वाटले अश्रू तुझा मी पांघरावा;
रोम रोमी रक्त म्हणुनी पोचवावा..!
का तुलाही वाटते माझ्याच संगे..
खेळ हा दश अंगुल्यांचा खेळवावा? *
प्रार्थनेला मंदिरी आलीच नाही;
हात मग कोणाकडे मी पसरवावा?
हा नियम अंती तुझ्यासंगेच शिकलो,
'हात हाती घेतल्यावर सोडवावा'..!
सोडले जेथे मला तू 'जीर्ण' म्हणुनी..
त्याच रस्त्यावर तुझा पत्ता मिळावा?
भेदले माझ्या मनाचे सात पडदे
ओळखीचा एकही ना सापडावा?
नाव माझे 'अजय' आहे एक डगला;
आतला माणूस कोणी ओळखावा..!
* दशांगुली नियम - दहा अंगठ्यांचे अंतर - वेदान्ताप्रमाणे अर्थ घ्यावा.