चायपे बुलाया है...(भाग १)

जपानविषयी मला अगदी लहानपणापासूनच आपुलकी वाटत आली आहे ती चहामुळे. योगायोगाने इथेही चहाला "चा" असंच म्हणतात. कॉफी ही जरी चहाचीच श्रीमंत घरात दिलेली बहीण असली तरी चहा मात्र पहिल्यापासूनच कांदेपोहे, बटर, केक, भजी, खारी बिस्कुट ह्या सर्वांना जोडणारा; चांदीच्या किटलीत आणि मातीच्या कुल्हडमध्येही "ठेविले अनंते" म्हणत सुखेनैव राहणारा मध्यमवर्गीयच आहे असं मला नेहमी वाटतं. जपानमध्ये मिळणारे ओचा (green tea), ऊलॉंगटी, मुगीचा, हर्बल टी असे अनेक आचरट प्रकार मी केवळ ते चहा आहेत म्हणून सहन करते. पण अजूनही जगप्रसिद्ध टी सेरेमनी बघण्याचा योग काही आला नव्हता.

एकदा मी तसं योशिदासानना बोलून दाखवलं. योशिदासान म्हणजे जपानमधल्या माझ्या सबकुछ. इतक्या की आई त्यांना "यशोदा" सानच म्हणते. मला स्वतःला त्या छोट्या केसांचा, शर्टपॅंट घालणारा, मेकअप करणारा देवच आहेत की काय असं वाटतं. कारण मी त्यांना काहीही म्हटलं की त्या तथास्तु म्हणून इच्छा लगेच पूर्ण करतात. त्यातून टी सेरेमनी म्हणजे योशिदासानचं होमपिच. बारा गावचं पाणी प्यावं तसा त्यांनी बाराशे सेरेमनीचा चहा प्यायला असेल. त्यामुळे लगेचच पुढच्या वीकांताला जपानी टी सेरेमनी पाहायला त्या मला घेऊन गेल्या.

त्या दिवशी बसलेल्या धक्क्यांची सुरुवात योशिदासानला भेटल्या क्षणापासून झाली. आपली "मेहेबूबा मेहेबूबा" वाली हेलन जर अंगभर साडी, खांद्यावर पदर, अंबाड्यात गजरा, कपाळावर कुंकू अशा अवतारात उभी राहिली तर साक्षात सलमानसुद्धा जसा तिला ओळखणार नाही तसं मी त्यांना ओळखलंच नाही. गुलाबी रंगाचा चेरीच्या पाकळ्यांचं डिझाइन असलेला किमोनो, त्यावर जांभळ्या रंगाचा चापूनचोपून बसवलेला दप्तरासारखा ओबी, त्यांच्या गोल चेहऱ्याच्या परिघावर शिस्तीत बसलेले केस, आणि चेहऱ्यावर पडलेलं किमोनोचं गुलाबी प्रतिबिंब…फेब्रुवारीतच पाहिला की मी वसंत!

टी सेरेमनीचं स्पेलिंग सोडल्यास आमची पाटी कोरी होती. त्यामुळे गाडीतून जाताना योशिदासानी 'धावतं'वर्णन केलं. एरवी जपानात जो हिरवा "ओचा" पितात त्याहून अधिक पौष्टिक "माच्चा" नावाचा चहा टी सेरेमनीला पितात. चहाला जमलेल्या मंडळींच्या संमेलनाला "चाजी" किंवा "ओचाकाई" असं म्हणतात तर प्रत्यक्षात चहा करण्याच्या कलेला "सादो" (茶道) असं म्हणतात. ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ अनुक्रमे 'चहा'आणि 'मार्ग'असा आहे. चहा पिण्यातून जे पावित्र्य, साधेपणा, शांतता मिळते तोच जगण्याचा मार्ग आहे असं कदाचित ह्यातून झेन धर्माला सांगायचं असावं. आपण जसा चहा करतो, टाकतो किंवा ठेवतो तसंच जपानीत "ओचा तातेरू" (お茶 立てる) असं म्हणतात. ’'तातेरू' म्हणजे 'उभा करणे'. यजमानांनी उभा केलेला चहा पाहुण्यांनी वज्रासनात बसून प्यायचा की झाली टी सेरेमनी! हाय काय आणि नाय काय!

पण प्रत्यक्षात चहाचा मार्ग भलताच वळणदार होता. ही टी सेरेमनी आतापर्यंत फक्त गुळगुळीत मासिकातच पाहिलेल्या भव्य हॉटेलच्या एका हॉलमध्ये होती. त्या झुळझुळीत सिल्कच्या जगात आमचं कॉटन उगीचच लक्ष वेधून घेत होतं. आत शिरलो तर दारातच घोळका करून लोक काहीतरी पाहत होते. बघितलं तर एका कागदावर ब्रशने एक मोठ्ठं शून्य काढलेलं होतं. आणि ते बघून सगळे "सुगोई (सही)" "उत्सुकुशिइ (सुंदर)" असं म्हणत होती. "अरे हे तर नुसतंच शून्य आहे! " नागड्या राजाच्या गोष्टीतल्या लहान मुलाच्या निरागसतेने मी म्हटलं. तर आजूबाजूच्या बायका फिस्सकन हसल्या. आणि योशिदासाननी माझ्याकडे "म्हणून मी तुला कुठे नेत नाही! " असं बघितलं. दहा डिक्शनऱ्या सरसावल्या पण कुणालाही अर्थ सांगता आला नाही. चहा हे जपान्यांसाठी निसर्गाशी किंवा स्वतःशीच तादात्म पावण्याचं एक साधन आहे. टी सेरेमनीतून मिळणाऱ्या पूर्णत्वाचं शून्य हे प्रतीक असावं असा मी अंदाज केला.
 

ते चित्र धरून त्या खोलीत तातामी चटया, चहाचं सामान, एका कोपऱ्यात अगम्य जपानी कॅलिग्राफीमध्ये लिहिलेला तक्ता, एक आजी आणि शांतता एवढंच होतं.

  

त्या आजींनी सगळ्या पाहुण्यांना बसायला सांगितलं. बसण्याची जागा मनाप्रमाणे नव्हे तर मानाप्रमाणे ठरवली जाते. त्यामुळे मी इतर सगळे बसल्यावर वज्रासनात बसले. आणि सेरेमनी सुरू झाली.

काय मजा आहे बघा! आपल्याकडचा गप्पिष्ट चहा जपानात जाऊन एकदम गप्पगप्प होतो. इथे यजमानांच्या वतीने त्या आजी आणि पाहुण्यांच्या वतीने आमच्यातल्याच एक अनुभवी काकू एवढी दोनच माणसं एकमेकांशी बोलत होती. गप्पादेखील आभारप्रदर्शन, हवापाणी आणि चहा ह्याच्या पलीकडे जात नव्हत्या. बाकीचे लोक गंभीर चेहरा करून माना डोलवत होते. चहाचा पत्ताच नव्हता.

एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि बदाम हलव्यासारखी दिसणारी गुलाबी मिठाई आली. ती खायला जाणार एवढ्यात... काहीतरी टोचलं…

क्रमशः