खरं काय आणि खोटं काय... १

"दुनिया ही अशी तिरपागडी आहे बघ, बापू" गौतम म्हणाला. " ती आहे तशी रंगरंगीली, आणि म्हणून तुम्ही लेखक अगदी बाह्या सरसावून लिहायला बसता. पण या रंगीबेरंगी दुनियेतले फार थोडे रंग लेखकांना त्यांच्या लिखाणात आणता येतात. आता तुझंच उदाहरण घे. तू कथा लिहितोस. कधीकधी चांगल्याही लिहितोस" गौतमचा स्वर किंचित मिश्किल झाला. " म्हणून तुला वाटेल की लेखकाच्या कल्पनाशक्तीसमोर सत्य  हे काहीच नव्हे. तुझ्या लिखाणातली पात्रं, त्यांचे विचार जगावेगळे, अगदी झगझगीत असतात असं वाटेल तुला. पण वस्तुस्थिती बरोबर उलटी आहे. या.. आसपास वावरणाऱ्या सामान्य, अतिसामान्य अशा लोकांच्या डोक्याची टोपणं काढून बघितली तर आत भावना, वासना, विकृती, विकार यांचं असं जाळं दिसेल तुला, की ज्याचं वर्णन करायला जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या लेखकाची प्रतिभा पुरी पडणार नाही. माणसाच्या मनाचा काही अंदाजच येत नाही बघ..."

" अरे पण गौतम, कुठे लिखाणातले झगझगीत रंग आणि कुठे हे तुझं वास्तवातलं जग - निव्वळ काळं, पांढरं, किंवा करडं फार फार तर... " मी जरा जास्तच पुस्तकी बोलून गेलो असं मला वाटलं. गौतमही जरासा हसला. " नाही, हस तू माझ्या बोलण्यावर, पण तुझं बोलणं काही पटलं नाही बुवा आपल्याला. माझ्या पद्धतीचं लिखाण घे, रहस्यकथा. तुला असं म्हणायचंय का की अगाथा ख्रिस्तीच्या एखाद्या कादंबरीतल्या रहस्यापेक्षा एखाद्या पोलीस स्टेशनच्या क्राईम डायरीत अधिक रोमांच असेल? किंवा दुसरं उदाहरण घेऊ. अं.. समजा भयकथा. धारपांची 'लुचाई' किंवा 'चंद्राची सावली' वाचताना अजूनही मध्ये थांबून आजूबाजूला बघून घेतो मी. हो, आणि तूसुद्धा. अगदी दिवसाही. असला थरार प्रत्यक्ष 'तशा' जागी गेलो तरी जाणवेल आपल्याला? लेखकाच्या कौशल्याला काहीच महत्त्व नाही असं म्हणायचंय काय तुला?"

"हां. तू म्हणतोस ते अगदीच काही चूक नाही" गौतमने सिगरेट पेटवली. सिगरेटच्या धुराच्या निळसर रेषांमागून तो त्याच्या किंचित खर्जातल्या आवाजात बोलू लागला. एखाद्या प्राध्यापकासारखा.  एखाद्या तत्त्वज्ञासारखा. तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकासारखा म्हणा वाटलं तर.

"वास्तवाचे काळे, पांढरे, करडे रंग म्हणालास तू बापू. आपल्या सगळ्यांची आयुष्यं अशाच रंगाची असतात. पण याच्या किती छटा, किती शेड्स! वास्तव हे कंटाळवाणं, एका साच्यातून काढल्यासारखं असलं तरी ते एकमेकाच्या फोटोकॉपीसारखं नाही" गौतम झेरॉक्स कधीच म्हणत नसे. " प्रत्येक आयुष्याचा निराळा पीळ असतो. प्रत्येक आयुष्याचे पदर वेगळे. रस्त्याच्या कडेला खड्डा खणता खणता थोडा वेळ थांबून बिडी ओढणारा एखादा मजूर घे. त्याच्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे तुम्हा लेखकांना?  त्याच्या आयुष्यात काहीच नाट्य नसेल? तो कधी संतापानं इंगळासारखा लाल झाला नसेल? कधी द्वेषानं, मत्सरानं धुमसला नसेल? कधी हतबलतेनं, अगदी निराश होऊन ढासळला नसेल? का कधी एखाद्या नाजूक स्पर्शानं मोहरला नसेल? पण यातलं किती आणि काय तुम्हा लेखकांना कागदावर आणता आलं आहे? लिखाण म्हणजे ... निव्वळ कागदी बुडबुडे. त्याला वास्तवाची धग नाही. एखाद्या अनुभवातला जाळ जसाच्या तसा कागदावर उतरवता येणं अगदी अशक्य आहे. मुळात लिखाण ही प्रक्रियाच इतकी कृत्रिम आहे, की तिचा स्पर्श झाला की मूळ अनुभव मेलाच म्हणून समज तू बापू. माझी तक्रार ही तुझ्या लिखाणाविषयी नाही रे. तुम्ही लेखक मंडळी अगदी निष्ठेनं काम कराल, पण तुमची अवजारंच अशी बोथट, गंजलेली आहेत, त्याला तुम्ही काय करणार बापू?"

"हं. म्हणजे आमचं लिखाण ते तेवढं कृत्रिम, आणि तुझं, काय म्हणालास ते.. वास्तव ते तेवढं जिवंत असंच म्हणायचंय ना तुला?"

"अं, अगदी तसं नाही, पण जवळजवळ तसंच."

"मग गौतमजी, या तुमच्या वास्तवात काय जिवंत आहे बघूया हं" मीही जरा चिडलो आणि  खुर्चीवर अस्ताव्यस्त पडलेला 'सकाळ' उचलला. "छा! पेपर तर हल्ली चाळायच्याही लायकीचे राहिले नाहीत! पण यातली कुठलीही एक बातमी घेऊ आपण गौतम. मला सांग हं यात काय नाट्य, काय जिवंतपणा आहे ते! हे बघ, 'वडगाव मावळच्या तलाठ्याला लाच घेताना अटक'. काय नाट्य आहे यात? सरकारी अधिकारी, सामान्य जनतेला नाडणे, लाचलुचपत, अगदी असह्य झाल्यावर कुणीतरी केलेली तक्रार. आता दोनचार दिवस आत जाईल तो आणि मग कुणाच्या लक्षातपण राहणार नाही ही बातमी. काय, काय नाट्य आहे यात? "

"बापूसाहेब, तुम्ही नेमकी तुमचा स्वतःचा मुद्दा खोडून काढणारी बातमी निवडली. अरेरे! मर्फीज लॉ! " गौतम हसत म्हणाला.
"का? काय झालं? "

"बापू, हा चौधरी मला चांगला माहीत आहे. सरकारी नोकरांत अशी माणसं अपवादानंच बघायला मिळतात. धुतल्या तांदळासारखं चारित्र्य आहे त्याचं. त्याला अडकवलाय तिथल्या आमदारानं. माहुलीच्या अभयारण्यात गेल्या महिन्यात हरिणांची शिकार झाली होती बघ. त्यात महत्त्वाची साक्ष आहे चौधरींची. संपतराव जोंधळेची चाल आहे ही सगळी. आता हा आदर्शवादी तलाठी, त्याच्यावर दबाव टाकणारी ही राजकारणी धेंडं, चौधरीला रोजच्या रोज बसणारे चटके, तरीही ताठ मानेनं जगण्याची त्याची जिद्द... यातलं काय आणि कसं  तुला तुझ्या एखाद्या कथेत लिहिता येईल? आणि समजा लिहिलीसच तू एखादी कथा, तर ती किती उबवलेली, किती कृत्रिम वाटेल? तेव्हा बापूसाहेब, आपला पराभव मोठ्या मनानं मान्य करा आणि शांतपणानं एक सिगरेट ओढा." गौतम म्हणाला.

"आणि ते.. ते चौधरी? " मी गौतमनं पुढं केलेल्या पाकिटातली सिगरेट उचलत विचारलं.

"ते सुटतील बापू. सकाळी शिंदे वकिलांशी बोललोय मी. आपल्याला अशा माणसांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. अशा माणसांची आपल्याला गरज आहे, बापू. आपल्यालाही आणि.. "

आणि कुणाला गरज आहे हे मला आता कधीच कळणार नाही. गौतमचं वाक्य तोडून अचानक दरवाज्यावरची घंटी वाजली. काहीशा अनिश्चितपणे वाजवल्यासारखी. एकदा. दोनदा.

(क्रमशः)