ह्यासोबत
सकाळी नऊ साडे नऊचा सुमार असेल. एक रुबाबदार सुटाबुटातला तरुण ताजच्या पायऱ्या चढून आला आणि दारवानानं अदबीनं त्याच्यासाठी दार उघडून धरलं. या व्यक्तिकडे बघताच कुणालाही जाणवायचं की ही नक्कीच कुणी बडी असामी असणार.
"गुड मॉर्निंग सर. कॅन आय हेल्प यू? " नाजूक स्वागतिकेनं नाजूक स्वरात विचारलं.
"अं... यस्स. आय हॅव बुकींग हीअर... " स्वागतिकेच्या डोळ्यात बघत त्यानं आत्मविश्वासानं सांगितलं. त्याच्या त्या जादुई नजरेनं स्वागतिकेच्या गालावर हलका रक्तिमा आला.
"युअर नेम प्लीज... " स्वागतिकेनं लाजत मंद स्मित करत विचारलं.
"का म रा ज... " प्रत्येक अक्षरावर जोर देत त्यानं सांगितलं.
"वन मोमेंट मिस्टर कामराज". पुढच्या काही मिनिटातच सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या आणि मिस्टर कामराज त्यांच्या दिमाखदार खोलीत प्रवेशते झाले.
इथून पुढच्या गोष्टी आधीच ठरवल्याप्रमाणे भराभर घडत गेल्या. कामराजला झगमगतं शहर, इथली श्रीमंती, इथल्या मोठमोठ्या इमारती, गजबजाट, वहानं, गर्दी, लोक, स्त्रिया सारं काही डोळे भरून बघायचं होतं. संपूर्ण दिवसभर तो शहरभर भटकत राहिला. या शहराची मजा स्तिमित नजरेनं न्याहाळत राहिला. सुंदर सुंदर स्त्रियांकडे, त्यांच्या कमनीय बांध्यांकडे अचंबित नजरेनं बघत राहिला. मोठमोठ्या दुकानांमधून फिरत राहिला. दिवस कसा सरला कळलंही नाही. आणि अंधार पडायला लागला तसा पुन्हा एकदा ताजा तवाना होऊन, कपडे वगैरे बदलून, उंची सुंगधी अत्तराचा फवारा उडवून, ताजच्याच नाजूक स्वागतिकेनं सारं ठरवून दिल्याबरहुकूम, एका श्रीमंती मद्यपानगृहात दाखल झाला.
इथलं वातावरण भारून टाकणारं होतं. भलं प्रचंड मद्यपानगृह. त्याची आकर्षक रंगांत केलेली सजावट आणि वेगवेगळ्या रंगातल्या दिव्यांचा एकत्रित पडलेला प्रकाश. एका बाजूला लावलेल्या उंची उंची मद्यांच्या बाटल्या आणि हर प्रकारचे ग्लास... मद्य पुरवायला तत्परतेनं उभे असलेले सेवक... मद्यखान्यात आधीच लोक आलेले होते आणि आणखी आणखी येतही होते. वेगवेगळ्या प्रकारचे लोक. चित्र-विचित्र वेष परिधान केलेल्या आणि अंगोपांगांचं दर्शन घडवणाऱ्या युवती, स्त्रिया. रंगीबेरंगी, काळे कपडे घातलेले, सुटाबुटातले पुरुष आणि या सगळ्याच्या जोडीला मोठ्या आवाजातलं पाश्चात्य संगीत.
विस्फारलेल्या डोळ्यांनी कामराजनं मद्यपानगृहात प्रवेश केला आणि त्याच्या आकर्षक, श्रीमंती व्यक्तिमत्वानं उपस्थितांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. त्याच्या टपोऱ्या डोळ्यांनी उपस्थित स्त्रियांवर मोहिनी घातली.
"वॉव, हूज दॅट न्यू हार्ट थ्रॉब याsss? " पलिकडच्या टेबलवर बसलेल्या एका अगदी सडपातळ युवतीनं कामराजवरची नजर न काढताच हलकेच तिच्या तेवढ्याच सडपातळ मैत्रिणीच्या कानात विचारलं.
"हा कुणी परदेशी भारतीय दिसतोय. फारच मोठा बिझनेसमन असणार नक्कीच.." आणखी पलिकडच्या टेबलवरचा पुरुष एकटक कामराजकडे बघत असलेल्या त्याच्या मैत्रिणीला म्हणाला.
"व्हेरी गुड इव्हनिंग सर... " मद्यपानगृहाच्या व्यवस्थापकानं जातीनं येऊन कामराजचं स्वागत केलं आणि त्याला त्याच्या स्थानापर्यंत घेऊन गेला. कामराजच्या आजूबाजूनं जाणाऱ्या येणाऱ्या स्त्रियाच काय पण पुरुषही माना वळवून वळवून त्याच्याकडे बघून घेत होते.
"अहाहा याला म्हणतात खरी दुनिया... माणसांची खरी झगमगती दुनिया... " व्यवस्थापकानं दाखवलेलं स्थान ग्रहण करत असतानाच कामराज विचार करत होता. कामराज आ वासून ते सारं वातावरण न्याहाळत होत. सेवकानं त्याला विचारून उंची मद्य त्याच्यासमोर आणून ठेवलं. अन अचानक एका सुंदर स्त्रीनं त्याच्या समोर येऊन त्याला विचारलं
"कॅन आय सीट हिअर... अं... आय मीन इफ इट इज फ्रीSS? " या लाजत, मुरकत, मंद स्मित करत आलेल्या अचानक प्रश्नानं तो थोडासा गडबडलाच.
"अं.. हं.. हं.. यस्स.. यस्स" कामराजला नक्की काय उत्तर द्यायचं ते सुचलं नव्हतं.
"वेल... न्यू हिअर? अलोन? " पाठोपाठ पुढचे लाजत, मुरकत, मंद स्मित करत प्रश्न.
"अं.. हो. हो. " कसंनुसं हसत कामराज उतरला.
"डोंट वरी... टेक मी ऍज युवर फ्रेंड" मंद स्मित करत बोलणाऱ्या सुंदर स्त्रीनं आपला हात पुढं केला, "ललिता... ".
कामराज पुन्हा बुचकळ्यात पडला. सुंदर स्त्रीनं हात पुढेच ठेवून पुन्हा ओळख दिली, "माय नेम इज ललिता... "
कामराजनं ललिताचा हात हातात घेतला. त्या सुंदर नाजूक स्पर्शानं त्याच्या अंगावर रोमांच उठले. ललितानं पुन्हा एकदा मंद गोड स्मित केलं आणि म्हटलं,
"माय नेम इज ललिता... बट यू कॅन कॉल मी लली... ऑर ऍक्चुअली जस्ट लल... यू नो... इटस सोS स्वीट... " ललितानं पुन्हा एकदा हसत हसत लाजून दाखवलं.
"अं... हेलो.. आय ऍम कामराज... " कामराजनं स्वतःची ओळख करून दिली.
"कामराज... " ललितानं पुनरुच्चार केला आणि पुढं होऊन कामराजच्या अगदी जवळ जाऊन म्हणाली, " वॉSSव... अमेझिंग नेम... " आणि अगदी ऐकू जाईल न जाईल अशा आवाजात म्हणाली "ऍज अमेझिंग ऍज यू आर... ". आणि पुन्हा मागे होऊन पुन्हा आधीसारख्याच आवाजात म्हणाली
"मिस्टर कामराज.. पण आय विल जस्ट कॉल यू कॅमी... इज दॅट ओके? "
ओळख करून देण्या-घेण्याच्या माणसांच्या दुनियेतल्या या सरळ पद्धतीनं कामराज आश्चर्यचकित झाला होता.
"ललिता... "
"अ... अ... जस्ट लल" नाजूक हसत ललितानं आठवण करून दिली.
"यस्स... हः हः हः... लल.. अं.. व्हेरी नाईस टू मीट यू... ब्यूटीफूल लेडी" कामराजनं म्हटलं आणि ललितानं अगदी लाजून चूर झाल्यासारखं केलं.
कामराजची नजर ललवरून हलत नव्हती. ती मध्यम वयीन असली तरीही दिसायला सुस्वरुपच होती. उंच, गोरीपान, थोडीशी जाडसर, काळे भोर टपोरे भिरभिरते डोळे, सरळ नाक, रुंद पण छोटीशीच हनुवटी, खांद्यापर्यंत रुळणारे मोकळे सोडलेले सोनेरी चॉकलेटी केस, कमनीय देहयष्टी, मादक दाहक सौंदर्यवती. ललनं राखाडी रंगाची रेशमी साडी आणि तसल्याच रंगाचा बिनबाह्याचा ब्लाऊज परिधान केला होता. साडी परिधान करताना तिनं पोटाचा गोरापान भाग अनावृत्त राहिल आणि पदरा आडून ब्लाऊजमधील बंदिस्त कुच-कुंभ डोकावत राहतील याची पूर्ण काळजी घेतली होती. रेशमी साडीच्या सुळसुळीतपणानं साडीचा पदरही अधून अधून ढळायचा आणि तो सावरायचं ललच्या पटकन ध्यानातच यायचं नाही! बोलताना ओठातून जणू रस गळत असावा असं गोड, लाजत, हसत ती बोलत रहायची. कामराज या सौंदर्यानं घायाळ झाला होता आणि अनुभवी ललच्या ते लक्षात आल्यावाचून राहिलं नाही.
- क्रमशः