................................................
बेट पाचूचे...!
................................................
मनाजोगे नवे काहीच करता येत नाही!
जुने विसरूनही काही विसरता येत नाही!
स्वतः होऊन कोणीही शहाणा वा न वेडा...
तसे कोणासही काहीच ठरता येत नाही!
तरू उंचावुनी बाहू, नभाला दुःख सांगे...
'मला बहरायचे आहे... बहरता येत नाही! '
पुन्हा ये जन्मठेपेची सजा भोगायला तू...
... असे वाटेवरी अर्ध्याच मरता येत नाही!
उगा देतोस चंद्राला कशाला दूषणे तू?
तुला हे चांदणे रात्रीत भरता येत नाही!
चुका केल्याच मी नाहीत, केली चूक ही मी...
गुन्हा माझ्यावरी त्यांना गुदरता येत नाही!
तुझ्या देहात आहे बेट पाचूचे... खरे का?
म्हणे कोणासही तेथे उतरता येत नाही!
- प्रदीप कुलकर्णी
................................................
रचनाकाल ः २६ एप्रिल २००९
................................................