खरं काय आणि खोटं काय...४

संध्याकाळी मी गौतमच्या फ्लॅटवर आलो तेव्हा गौतम खुर्चीच्या दांड्यांवर पाय ठेवून पेंगत होता. माझ्याजवळच्या किल्लीनं मी दार उघडलं आणि तो आवाज ऐकून त्यानं आपले झोपाळलेले डोळे उघडले.

"भले शाब्बास! " मी म्हणालो. "आम्ही इकडे कोडं सुटतंय का ते बघतोय, आणि महाराज झोपा काढतायत! "

"कोडं सुटलं की. " गौतम म्हणाला.

"सुटलं? "

"हो. बत्तीस आडवा शब्द 'पचंग' आहे, 'पंचांग' नाही. आपण 'पंचांग' धरून चाललो होतो, त्यामुळं सगळा घोळ झाला. 'पचंग बांधुनी तयार व्हा रे'"

"गौतम...मित्रा, शब्दकोड्याविषयी बोलत नाही मी. शर्वरी... मिस कारखानीसांचं कोडं सुटलं की नाही? "

"हां ते होय! ते काही फारसं अवघड कोडं नाही. सुटेल. वाजले किती? पाच? चल, आपण एक चहा मारून येऊ आणि बघू मग त्या मिस कारखानीसचं कोडं सुटतंय का ते."

चहा पिऊन आम्ही परत येत होतो. माझ्या खांद्यावर हात ठेवून गौतम म्हणाला, "बापू, माझी एक जुनी धारणा आहे बघ. एखादं कोडं सोडवताना, जे जे निव्वळ अशक्य आहे, ते काढून टाकत जायचं. मग जे शेवटी शिल्लक राहील, तेच सत्य असलं पाहिजे; मग ते कितीही असंभव का असेना... "

"खरं आहे. " मी म्हणालो.

"आता ही शर्वरीचीच केस बघ. या दिलीपच्या गायब होण्यामागं काय कारणं असतील? त्यानं त्याच्याविषयी, त्याच्या नोकरीविषयी दिलेली माहिती अशी अर्धवट, गूढ का आहे? या दिलीपच्या नाहीसं होण्यानं कुणाला सर्वात जास्त फायदा होणार आहे? मी अशी केस सोडवताना नेहमी स्वतःला त्या गुन्हेगाराच्या जागेवर ठेवतो. या केसची गंमत अशी आहे, की यात गुन्हेगार कोण आहे, तेच कळत नाही. दिलीप?  त्याचं  तर शर्वरीवर खरंखुरं प्रेम दिसतंय. बरं, त्यानं शर्वरीकडून काही पैसे वगैरे उकळले असते, तर तेही समजण्यासारखे होतं. पण शर्वरीच्या बोलण्यात तसंही काही आलेलं नाही. मग काय? तुला काय वाटतं? "

"काही कळत नाही गौतम. "

"हम्म. आपल्यासमोर या साखळीच्या कड्या विखरून पडल्या आहेत बापू. फक्त त्यांना जोडणारा एक धागा अजून अदृश्य आहे. एकदा तो धागा दिसला की सगळं सगळं स्पष्ट होईल. चल, मी संध्याकाळी शर्वरीच्या आईवडीलांना भेटायला 
बोलावलं आहे. बघूया त्यांच्या  भेटीतून काही नवीन कळतं का ते. "

आम्ही वर गेलो. गौतमनं कंप्यूटर सुरू केला. ई मेल्स तपासता तपासता त्याच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हसू आलं. त्यानं त्याची डायरी उघडली आणि त्यातली नोंद वाचत तो म्हणाला, " त्या दिलीपचं पूर्ण नाव काय म्हणाली शर्वरी? दिलीप वासुदेव दातार, नाही का? जीनियस! बापू कोडं सुटलं आपलं! "

"सुटलं? काय झालं मग या दिलीपचं? कुठं आहे तो? "

गौतमनं एक प्रिंट कमांड दिली आणि तो प्रिंट आऊट माझ्यासमोर धरुन काही बोलायला तो तोंड उघडणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. मी पुढं होऊन दार उघडलं. दारात एक मध्यम उंचीचे, चाळिशीच्या आसपासचे गृहस्थ उभे होते. माझ्याकडं बघून काहीसे हसत ते म्हणाले, "मी नंदकुमार दामले. शर्वरी... मुलगी माझी. मला गौतम सरदेसाईंना भेटायचं आहे. आपण...? "
"मी बापू. गौतम आत आहेत. या ना, आत या. "

दामलेंनी मोकळेपणानं माझा हात आपल्या हातात घेतला. "तुमच्याविषयीही बोलली शर्वरी माझ्याशी. तुम्हा दोघांशी बोलल्यावर खूप धीर आलाय, म्हणाली. काय बघा ना वेळ आली तिच्यावर. सोन्यासारखी मुलगी.. "

"काळजी करू नका, दामले. सगळं ठीक होईल. " मी  त्यांना आतल्या खोलीत नेत म्हणालो.

गौतमनं दामलेंना बसायला सांगितलं. तिसऱ्या खुर्चीत मी बसलो. मी दामलेंकडं निरखून पाहिलं. कोकणस्थी रंग, चाळिशीनंतरही टिकलेले घनदाट केस. ते काळजीपूर्वक वळवलेले. डायही केला असावा. उत्तम कपडे. आणि भेदक बुद्धिमान डोळे. खोलवर घुसणारे तीक्ष्ण घारे डोळे. 

 "काय घेणार? चहा? कॉफी? " गौतमनं विचारलं.

"काही नको, थँक्स. गेले चार दिवस अन्नपाण्यावरची वासनाच उडालीय आमची. ही तर खचलीच आहे. म्हणून तुमच्या मेलमध्ये तुम्ही तिला घेऊन या म्हणून लिहिलं होतं, पण काही शक्य झालं नाही ते. " दामले म्हणाले.

गौतम आपल्या खुर्चीत जरासा रेलला. "हं. तुमचं उत्तर वाचलं मी दामले. आणि ते वाचून मला वाटलं तुम्ही मिस कारखानिसांच्या आईंना बरोबर आणलं नाही तेच बरं केलं. " तो म्हणाला.

मला गौतमच्या शब्दांचं आश्चर्य वाटलं. शब्दांचं आणि शब्दांच्या निवडीचंही. 

"हो, आता निराशा पचवण्याची ताकद नाही आहे हो तिच्यात. " दामले म्हणाले. "मी त्या दोघींनाही सांगतोय गेले चार दिवस, की आपण दिलिपला विसरून जायला हवं; पण त्यांना ते शक्य होत नाहीये. शर्वरी तर.. मला भीती वाटते गौतमसाहेब, ती काही बरंवाईट तर... "

"अरे, नवल आहे. " गौतम हसत म्हणाला. "मी तर तुम्हाला आज इथं चांगली बातमी द्यायला बोलावलं होतं."

दामलेंच्या डोळ्यांत आता रागाची किंचित लाली आली. "काय.. अर्थ काय तुमच्या बोलण्याचा? " त्यांनी जरा चढ्या स्वरात विचारलं.

"अर्थ असा दामलेसाहेब, की तुमचे दिलीप वासुदेव दातार मला सापडले आहेत. "

दामले ताडकन उठून उभे राहिले. "क्क.. कुठे आहेत ते? " त्यांनी विचारलं.

गौतमनं हातातली पेन्सिल वरखाली हालवली. "खाली बसा दामले. स्वतःला फार हुशार समजता नाही का तुम्ही. आता इतक्या सहजासहजी सुटका नाही व्हायची तुमची. खाली बसा आणि मी सांगतो ती गोष्ट ऐका." 

"या पाताळयंत्री माणसाचा नीचपणा बघ, बापू, " माझ्याकडं वळून गौतम म्हणाला. " वयानं आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या बाईशी यानं लग्न केलं ते निव्वळ पैशाकडं बघून. कारखानिसांना हार्ट ट्रबल सुरू झाल्यावरच याच्या डोक्यात ती चक्रं फिरायला लागलेली असणार. पण लग्न झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की इस्टेट सगळी शर्वरीच्या नावावर आहे. जोवर शर्वरीचं लग्न होत नाही, तोवर ती बिचारी नेमानं तिच्या आईकडं पैसे देत राहील, आणि तिच्याकडून पैसे घेऊन त्याच्यावर हा हरामखोर चैन करत राहील..पण पुढं काय? एकदा का शर्वरीचं लग्न झालं की सगळा पैसा, सगळी इस्टेट गेली याच्या हातातून. "

दामलेंनी खिशातला रुमाल काढून घाम पुसला.

"मग हा करतो काय? तर शर्वरीचं लग्नंच होऊ नये यासाठी प्रयत्न करायला लागतो. एकदोनदा जुळत आलेलं लग्न नाही जमलं असं म्हणाली ती. मला खात्री आहे, यानंच त्याच्यात मोडता घातलेला असणार. पण हे फार दिवस चालणार नाही, हे कळल्यावर हा एक वेगळीच शक्कल लढवतो. "

मी अवाक होऊन ऐकत होतो. दामले खाली मान घालून बसले होते. "शर्वरी किती हळवी, किती भावनाप्रधान आहे हे आपण  बघितलं बापू. याच्याही हे ध्यानात आलेलं असणार. शिवाय शर्वरीची कमकुवत नजर. त्याचाच फायदा घ्यायचा ठरवला यानं. हा करतो काय, तर स्वतःच वेषांतर करून दातार होतो. दिलीप वासुदेव दातार. शर्वरीला हा भेटतो तेही संध्याकाळनंतर. त्याचा गॉगल, त्याचा कमकुवत आवाज, त्याचे जाड कपडे... हा फोटो बघ बापू... आणि कुणीतरी अप्रतिम मेकअप आर्टिस्ट.शर्वरीला काही शंका येत नाही. ती त्याच्यात गुंतत जाते. मग त्या आणाभाका, त्या शपथा.. कशासाठी? तर तिनं पुन्हा लग्नाचा विचारही करू नये याच्यासाठी! आणि साखरपुड्याला तो उगवतच नाही. उगवणार कसा? होणारा जावई म्हणजे खुद्द सासराच आहे ना! "

 गौतमनं दामलेंकडं तिरस्कारानं बघितलं. "अमरावतीचं घर, भुवनेश्वरची बहीण, मेव्हणे, भाचे.. सगळ्या थापा!" शर्वरीनं आणलेले इ मेलचे प्रिंट आऊट्स दामलेंसमोर टेबलवर फेकले. " इंग्रजी उत्तम लिहिता तुम्ही दामले. फ्रेंचही शिकलायत वाटतं! छान, छान! शर्वरीला आलेली 'बिले दू' काय?  यू हॅव माय 'कॅस्ट ब्लाँश' मिस्टर सरदेसाई काय? आणि शायरीची काय  आधीपासूनच आवड आहे की या कामासाठी वाचली खास? आं?"

आपल्या खुर्चीतून उठून गौतम आता खोलीत येरझाऱ्या घालत होता. " काय माणूस आहे बघ हा बापू. किती विलक्षण बुद्धिमत्ता! पण चुकीच्या ठिकाणी लावली कामाला. आपल्या बुद्धीचा माज चढला ना एखाद्याला, की तो माज उतरायलाही वेळ लागत नाही. दामले, फार मस्त गेम खेळलात तुम्ही.  पण टाईप करताना ती स्पेलचेक लावण्याची सवय तेवढी लावून घ्या बुवा. टाईप करताना 'एस'च्या जागेवर घाईघाईत कधीकधी 'ए' टाईप होतो तुमचा. या मेल्स बघा दिलीप दातारच्या आणि ही तुमची मेल मघाची. आणखीही एकदोन गोष्टी आहेत सारख्या. की सायबरक्राईमला फोन करून दोन्हींचे आय पी ऍड्रेसेस चेक करायला सांगू? पण तुम्ही तयार लोक नाही का! दोन वेगवेगळ्या ठिकाणांहूनही पाठवल्या असतील मेल्स.. "

"गंमत.. गंमत होती ती सरदेसाई" दामले तुटक आवाजात म्हणाले.

"गंमत? एखाद्या निष्पाप मुलीच्या आयुष्याशी खेळणं ही गंमत? अरे नीच माणसा... "

"हे बघा सरदेसाई, उगीच शिव्या द्यायचं काम नाही. " दामलेंच्या आवाजात आता मग्रुरी आली होती. ते उठून उभे राहिले होते. "तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो. बाकी तुमची काय तक्रार असेल तर तुम्ही पोलिसात जा, कोर्टात जा... "

"पोलीस! हूं! " गौतम तुच्छतेनं म्हणाला. दामलेंच्या समोर उभं राहून त्यानं दामलेंच्या डोळ्यांत रोखून बघितलं. "दामले, एक लक्षात ठेव. पुन्हा त्या मुलीला काही त्रास होता कामा नये. तिच्या केसालाही धक्का लावशील तर पस्तावशील. तिच्यामागं कुणी नाही असं समजू नकोस. तिच्यामागं हा गौतम सरदेसाई आपल्या सगळ्या शक्तीनिशी उभा आहे... "

"आणखी काही? " दामले कुर्ऱ्यात म्हणाला.

"गेट आऊट! "

दामलेंनी नाटकीपणानं मान झुकवली आणि बुटांचा टपटप आवाज करत ते निघून गेले.

गौतमनं सिगरेट पेटवली. "तुला माहिती आहे, बापू, आफ्रिकेतल्या जंगलांत काही वेली आहेत. पहिली काही वर्षं त्या अगदी निरुपद्रवी, अगदी सामान्य असतात. एका ठराविक वयानंतर बाकी त्यांच्यातल्या रसाचं जणू जहर व्हायला लागतं. त्यांच्या लाईफसायकलच्या एका विशिष्ट स्टेजला त्या अगदी विषारी, प्राणघातक होतात. असं का होतं हे अद्याप कुणालाही कळलं नाही. पण तसं ते होतं खरं. हा माणूस, दामले, तसलाच वाटतो मला. मूळचा हुशार, अगदी प्रतिभावान, पण अक्कल कुठे वापरली बघ त्यानं.. "

मी काहीच बोललो नाही.

"आणखी एक, एखादा कलाकार जसा आपल्या कलाकृतीवर कुठेतरी आपली स्वाक्षरी नोंदवून ठेवतो, तसे हे गुन्हेगारही आपल्या गुन्ह्यांवर कुठेतरी आपले फिंगरप्रिंट्स ठेवून जातात. भिंतीत कलात्मक भोक पाडून चोरी करणारा आणि 'कल जब लोग देखेंगे तब प्रशंसा होनी चाहिये' म्हणणारा 'उत्सव' मधला चोर आठवतो ना तुला. या गुन्ह्यावरही दामलेनं स्वतःची एक स्वाक्षरी ठेवली आहे. त्यामुळंच तर मला पक्की खात्री पटली.

"काय? कुठली स्वाक्षरी? "

"दिलीप. दिलीप वासुदेव दातार. त्याची आद्याक्षरं घे, दि. वा. दातार. काही आठवतं? "

"दिवाकर दातार! "

"बरोबर! बाकी गोष्टींनी माझा संशय बळावतच चालला होता, या एका गोष्टीनं बाकी खात्री झाली. " गौतम म्हणाला.  

"पण गौतम.. हा माणूस... काका म्हणते ती मुलगी त्याला. कित्येक वर्षांचे संबंध त्यांचे. तो माणूस इतका नीचपणा करू शकेल? कशासाठी? फक्त - फक्त पैशासाठी? माणूस इतका घसरू शकतो? "

"हेच बापू, हेच. मी म्हणत होतो ते जळतं, धगधगीत वास्तव हेच. सगळी नाती, मानवी मूल्यं आणि कायकाय तुमच्या शब्दांच्या कागदी होड्या बुडवून टाकणारा माणसाचा स्वार्थ, माणसाची विकृती, हेच ते वास्तव. आता मला सांग बापू, आहे का कुणा लेखकाच्या लेखणीत ताकद.. असलं काही कागदावर आणण्याची? "

"पण हा हलकट तर... आणि त्याला शिक्षा काहीच नाही? "

"दुर्दैवानं - काहीच नाही. या खोलीत जे झालं ते आपण न्यायालयात सिद्ध करू शकणार नाही, आणि सिद्ध झालं तरी एखाद्या मुलीचा प्रेमभंग करणं याला आपल्या घटनेत शिक्षा नाही अजून. "

"आणि शर्वरी.. तिचं काय? "

"आपण काय करू शकतो बापू? तिला सावध करणारं एक पत्र टाकतो मी आज. स्पष्ट काही लिहीत नाही, पण त्या दामलेपासून जरा सावध राहा, असं लिहितो. तिला 'ता' वरनं ताकभात कळत असेल, तर तिच्या लक्षात येईल. नाहीतर ती आणि तिचं नशीब. त्या दिलीपच्या स्वप्नांतून बाकी ती काही बाहेर येईल असं वाटत नाही. पण दिलीपच्या गायब होण्यामागं दामलेचा हात आहे, एवढं जरी तिला कळलं, तरी दामले संपलाच म्हणून समज.  अरे, एखाद्या स्त्रीच्या स्वप्नांशी खेळणं म्हणजे वाघिणीच्या गुहेत शिरून तिच्या बछड्यांना हात घालण्यासारखं आहे. होय की नाही? घे, सिगरेट घे बापू. "

(सर आर्थर कॉनन डॉइल यांच्या ' अ केस ऑफ आयडेंटिटी' वर आधारित )