या समुद्रावरच्या चांदीवर नजर लावून सुजय घोगरट आवाजात बोलू लागला.

"रोजच्या व्यवहारातल्या जाणीवा-संकल्पनांची फोलपटे मी चिकटवीत बसत नाही.

"लहानपणीच माझे जन्मदाते वारले. खरे तर मला ते आठवतही नाहीत. कोणी नातेवाईक असल्यास मला माहीत नाही. मला सुचेल, जमेल तसा या जीवनप्रवाहात मी तरंगत राहिलो.

"स्त्रीविषयीचे आकर्षण माझ्या मनात केव्हा उमलले मला आठवत नाही. पण एकंदरीत त्या आकर्षणाभोवती माझे स्वप्नरंजनच जास्त झाले.

"तू भेटेपर्यंत त्या स्वप्नरंजनाला शारीरिक आकार प्राप्त होऊ शकेल याची मला जाणीव नव्हती. दोन जीवांचे एकमेकांत विरघळून जाणे या स्वप्न-कल्पनेनेच मला झपाटले होते.

"तू भेटल्यावर मला एक दिशा खुणावू लागली. पण त्या दिशेचे धुके हळूहळू विरळ होत चालले तसे मधले अडथळेही आपली डोकी वर काढू लागले.

"रूढ व्यवहारात आपले प्रतिबिंब शोधायचे झाले तर मी तुला मागणी घालतो आहे असे म्हणावे लागेल. पण अशा बटबटीत शब्दांचा आश्रय घेण्याआधी काही गोष्टी स्पष्ट करतो.

"मुलांची मला अजिबात आवड आही. वंशसातत्याची ओढ प्रत्येकाच्या मनात तेवढ्याच तीव्रतेने उमटायला हवी ही अपेक्षा मला खुळचटपणाची वाटते.

"तसेच दोन जीवांच्या मीलनाचे शारीरिक, भावनिक, व्यावहारिक असे वेगळाले पैलू असतात हेही मला मान्य नाही. मीलनाची झळाळी या सगळ्या तुकड्यांना कवेत घेते.

"अशा मीलनाची आकांक्षा माझ्या मनात उगवून बराच काळ लोटला. परंतु वास्तवातले अनुभव माझ्या व्यक्तित्वाचे कंगोरे पार करीत नव्हते तोवर माझ्या मनाचा उंबरा अलंघ्य राहिला.

"आतल्या अंधाऱ्या गाभाऱ्याची तेजाची तहान वाढतच गेली आणि त्या वाढत्या तहानेबरोबर उंबराही वर वर सरकत गेला.

"अजूनही एक फट शिल्लक आहे. आणि मला उमगले आहे की तुझे व्यक्तित्व त्या फटीला व्यापून आतमध्ये प्रकाशाचे कारंजे उभारू शकेल. "

पूर्णचंद्र आता मागच्या टेकडीवर आला होता. सबंध किनारा काळपट विटक्या चिंधीसारखा दिसत होता.

"कुठेतरी दोन सुरावटींनी साधर्म्य दाखवावे तसे काहीसे मला वाटले. शब्दांच्या पोषाखावरून आतल्या विचारांची कल्पना करणे चूक आहे. पण कालांतराने हा अंदाजपंचे कारभार चालवायची सवय होऊन जाते. "

वाहत्या रक्तात ऊब खेळवण्याचे सामर्थ्य तिच्या आवाजात होते.

"तुम्हां लोकांना तर याची पिढीजात सवय होऊन बसली आहे. परंतु या ग्रहावरची आमची ही जेमतेम विसावी पिढी. वेगळ्या ग्रहावर आमची वेगळीच संस्कृती होती एवढेच मला सांगता येईल. यापेक्षा जास्ती सांगायला तुमच्या भाषेत शब्द नाहीत.

"आमच्या व्यवहारात शब्द नव्हते. सूर आम्हांला पुरेसे होते. पण या ग्रहावर येताना ते आम्हांला दान करावे लागले.

"आता सगळेच आमचे नि सगळेच परके.

"कालमापनाची तुमची साधने मला फारच ओबडधोबड वाटतात. वाहत्या नदीच्या पाण्यावर काठ्या फटकारून तिचे तुकडे पाडण्याचा खेळ मला अद्यापि असाध्य आहे.

"या ग्रहावर आम्हांला का यावे लागले याची मला कल्पना नाही. पण इथे आल्यावर जे घडले ते माझ्या कल्पनेबाहेरचे होते. आमच्यातल्या बऱ्याच जणांना तुमच्या संस्कृतीने चिणून टाकले. शब्दांच्या दगडधोंड्यांनी त्यांचा प्राण घेतला आणि त्यांची कलेवरे कला म्हणून मिरवणे चालू झाले.

"काहीजणांनी आपले अस्तित्व या चराचरात कायमचे विरघळवून टाकले. पण त्यांचे अमर्त्य आत्मे या हवेच्या बेडीत जखडले गेले.

"मी माझ्या मनाचा उंबरा छताला भिडवून टाकला. पण तोपर्यंत तुमच्या संस्कृतीला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. मग माझे कलेवर ताब्यात घेण्यासाठी बंदिस्त गाभाऱ्यावर तुमच्या धडका सुरू झाल्या. पण गाभारा अभेद्य आहे. त्यात कोणाला प्रवेश द्यायचा याचीच विवंचना करीत माझे अस्तित्व मी टिकवून ठेवले होते.

"तुझ्या ज्ञानेंद्रियांना जाणवणाऱ्या माझ्या अस्तित्वाने तुला तेजाच्या कारंजाची तहान जाणवली. मलाही हवे होते ते मिळाले.

"आता आपल्या गाभाऱ्यांचे मीलन होईल. बाकीच्या व्यवहारापासून मग आपली नाळ तुटेल.

"मी भैरवी. माझ्या रूपाची खरी कल्पना न आल्याने त्यांच्या संकल्पनेतले सर्व स्वर परजीत ह्या संस्कृतीचे शिपाई हल्ला चढवीतच राहतील. पण भैरवीच्या मीलनाची संकल्पना त्यांच्या शब्दांत मावणारी नव्हे. "

तिने आपले दोन्ही हात पसरले. तो आवेगाने झेपावला.

शेकडो ज्वालामुखी एकत्र विस्फोटत असल्याप्रमाणे त्यांचा अणू-रेणू झळाळून उठला आणि त्या अग्निलोळाने साऱ्या समुद्राला सामावून घेतले. भैरवीच्या मीलनक्षणाचा तृप्त आवेग पोटात साठवून समुद्र गर्जत राहिला.