संस्कार.. म्हणजे नक्की काय असतं?

आमच्या म्हणजे अनू आणि माझ्या आयुष्यात आता नवीन पाहुण्याची चाहूल लागली आहे. आनंदतर ओसंडून वाहतोच आहे पण सोबत एक काळजी देखिल लागली आहे... "संस्कार".. आई-वडील आपल्या अपत्यावर करतात ते... पण संस्कार म्हणजे नक्की काय असत? हे कोडे काही केल्या मला सुटत नाही आहे. आपण आपल्या अपत्यावर योग्य संस्कार करू शकू की नाही? त्याला योग्य ते वळण लावू शकू की नाही?. असे अनेक प्रश्न सध्या मला त्रास देत आहेत. मग विचार केला की जरा आयुष्यात मागे वळून पाहावे आणि बघावे माझ्या बालपणात काही धागे-दोरे मिळतात का ते.

माझे बालपण तसे फार ऐशो-आरामात गेले नसले तरी आई-वडिलांनी कशाचीच म्हणून कमी पडू दिली नाही. कपडे, वह्या-पुस्तक, चप्पल-बूट वगैरे. बाबांची सरकारी नोकरी होती. बेताचाच पगार होता. घरी २ बहिणी, मी आणि आई-बाबा असे कुटुंब. मी एकुलता एक मुलगा, सर्वात लहान, त्यामुळे बहिणी सारख्या म्हणायच्या.. 'आई तू प्रसादचे लाड जास्त करते'.. (मला बरे वाटायचे पण अभ्यासाबद्दल आई जेव्हा मला फोडून काढायची तेव्हा मात्र माझ्या बहिणीची समजूत किती खोटी आहे हे कळून चुकायचे)

काल आम्ही असेच मॉलमध्ये शॉपिंग करत असताना एक मुलगा आपल्या वडिलांकडे हट्ट करत होता. त्याला एक महागडी बंदूक हवी होती. तो मुलगा खोटे-खोटे अश्रू काढून धिंगाणा करत होता. शेवटी त्याच्या वडिलांनी 'तू काही ऐकणार थोडीस आहेस' असल्या सौम्य शब्दात कंटाळून त्याला होकार दिला.

मला ह्या प्रसंगावरून माझ्या बालपणीचा एक प्रसंग आठवला. मी ४-५ वीत असेन. आमच्या वाड्याच्या बाजूला एक "आनंदाश्रम" नावाचे लॉज होते. त्याचा मालक गुजराथी होता. त्यांचा मुलगा आणि आम्ही वाड्यातले ३-४ मूल असा ग्रुप होता. दुपारी १ ते ४ लॉज बंद असायचा, आणि सुट्टीमध्ये आमचा ग्रुप दुपारी तेथे खेळायचा. दिवाळीची सुट्टी सुरू झाली होती. एक-दोन दिवसांवर दिवाळी आली होती. मी बाबांकडे फटाके, टिकल्यांची बंदूक वगैरे आणण्यासाठी भुण-भुण सुरू केली होती. बाकी सगळ्यांनी बहुतेक फटाके, टिकल्यांची बंदूक वगैरे आणली होती.

'आज जायचे ना फटाके आणायला? '- मी बाबांना घरी आल्या-आल्या विचारले.

'उद्या नक्की जाऊ हं आपण'- असे बोलून बाबा चहाचा घोट घेऊ लागले.

मी हिरमुसून बाहेर खेळायला निघून गेलो. (त्या वेळेला बाबांकडे हट्ट धरण्याचे धाडस आमच्यात नव्हते.. चुकून केलाच तर बाबा काही न बोलता नुसते डोळे मोठे करायचे.. आणि आम्हा "समजदार" को ये इशारा काफी होता था. :-) ). आमचा ग्रुप खेळत असताना त्या लॉज मालकाचा मुलगा त्याची नवीन बंदूक नाचवत धावत आमच्या कडे आला. सिनेमा मध्ये डाकूंकडे जशी बंदूक असते तशीच होती ती टिकल्यांची बंदूक. मलातर फार आवडली होती ती बंदूक. बस्स!! ठरवलं आपणही हीच बंदूक घ्यायची. ह्या आनंदात झोपलो. दुसऱ्या दिवशी रविवार होता, बाजाराचा दिवस(तेव्हा आता सारखे मॉल नव्हते.. दर रवीवारी आठवडी बाजार भरायचा). आज फटाके आणायला जायचे हे नक्की होते.

मी आणि बाबा बाजारात निघालो. पहिले भाजी, किराणा वगैरे खरीदी झाली आणि नेहमीप्रमाणे बाबा मला त्यांच्या मित्राच्या फटाक्यांच्या दुकानात घेऊन गेले. मी मात्र ती बंदूक शोधत होतो. माझे फटाक्यांकडे काही लक्ष नव्हते.

'बंदुकीचा रंग बघून घे, नाहीतर मागच्या वेळे सारखं वापस यावे लागेल' - बाबांच्या या वाक्याने मी भानावर आलो.

'मला ही बंदूक नको. काका तुमच्याकडे ती दुसरी बंदूक नाही का? ' मी आपल्या हातावर त्या बंदुकीचे माप त्या दुकानदाराला दाखवत म्हटले.

'कुठली दुसरी? अरे नेहमी आपण हिच घेतो ना मग? ' - बाबा. 'नाही मला ती बंदूक पाहिजे. ' मी बाजूच्या दुकानातली मला आवडलेली बंदूक दाखवत म्हटले. मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. बाबांनी प्रथम त्याची किंमत विचारली.

'२५ रुपये का एक'-दुकानदार

'अरे!! ही खूप महाग आहे, आपण आपल्या नेहमीच्या काकांच्या दुकानातूनच घेऊ' बाबांनी मला दुकानाबाहेर काढत म्हटलं. तेव्हाचे २५ रुपये म्हणजे आताचे १०० रुपये. बाबा नुसत्या ४ दिवसांकरता एवढे पैसे खर्च करणार नव्हते. पण मी या वेळेस थोडा हट्ट सुरू केला. बाबांनी एक-दोनदा समजून बघितले. डोळे मोठे करून बघितले. पण मी काही ऐकायला तयार नव्हतो. मग मात्र बाबांनी जरा वरच्या स्वरात बोलणे(आताची मुले त्याला जोर-जोरात रागावणे असे म्हणतात)सुरे केले.

'प्रसाद, ती बंदूक फार महाग आहे. आपल्या जवळ एवढे पैसे नाही आहेत. '

'पण संदीप कडे आहे ती बंदूक. मला तीच पाहिजे' मी काहीसे रडवेल्या स्वरात म्हटले.

'संदीपच्या बाबांकडे खूप पैसे आहेत. आपण तसे श्रीमंत आहोत का?.. तुला समजत नाही का? ' बाबा माझ्या पाठीत एक धपाटा घालत बोलले.

मला आता कळून चुकले होते की मला ती बंदूक मिळणार नाही. नंतर पुन्हा असा हट्ट करण्याची हिंमत मी करू शकलो नाही.

पण मला मात्र भेडसावत असलेल्या 'संस्कार.. म्हणजे नक्की काय असत? ' या प्रश्नाचे उत्तर सापडले होते.

प्रसाद

(प्रवास..)