खरं काय आणि खोटं काय...३

मी दरवाजा बंद करून वळलो तो गौतम एक नवी सिगरेट पेटवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य होतं.
"काय मग बापूसाहेब, काय म्हणतायत तुमच्या शर्वरीताई? " त्यानं विचारलं.

"हं. म्हणजे नेहमीप्रमाणं तू माझ्याकडून काढून घेऊन मग मला ते चुकीचं कसं आहे, हे सांगणार म्हण की. "

"तसं समज. पण काय, तुला वाटतं तरी काय या मुलीबद्दल? " गौतमनं विचारलं.

"हे बघ गौतम, मी काही तुझ्यासारखा व्यावसायिक नाही. पण तुझं बघून बघून जे शिकलोय ते सांगतो. बघ तुला पटतंय का.. " मी म्हणालो.

"बापू तू बोल तर खरा. मग बघू आपण तर्क काय, निष्कर्ष काय ते. " गौतम म्हणाला.

"हम्म. शर्वरी कारखानीस... " मी मगाशी राहिलेली सिगरेट उचलली. "वय काय, तीस- बत्तीस. आर्थिक सुस्थिती तर दिसतेच आहे. भारी ड्रेस, कानातल्या हिऱ्याच्या कुड्या, बाहेर गाडी आणि ड्रायव्हर तर असणारच. आणखी काय सांगू? आणि हो, ते चष्मा आणि नेटसर्फिंगचं काही ध्यानात नाही आलं बुवा माझ्या.. "

"माझ्या तर्कसंगतीची पद्धत वापर ना बापू. कितीही उत्तम दर्जाची चष्म्याची फ्रेम असली तरी ती सतत वापरणाऱ्याच्या नाकावर एक लहानशी आडवी रेघ दिसते. मिस कारखानिसांनी ती मेकअपनं लपवण्याचा प्रयत्न केला होता खरा, पण अस्पष्ट का होईना, ती रेघ दिसतेच. तर मग चष्मा. बाहेर जाताना तिनं तो लावला नाही, याचं कारण म्हणजे तिला त्याची लाज वाटते. म्हणजे त्याचा नंबर बराच जास्त असला पाहिजे. तिनं कॉंटॅक्ट लेन्सेस लावल्या होत्या, हे तर तुझ्या लक्षात आलं असेलच. आणि तिच्या ड्रेसच्या बाह्या बघितल्यास तू? सतत कंप्युटरचा माऊस हाताळणाऱ्या व्यक्तींच्या बाहीवर ती बाही टेबलच्या कडेवर जिथं घासली जाते, तिथे एक आडवी खाच येते. या शर्वरीची आर्थिक स्थिती सामान्य असती, तर ती कुठंतरी नोकरी करते, असा निष्कर्ष मी काढला असता. पण तसं नाही. आणि बाहेर गाडी तर होतीच तिची. मगाशी खिडकी उघडायला मी उठलो तेव्हाच रस्त्यावर पार्क केलेली तिची होंडा सिटी मला दिसली. मग अशा सुस्थितीतल्या मुलीला तासनतास टेबलाशी बसायला कोणती गोष्ट प्रवृत्त करत असेल? उत्तर अगदी उघड आहे. इंटरनेट! "

"वा, काय लॉजिक आहे गौतम! मानलं तुला... " मी कौतुकानं म्हणालो. " आणखी काही? "

"आणखी बरंच काही. " गौतम म्हणाला. "त्या मुलीच्या कपड्यांबद्दल, आर्थिक स्थितीबद्दल तू म्हणालास, पण तिचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर तू काही बोलला नाहीस. तिचे कपडे, दागिने आठव. जरासे भडकच नव्हते वाटत? अशा अडचणीच्या वेळीही ती पूर्ण मेकअप करून आली होती. आणि तिची भाषा.. दिलीपविषयी, तिच्या बाबांविषयी बोलताना किती स्वप्नाळूपणे बोलत होती ती.. 'अहो दिलीप' असा उल्लेख... टीव्हीवरल्या मराठी मालिका बघत असणार ही मुलगी. आणि इंटरनेटवर काय लिहिते ही? कविता! "

" अच्छा. म्हणजे ही लग्नाचं वय उलटून चाललेली, आपल्या शारीरिक दुबळेपणाविषयी काहीशी खंतावलेली, श्रीमंत घरातली, स्वप्नांच्या दुनियेत रमणारी आणि काहीशी उथळच मुलगी, नाही का गौतम? "

"बरोबर. आणि मग तिला हा भेटतो, कोण, काय म्हणता तुम्ही लेखक मंडळी त्याला.. हां, तिच्या स्वप्नांतला राजकुमार. हाही वय होत चाललेला, शरीरानं आणि मनानं दुबळा आणि खऱ्या प्रेमाला आंचवलेला. अशा स्वप्नाळू, कवीमनाच्या मुलींना फार आकर्षण असतं अशा मुलांचं. रांगड्या, मॅचो मुलांपेक्षा अशी काहीशी बायलीच मुलं आवडतात त्यांना. वात्सल्य आणि ममत्व ही तर मॅमेलियन्सची वैशिष्ट्येच आहेत. 'बायका एरवी कितीही कंठाळ्या असल्या तरी ज्या दिवशी तुम्हाला हँगओव्हर असतो, त्या दिवशी त्या अगदी देवदूतच होतात' असं वुडहाऊस म्हणतो, आठवतं? आणि मग त्यांचं प्रेम, शपथा, आणाभाका - ते चांदणं, ती हिरवळ, ते एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून कॉफी पिणं वगैरे... सगळे सगळे ते तुमचे शब्दांचे बुडबुडे! "

"पण त्या दिलीपचं पुढं झालं काय? तो आणि त्याची बहीण, मेव्हणे वगैरे गेले तरी कुठं? "

" ते बघू आपण. पण सध्या तरी आपण त्या दिलीपनं पाठवलेल्या मेल्स वाचू. अं काय लिहितो हा... अरेरे, वाचू नये रे कुणाचं खाजगी काही.. त्यातल्या त्यात प्रेमात पडलेल्या माणसांचं.. " गौतमनं त्या प्रिंट आऊटसचे कागद उलगडले. "अरे वा, अगदी रसिक आहेत हो 'हे' दिलीप. बघ की, पहिल्याच मेलमध्ये गालिब कोट केलाय त्यानं.. इष्क पर जोर नहीं, है ये वो आतिश गालिब, जो लगाये ना लगे और बुझाये ना बने' "

"क्या बात है, गौतम. लोक अजूनही प्रेमपत्रांत गालिब वगैरे लिहितात? "

"अरे पुढं ऐक. 'युवर स्टॅच्युएस्क फिगर रिव्हॉल्वज इन माय ड्रीम्स... ' ही शर्वरी आणि स्टॅच्युएस्क? तिला अवरग्लास फिगर म्हटलं नाही, हे नशीबच आपलं बापू. "

"आईज ऑफ दी बिहोल्डर, गौतम, आईज ऑफ दी बिहोल्डर. "

"हम्म. खरं आहे तू म्हणतोयस ते. आणि आपले दिलीप चांगले वाचकही दिसताहेत. डिलेक्टेबल डिनर, इनक्रेडिबल इंबेसिलिटी ऑफ माय काँफ्रेअर्स, माय अनएंडिंग पेरिग्रेशन्स... वा वा वा.. लेखक व्हायचा हा माणूस इंजिनिअर कसा काय झाला? आणि हे बघ, ऑफिसमधल्या राजकारणाला 'बेत न्वा' हा शब्द वापरलाय यानं.. आणि हे काय? 'फॉरएव्हर युवर्स टिल दी ग्रिम रिपर सेपरेटस अस... ' म्हणजे तत्त्वज्ञानीही दिसताहेत हे दिलीप. आणि 'काऊंटलेस ऑस्क्युलेशन्स? ' बापू, नको रे पुढचं वाचायला आपण. ती शर्वरी हे कागद द्यायला का संकोचत होती ते कळतंय मला आत. "

" पण यातनं काही कळतंय का आपल्याला? "

"हम्म. बरंच काही कळतंय बापू. आता फक्त एक करायचं आपण. शर्वरीच्या आईबाबांशी एकदा बोलून घेऊ. तिचा नंबर लिहिलेला कागद होता ना इथं कुठंतरी? एक काम कर. तिला फोन लाव, आणि तिच्या घरचा आणि दामलेंचा फोन नंबर घे तिच्याकडून. आणि दामलेंचा मेल आयडीपण घे. "

"तू काय करतोयस? "

"आता फारसं करता येण्यासारखं काही नाही बापू. तू तेवढे डिटेल्स घे, मी बघतो सकाळी अर्धवट राहिलेलं शब्दकोडं सुटतंय का ते! " गौतम म्हणाला.

(क्रमशः)