खरं काय आणि खोटं काय...२

गौतम त्याच्या खुर्चीतून ताडकन उठला. हातातल्या सिगरेटचं थोटूक त्यानं भरून वाहत असलेल्या रक्षापात्रात चुरडून विझवलं. पश्चिमेकडची खिडकी उघडली आणि दारही उघडलं.

दारात एक तरुणी उभी होती. साधारण तीस- बस्तीस वय, किंचित स्थूलपणाकडं झुकणारा बांधा, सावळा वर्ण, महागडा पण एकंदरीत व्यक्तिमत्त्वाला काहीसा विसंगत पोषाख आणि जरासा भडकच मेकअप. उंची डीओरंडचा वास. थोडक्यात जिला पाहिल्यावर कपाळावर एखादी आठी चढावी तशी व्यक्ती. अपेक्षेप्रमाणेच गौतमच्या कपाळावर गुरुदत्तसारखं आठ्यांचं जाळं उमटलं.

"गौतम.. गौतम सरदेसाई? "

"मीच. या, आत या. " गौतम त्याच्या नेहमीच्या मार्दवानं म्हणाला. स्त्रीदाक्षिण्य हा आता कालबाह्य होत चाललेला गुण गौतमच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग होता. 'शिव्हलरी इज डाइंग फास्ट बट इट इज नॉट क्वाईट डेड, बापू' तो नेहमी म्हणत असे.

ती तरुणी आत आली. थोडीशी बावरलेली, गोंधळलेली. गौतमनं दाखवलेल्या खुर्चीवर जराशी अवघडूनच बसली. फिरत्या नजरेनं तिनं एकदा आसपास बघून घेतलं.

"मी शर्वरी. शर्वरी कारखानीस. मला सुनेत्राकडून तुमच्याविषयी कळलं. सुनेत्रा साखरपे...? "

"हां.. हां.. त्यांचं एक छोटंसं काम केलं होतं मी मध्ये" गौतम म्हणाला.

"तुमच्या दृष्टीनं ते छोटं असेल गौतमसाहेब, पण सुनेत्राताई म्हणते की तुमचे उपकार या जन्मात फिटायचे नाहीत. "

गौतम संकोचला. स्तुती त्याला पचवता येत नसे. विशेषतः एखाद्या स्त्रीने तोंडावर स्तुती केली की तो अगदी लाजून जात असे.
त्याचा संकोच शर्वरीच्याही लक्षात आला असावा.

"मला एक सांगा मिस कारखानीस, चष्मा तुम्ही नेहमी वापरता, की फक्त नेटसर्फिंग करताना? " गौतमने विचारलं.
शर्वरी दचकलीच. "तुम्हाला... तुम्हाला कसं कळलं हे? " तिनं चाचरत विचारलं.

गौतम फक्त हसला. "ते जाऊ दे. काय, प्रॉब्लेम काय आहे? " तिच्या समोरच्या खुर्चीत बसत त्यानं विचारलं.
शर्वरीनं जरा साशंकपणानं माझ्याकडे नजर टाकली.

"ओह, हा माझा अगदी जवळचा मित्र बापू, अगदी आपला माणूस आहे. तुम्ही अगदी मोकळेपणानं बोला मिस कारखानीस. "

"गौतमजी, मी... आम्ही कोतवाल कॉलनीत राहतो. 'इच्छापूर्ती' बंगला. बाबांनी मोठ्या हौसेनं हा बंगला बांधला पाच वर्षांपूर्वी. पण त्यात राहायला ते काही फार दिवस जगले नाहीत. आम्ही राहायला आलो आणि सहा महिन्यांतच.. " तिचा आवाज कापरा झाला. "हार्टचा त्रास होता त्यांना.. माझ्यावर फार जीव बाबांचा. मला भाऊ-बहीण कुणी नाही. 'तुझं लग्न होईपर्यंत मला देवानं जगवावं बेटा' ते नेहमी म्हणत असत. पण... "

गौतमनं पाण्याचा ग्लास तिच्यापुढं सरकवला. शर्वरीनं पाण्याचा एक घोट घेतला आणि ती बोलू लागली.

"बाबा गेले आणि वर्षभरातच आईनं दामलेकाकांशी लग्न केलं. दामलेकाका बाबांचे बिझनेसमधले पार्टनर. नाही... तसं आधीपासून काही नसावं.. " गौतमच्या उंचावलेल्या भुवया पाहून शर्वरी म्हणाली. "दामलेकाकांचं घरी येणंजाणं होतं. बाबांचा फार विश्वास काकांवर. काकांचं लग्न राहूनच गेलं असावं बहुतेक. बाबा गेले, मी होस्टेलवर. आई फार एकटी झाली होती. काकांनीच मग आईला विचारलं वाटतं, त्या दोघांनी ठरवलं आणि मला सांगितलं. मलाही त्यात काही गैर वाटलं नाही. शेवटी आईला तिचं आयुष्य आहेच की. "

"हम्म. " गौतम म्हणाला.

"दामलेकाका म्हणते मी त्यांना, पण माझ्यापेक्षा फार मोठे नाहीयेत ते वयानं. इन फॅक्ट, आईपेक्षा लहानच आहेत ते जरासे. बाबांचा बिझनेस उत्तम होता. त्यांच्या गुंतवणुकीही चांगल्या आहेत. सगळ्या गुंतवणुकींची वारस म्हणून बाबांनी माझं नाव घातलंय. बंगलाही माझ्याच नावावर आहे. व्याज चांगल्यापैकी येतं मला. मी मला हवे तितके पैसे काढून घेते आणि बाकीचे आईकडं देते. तुम्हाला कंटाळा तर आला नाही ना, गौतमजी? "

"छे, छे, उलट भलतीच इंटरेस्टिंग आहे हो तुमची ही केस. मग पुढे? "

"मी काही फार करियरिस्ट वगैरे नाही गौतमजी. ग्रॅज्युएट झाल्यावर आईनं लगेच माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. एकदोन ठिकाणी जमतही आलं होतं, पण.... नाही झालं. मी तशी फार बाहेर जाणाऱ्यांतलीही नाही. वाचन, टीव्ही आणि हल्ली इंटरनेट - बस्स. एवढंच माझं आयुष्य. पण चारचौघींसारखा संसार असावा एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यातून माझ्या डोळ्यांमध्ये मोठा दोष आहे. तुम्हाला कसं कळलं माहिती नाही मला, पण जाड चष्मा घालूनही नीटसं दिसत नाही मला. इंटरनेटवर कविता लिहिते मी, पण स्क्रीनवर त्या वाचण्यासाठी भिंग घ्यावं लागतं मला. त्यातून तिशी झाली माझी. त्यामुळं फार अपेक्षा बिपेक्षा नाहीत माझ्या. दिलीप भेटले आणि आता सगळं ठरवल्यासारखं होईल असं वाटायला लागलं. पण नशीबच खोटं आहे हो माझं. आधी बाबा गेले आणि आता दिलीपही.. " शर्वरी दोन्ही हातांच्या तळव्यांत चेहरा लपवून हुंदके द्यायला लागली.

मी आणि गौतमनं एकमेकांकडं बघितलं. गौतमनं मला हातानंच 'असू दे' अशी खूण केली आणि शर्वरीच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. पाचेक मिनिटानं शर्वरी शांत झाली.

"माफ करा, गौतमजी. कधी कधी मनावर ताबाच राहत नाही हो. " ती जराशा अपराधीपणानं म्हणाली.
"असू दे. चालायचंच. तर काय म्हणत होता तुम्ही. हे दिलीप... "

"दिलीप दातार. वासुदेव मधलं नाव. आमचं लग्न ठरलंय, पण.. "

"थांबा, थांबा. मला जरा सविस्तर सांगा मिस कारखानीस. कोण हे दिलीप? कुठं भेटले तुम्हाला? "

"सॉरी. तर.. महिन्याभरापूर्वीची गोष्ट. गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते मी. संध्याकाळच्या रागांच्या मैफिली होत्या बघा त्या आठवडाभर. माझी आणि आईची सीझन तिकिटं होती, पण आईचा पाय मुरगाळला आणि तिला बेडरेस्ट सांगितली डॉक्टरांनी. काका येतो म्हणाले माझ्याबरोबर, पण त्यांना ऐनवेळी टूरवर जावं लागलं. मग एक तिकीट त्यांनी परत केलं आणि मी एकटीच गेले. ते तिकीट ज्यांनी आयत्या वेळी काकांकडून विकत घेतलं तेच दिलीप. दिलीप दातार. बी. ई. आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दिलीप मला भेटले त्या कार्यक्रमात आणि नंतरही आम्ही भेटलो. दुसऱ्या आठवड्यातच त्यांनी मला मागणी घातली आणि मी हो म्हणून टाकलं. "

"आणि तुमचे आई बाबा? "

"आई तर खूशच झाली. काकांनाही आनंद झाला. साखरपुडा जोरात करायचा म्हणाले ते. त्यांचं टूरवर जाणं वाढलंय ना खूप हल्ली, पण आता टूरबिर सगळं बंद म्हणाले. साखरपुड्याला कुणाकुणाला बोलवायचं याची यादी पण काढली आम्ही बसून. दिलीप खूप बिझी असतात ना, त्यामुळं आम्ही संध्याकाळी सातनंतरच भेटायचो. काकांच्या ऑफिसमध्येही फॉरेन डेलिगेशन आलं होतं कुठलंसं. त्यामुळं काकांची आणि त्यांची गाठच पडेना. फोटो बघितला काकांनी दातारांचा आणि म्हणाले, नशीब काढलंस तू शर्वरी... "

"हे दातार.. कुठले हे? घरी कोण कोण असतं? कुठल्या कंपनीत आहेत नोकरीला? "

"अं... मला फारसं नाही सांगता येणार, पण सुपरसॉफ्ट की कुठली कंपनी आहे. संग्रामनगरला कुठंशी ऑफिस आहे. नवीन कंपनी आहे, आणि ऑफिसही शिफ्ट होतंय म्हणे. त्यामुळं नक्की सांगता नाही येणार मला. दातार मूळचे अमरावतीचे. आईबाबा नाहीयेत त्यांना. एक मोठी बहीण. ती भुवनेश्वरला असते. ती.. त्या यायच्या होत्या साखरपुड्याला... " शर्वरीचा आवाज परत चोंदल्यासारखा झाला.

"आणि मग...? "

"दहा तारखेचा मुहूर्त होता साखरपुड्याचा. सगळी तयारी झाली होती. नऊ तारखेला रात्री आम्ही फिरायला गेलो होतो. मी आणि दिलीप. चांदणं पडलं होतं सुरेख. त्यांनी अंगठी घातली बोटात माझ्या. म्हणाले, 'शर्वरी, मला वचन दे, जन्मोजन्मी माझीच होऊन राहशील... '. मी म्हणाले, ' हे असलं कसलं बोलणं? आणि अंगठी उद्याच्या मुहूर्तावर नाही का घालायची? ' तर म्हणाले, 'खरं प्रेम करणाऱ्यांना मुहूर्ताचा संकेत लागत नाही शर्वरी' मी वचन दिलं त्यांना तेव्हा गहिवरले ते. म्हणाले, 'आयुष्यभर प्रेमाला पारखा झालेला माणूस आहे मी. तू माझ्या जीवनात हिरवळ फुलवलीस, शर्वरी. ' नऊ वाजता त्यांनी मला घरी सोडलं तेव्हा माझा हात हातात घेऊन म्हणाले, 'उद्या भेटू, आयुष्यभर एकमेकांचे होऊन राहण्यासाठी.. ' किती, किती आनंदात होते मी गौतमजी त्या दिवशी.. "

मी गौतमकडे पाहिलं. रोमँटिक बोलण्याला तो फार कंटाळत असे. गौतमला कंटाळा आला असला तरी त्यानं तो चेहऱ्यावर दाखवला नव्हता.

"ही गोष्ट नऊ तारखेची, मिस कारखानीस. म्हणजे चार दिवसांपूर्वीची. पुढे काय झालं? "

"तेच काही कळत नाही गौतमजी. दहा तारखेला सकाळी आठ वाजता त्यांची बहीण, भावजी आणि मुलांना घेऊन हॉलवर यायचे होते दिलीप. आठ वाजले, नऊ वाजले.. त्यांचा पत्ता नाही. त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. बाकी कुठला पत्ता, काही ठावठिकाणा नाही. आम्ही सगळे गोंधळून गेलो. आई तर रडायलाच लागली. इतकी सगळी माणसं आलेली आमच्याकडची. इतकं चोरट्यासारखं झालं आम्हाला. आणि मी तर घाबरूनच गेले. कुठे असतील हो दिलीप? काय झालं असेल त्यांना? हल्ली कायकाय वाचतो ना आपण पेपरमध्ये. आणि त्यांची बहीण, भावजी, मुलं.. ते लोक तरी कुठे आहेत?.. " शर्वरी रडवेल्या चेहऱ्यानं विचारत होती.

नशीब तरी काय एकेक प्रश्न मांडून ठेवतं माणसांपुढं! मला त्या मुलीची दया आली. गौतम बाकी नेहमीप्रमाणं स्थितप्रज्ञ होता. आपल्या डायरीत काहीतरी नोंद करून ठेवत त्यानं विचारलं. "मग तुम्ही काय केलं? "

"आम्ही पोलिसांत गेलो, गौतमजी. इतके हलकटासारखे वागले पोलीस! म्हणे पत्ता काय, कंपनी काय, काही माहिती नाही, आम्ही तपास तरी कशाच्या जोरावर करायचा? एक कसला तरी रिपोर्ट लिहिला आणि म्हणाले आठ दिवसांनी फोन करून बघा. आई तर अंथरुणावरच आहे गेले चार दिवस. काका इतके चिडलेत, म्हणाले, सापडू तर दे, खूनच करतो त्याचा. पण माझं मन मला सांगतंय गौतमजी. दिलीप धोका देणाऱ्यातले नाहीत. त्यांच्यावर नक्कीच काहीतरी संकट कोसळलंय गौतमजी. प्लीज, प्लीज मला मदत करा.. "

"हम्म. मिस कारखानीस, या दिलीप दातारांचा फोटो आहे तुमच्याकडं म्हणालात तुम्ही.. "

शर्वरीनं तिच्या पर्समधून एक पासपोर्ट साइज फोटो काढला. "फारसा स्पष्ट नाही आलेला फोटो हा, आणि अलीकडचाही नाहीये. पण तुम्हाला कल्पना येईल. " ती म्हणाली.

गौतमच्या खांद्यावरून मी त्या फोटोकडं नजर टाकली. चाळिशीचा माणूस. विरळ होत चाललेले केस, सर्वसाधारण नाकडोळे, डोळ्यांवर गॉगल. "डोळ्यांना तीव्र उजेड सहन होत नाही त्यांना. म्हणून डॉक्टरांनी गॉगल वापरायला सांगितलाय त्यांना. " शर्वरीनं खुलासा केला

"आणखी काही? "

"स्वभावानं खूप भोळे आहेत हो दिलीप. आणि अगदी सज्जन. स्वभाव अगदी लोण्यासारखा बघा. आवाजही अगदी मृदू आहे त्यांचा. लहानपणी टॉन्सिल्सचा खूप त्रास झाला म्हणे त्यांना. म्हणून अगदी हळुवारपणे बोलतात ते. पण इतके प्रेमळ म्हणून सांगू... "

"मिस कारखानीस, त्यांचे काही इतर डिटेल्स आहेत तुमच्याकडं? त्यांचं कार्ड म्हणा, त्यांच्या कंपनीचा नंबर म्हणा.. "

"अं.. त्यांचा मोबाईल नंबर आहे माझ्याकडे, पण तो... हं, ते मी सांगितलंच तुम्हाला. आणि हो, त्यांनी काही इ-मेल्स पाठवल्या होत्या मला. त्यांचेही प्रिंट आऊटस आणलेत मी. "

गौतमच्या चेहऱ्यावर अचानक उत्सुकता आली. "कुठलं.. कंपनीचं अकाउंट आहे त्यांचं? " त्यानं विचारलं.

"नाही. कंपनीच्या अकाउंटमधून आपली बोलणी नको म्हणाले ते. जीमेल अकाउंट आहे त्यांचं. हे ते चार प्रिंट आऊटस.. अं.. जरा खाजगी मेल्स आहेत गौतमजी, तेव्हा.. "

"आय अंडरस्टॅंड मिस कारखानीस. या खोलीतल्या गोष्टी कधीच बाहेर जात नाहीत. मी बघतो काय करायचं ते. तुमचा नंबर देऊन ठेवा. मी कळवतो तुम्हाला काय ते. दरम्यान स्वतःला जरा सावरा. आईकडेही लक्ष द्या. आणि हो, मन जरा घट्ट करा"

"म्हणजे? मला दिलीप भेटतील ना परत? " शर्वरीनं धीर एकवटून विचारल्यासारखं विचारलं.

"स्पष्ट सांगायचं तर मला फारशी आशा वाटत नाही, मिस कारखानीस. " गौतम म्हणाला. "तेव्हा तुम्ही या दातारांना विसरण्याचा प्रयत्न करावा, हे उत्तम. "

"ते या जन्मी तरी शक्य नाही गौतमजी. मी वचन दिलंय दिलीपना. माझ्या नशिबात सुख असेल तर ते मला भेटतीलच. इथं, किंवा जिथं ते असतील तिथं. हा माझा नंबर गौतमजी. आणि हो, तुमचा काही ऍडव्हान्स..? " शर्वरीनं पर्स उघडली.

गौतम हसला. "तशी वेळ आली तर मी तुम्हाला सांगीन, मिस कारखानीस. सध्या काही नको. "

"मग येऊ मी? " शर्वरी खुर्चीतून उठली

"या, मिस कारखानीस. " गौतम म्हणाला.

(क्रमशः)