...................................
ती...!
...................................
तिच्या डोळ्यांत होते चांदणे;
ती सावळी होती!
तशी ती चारचौघींहून थोडी
वेगळी होती!
तिला पाहून वाटे की,
असावी खूप ती दुःखी...
तशी हासायची केव्हातरी!
गाली खळी होती!
स्वतःला घेतले होते जरी
बांधून मौनाला...
तशी बोलायला गेलीच तर
ती मोकळी होती!
कधी बहरातसुद्धा
पार कोमेजून ती जाई...
कधी बहरायच्या आधीच
फुललेली कळी होती!
तिने लागू दिला नाही
मनाचा थांग केव्हाही
समुद्राहून एखाद्या
जणू ती वादळी होती!
दिसेनासे मला होई
तिच्या प्रेमापुढे काही...
तशी प्रेमात माझ्याही
म्हणे ती आंधळी होती!
तसे अगदीच आम्ही
सारख्याला वारखे होतो...
मला ती बावळट
संबोधणारी बावळी होती!
मनाने रापलेली ती
कधी भेटेल का आता....?
असावी का तशी
तेव्हा जशी ती कोवळी होती?
- प्रदीप कुलकर्णी
...................................
रचनाकाल ः १० एप्रिल २००९
...................................