ह्यासोबत
मुंबई गोवा रस्त्यानं मुंबईच्या बाजूनं निघालात की शंभर एक किलोमीटरवर खांब नावाचं गाव लागतं आणि या गावातनंच डाव्या हाताला पूर्वेला जाणारा एक छोटासा फाटा गेलाय. कधी या फाट्यानं आत गेलायत? मुख्य रस्ता सोडून आत शिरलं की अगदी पाचच मिनिटात मुख्य रस्त्याची गजबज, वाहनांची ये जा, लोकांची वर्दळ, घरं, हॉटेलं सारं मागे पडतं आणि चित्रपटाचं दृश्य क्षणात बदलावं तदवत एका दुसऱ्याच दुनियेत शिरल्यासारखं वाटतं.
छोटासा अरुंद नागमोडी वळणं वळणं घेत जाणारा रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट वृक्षराजी. या रस्त्यानं जसं जसं आणखी आणखी आत जाल, तसतशी निसर्गाची अदभुत किमयाच समोर दृष्टिपथात येत जाते. छोट्या छोट्या टेकड्यांचा हा प्रदेश आणि चहुवार पसरलेलं घनदाट जंगल. रस्ता या जंगलातनं आणि या टेकड्यांवरनं चढत, उतरत, वेडी वाकडी वळणं घेत अधिक अधिक अनाकलनीय होत जातो. समोरच्या दिशेला उंच लांब बघितलंत तर सह्याद्रीच्या अभेद्य रांगा दिसतात. अन तुमचा रस्ता जणू या सह्याद्रीचा अनंत वेध घेत पुढे जात राहतो. छोट्या टेकाडांवरची जंगलं अधिक अधिक घनदाट होत जातात आणि गाडीवाट संपून त्याची पाऊलवाट कधी होते कळतही नाही.
याच टेकड्यांच्या पायथ्यातून वाहते शांत, प्रसन्न, स्थितप्रज्ञ कुंडलिका. आणि अशा या निसर्गदत्त परिसरात कुंडलिकेच्या काठी वसलंय तसंच एक निसर्गदत्त खेडं. वढाळ. खेडं कसलं उगाच चार घरांची एक वाडी. शहरीकरणाचा मागमूसही नसलेली. मातीच्या भिंतींच्या अन गवतानं शाकारलेल्या झोपड्यांची वाडी. गावातले लोक सगळे बहुतेक कातकरीच. निसर्गाच्याच संपदेवर आपला उदर निर्वाह चालवणारे. प्रत्येकाची थोडी थोडी जमीन आणि यातही मुख्य करून आंबा, फणस, काजू, जांभूळ अशी वृक्ष संपत्तीच असलेली. शेती जवळ जवळ नाहीच. बाकी जंगलातही इतर झाडझाडोऱ्याची काहीच कमी नाही. चिंच, वड, पिंपळ, ऐन, किंजळ, पांगारा, साग, हिरडा, बेहेडा, हळद्या अन किती किती. दिवसा वढाळातले लोक हिरडे, बेहडे, बिब्बे, सागरगोटे, रामेठा, अश्वगंधा, शिकेकाई, शतावरी, चिंचा, आवळे, जांभळं अशी जंगलातली संपदा गोळा करायला जातात आणि तिन्हीसांजेला पारावर गप्पा मारायला जमतात. आणि अंधार पडायला लागल्यावर जेवणं खाणं करून चिडीचूप झोपून जातात आणि मग थोड्याच वेळात कंदीलातल्या वाती विझत विझत जाऊन वढाळ अंधारात तादात्म्य पावतं... पूर्ण शांत... निःस्तब्ध.
वढाळापासून दोन हाकेच्या अंतरावर जरा दूर, गावाच्या मसणवट्याला लागून एक जुनी झोपडी. ताईची झोपडी... एकांतात उभी असलेली... भयाण भीतीदायक... अन या झोपडीत रहायची ताई... अशीच एकटीच...एकांतात... भयाण. तिन्हीसांजेनंतर ताईच्या झोपडीच्या बाजूला जायला एकटा दुकटा गावकरी घाबरायचा. तसं ताईनं आजपर्यंत कधी कुणाला त्रास दिलेला नव्हता. पण ताई चेटूक करायची, तिला काळी विद्या, मंत्र तंत्र, जारण तारण असलं काही बाही अवगत होतं असं गावकरी म्हणायचे. अमावस्येच्या रात्री तिच्या झोपडीच्या अवती भवती दिवट्यांचा नाच बघितल्याचंही काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं.
ताई... तीही तशी गावकरीणच, पण ती ना कधी कुणाच्यात मिसळायची ना कधी कुणाशी फारसं बोलायची... तिला आई, वडिल, मूल, बाळ कुणीच नव्हतं... लहानपणापासनंच एकटीच रहायची... दिसायला सुंदर गोरीपान, अंगानं उंच नींच, घारे डोळे पण तीक्ष्ण अन भेदक नजर... कपाळावर मोठं कुंकू अन त्याखाली निळी गोंदलेली छोटीशी चांदणी... आणि मोठे लांबसडक केस पाठीवर कायम मोकळे सोडलेले... रोज तिन्हीसांजेनंतर रात्री उशीरापर्यंत ताई एकटीच आपल्या झोपडीत तंत्र मंत्र, घोर क्रिया असलं काय काय करत रहायची. भूताखेतांशी, समंधांशी, हडळींशी संवाद साधत रहायची.
आज अमावस्येची रात्र... सारं गाव चिडीचूप झोपलं होतं. ताईच्या झोपडीत मात्र दिवटीच्या उजेडात काहीतरी घोर क्रिया चालली होती. ताई एक मोठा प्रयोग करून बघत होती. दिवसा वरच्या जंगलातनं ताईनं मुद्दाम शोधून आणलेलं आंब्याचं एक जुनं वाळलेलं मोठं खोड ताईनं तिच्यासमोर उभं ठेवलं होतं. त्याचा आकार मुंडकं नसलेल्या शरीरासारखा होता. दोन बाजूच्या दोन जाड फांद्या हातांसारख्या, मधलं खोड छाती अन पोटासारखं अन खालच्या बाजूला फुटलेले दोन फाटे पायांसारखे भासत होते. कणकेचा एक गोळा करून ताईनं त्या खोडाच्या वरती मुंडक्यासारखा चिकटवला होता. त्याला मोठं उभं कुंकू लावलं होतं अन जागोजाग त्याला काळे तीळ चिकटले होते. त्या सांगाड्याच्या समोर खाली पट मांडला होता आणि त्यावर कसलीतरी आकृती काढली होती अन चार पाच बिब्बे, एक ताईत आणि एक काळी छोटी बाहुली ठेवली होती. ताई त्या पटासमोर मांडी घालून बसली होती आणि तीक्ष्ण नजरेनं त्या बाहुलीकडे बघत जोरजोरात काहीतरी पुटपुटत होती. अन अचानक बाजूला ठेवलेले काळे तीळ तिनं बाहुलीला फेकून मारायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर मोठमोठ्या आवाजात बाहुलीला आज्ञा पण सोडायला लागली...
"याला जागा कर... उठव... त्याला प्राण दे... उठव... उठ्ठssव... याला प्राण दे... मला राखणा दे.. या माझ्या वतनाच्या जागेला राखणदार दे... उठव... जागा कर... " पुन्हा शांतता... पुन्हा जोरजोरात पुटपुटणं.. पुन्हा आज्ञावली... पुन्हा तीळ... ताईची नजर बाहुलीवरून क्षणभरही ढळत नव्हती...
अन अचानक आंब्याचं खोड थोडंसं हललं... पुन्हा हललं... पुन्हा थोडंसं हललं... ताईच्या चेहेऱ्यावर स्मित पसरलं...
"उठव... याला प्राण दे... याला जिवंत कर... उठव... " ताई आज्ञा देत होती आणि आंब्याच्या खोडात खरंच जीव यायला लागला होता. त्याला खूप त्रास होत होता असं वाटत होतं, पण ताई सोडायला तयार नव्हती.
"ये... या खोडात ये.... चल... आता ये या खोडात... उठ चल... " ताई जोर जोरात आज्ञा देत होती आणि खोड जास्त जास्त सक्रिय होत होतं. ताईच्या चेहेऱ्यावर छदमी हसू उमटत होतं.
"हां... अस्सा.. चल ये... चल ये... चालायला सुरुवात कर. अरे... तुला तर सगळं काही येतंय... उठ... "
खोडानं हातपाय हलवायला सुरवात केली. कणकेच्या गोळ्याचं रुपांतर हळू हळू मानवी चेहेऱ्यात होत होतं... पुरुषाचा चेहेरा... रुपवान... सामर्थ्यवान पुरुषाचा चेहेरा... ताई स्वतःच्या कलाकृतीवर बेहद्द खूष होत होती. तिच्या अवगत काळ्या विद्येतला हा सगळ्यात अवघड प्रयोग होता आणि तो तिच्या अपेक्षेबाहेर यशस्वीपण होत होता. बघता बघता आंब्याच्या खोडाच्या ठिकाणी एक रुबाबदार पुरुष उभा राहिला. उंचापुरा... गोरापान... कुरळ्या केसांचा... भव्य कपाळ असलेला... जादुई डोळे असलेला... सरळ नाक रुंद जिवणी... रुंद खांदे... भरदार छाती, अगदी साक्षात मदनाचा पुतळा. ताई त्याला बघून स्तिमित झाली. अजूनही पटासमोर मांडी घातलेल्या अवस्थेतच बसलेल्या ताईनं पुन्हा जोरजोरात मंत्र पुटपुटायला सुरवात केली... एका हातानं आता ती समोरच्या पुरुषावर तीळ फेकत होती...
"ताई... ताई... " आंब्याच्या आता सजीव खोडानं, त्या पुरुषानं हलकेच हाक मारली... ताई बेभान झाली... तिचा प्रयोग यशस्वी झाला होता. दोन्ही हाताच्या मुठी आवळून किंचाळल्यासारखं ती जोर जोरात हसली.
"ताई... ताई... मला जिवंत केलंस आणि हे रुप दिलंस... आता मला काम सांग... " पुरुष आज्ञाधारकपणे ताईला विचारत होता.
"हाः हाः हाः हाः... हाः हाः हाः... अरे बाबा मला तर नुसता एक राखणदार हवा होता. पण तू तर साक्षात कामदेवच तयार झालायस... तुझ्यासाठी आता कामही तुझ्या लायकीचंच बघायला लागणार...
"कामदेव?... ताई... मी भूत योनीतला. मला देवाची उपमा का देतेस? "
"हाः हाः हाः ... वारे वा... म्हणजे तुला अक्कल पण मिळालीये तर... वाह... अरे तुझं रुपडं तर एकदा बघ म्हणजे कळेल तुला कामदेव का म्हणतीये... अरे या मनुष्य योनीतल्या यच्चयावत सगळ्या बायका भाळतील तुझ्यावर...हाः हाः हाः हाः... "
"ताई... मी तुझा आज्ञाधारक सेवक... पण खरंच एवढं चांगलं रुप दिलंयस तू मला? " पुरुष नम्रतेनं बोलत होता.
"हाः हाः हाः हाः ... थांब आधी तुझं नाव ठेवू या आपण... अंsss... हं... तुझं नाव कामराज... वाह काय नाव आहे... अगदी तुला साजेसं..." ताई आनंदानं अक्षरशः वेडी व्हायची राहिली होती. "कामराज... कामराज... हाः हाः हाः हाः ... "
"ताई, आता नाव कामराज ठेवलंयस... पण नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा तर देणार नाहीस ना? " कामराजनं मिष्कीलपणे विचारलं.
"अरे वा... विनोद बिनोद पण करता येतात की तुला... "
"ताई... माझी फार एक जुनी इच्छा आहे... मला... मला या वढाळातून बाहेर काढशील? "
"अरे बाबा आता तुला तयारच केलाय तर तुझ्या इच्छाही पुरवायला पाहिजेत... नाहीतर माझ्याच मानगुटावर बसशील... बोल काय करायचंय? "
"मला माणसांच्या दुनियेत जायचंय... या जंगलातनं बाहेर... लांब शहरात... त्या झगमगत्या दुनियेत.. "
"अरे तिथं काय ठेवलंय?... ही आपली दुनिया... ही खरी... "
"ताई... तिथे खरी मजा आहे... मला तिथे जायचंय ताई... एवढं कर ना माझ्यासाठी... "
"अरे वा... कामराज महाराज, मनसुबे तर मोठे आहेत तुमचे.. अं? "
"ताई... तुला काय अशक्य आहे?... मला माणसाचं रुप दिलंस... आता त्या रुपासारखंच नशीबही दे की... माणसाचे भोग मलाही उपभोगू दे की... "
कामराजचं बोलणं ताई स्तिमित होऊन ऐकत होती. "वेड्या ते सगळं मायावी असतं... खोटं... बुजगावण्यासारखं... "
"ताई, ते खोटं?... अन हे? हे सारं असं वडा-पिंपळाला लटकून राहणं... असं मसणवट्यांमधनं फिरत राहणं... हे खरं? इथे ना कुठच्या भावना... ना कुणाचं प्रेम, ना माया, ना ममत्व... आता तू संधी दिलीयेस तर त्या खऱ्या प्रेमाची गोडी मला जरा चाखू दे ताई... " कामराज विनवणीच्या स्वरात बोलत होता.
"हाः हाः हाः हाः ... हाः हाः हाः हाः... " ताई किंचाळल्यासारखं हसत होती. "मूर्खा पस्तावशील... "
"चालेल ताई... त्याचीही तयारी आहे... "
"चल तर... एवढा हट्टच करतोयस तर चल सोडते तुला त्या झगमगत्या दुनियेत... जा... नाहीतरी तुझ्यासारख्याला इथे जंगलात मी तरी दुसरं काय काम देऊ? जा... जा... "
"ताई... " कामराजला ताईचे उपकार कसे मानावेत हेच कळत नव्हतं.
"जा... कामराज... पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव... ती दुनिया तुला वाटते तशी नाहीये. खूप घाणेरडी आहे... त्यामुळे सांभाळून रहा... आणि हा ताईत जपून ठेव... " ताईनं एक चपटा ताईत कामराजकडे फेकला. "तुझा जीव या ताईतात आहे... परत यावसं वाटलं की ताईत छातीशी धरून माझं स्मरण कर... मी तुला लगेच परत घेऊन येईन... झगमगत्या दुनियेत तुला आवश्यक असणारे झगमगते कपडे लत्ते, बोलणं-चालणं, भाषा, पैसा-अडका सारं सारं तुला योग्य वेळेला मिळत जाईल ... त्याची काळजी करू नकोस... जा आता... टळ आता इथून... जा ... " आणि ताईनं काळी बाहुली उचलून हातात धरली आणि पुन्हा जोर जोरात मंत्र पुटपुटायला सुरवात केली....
- क्रमशः