आंब्याचं खोड (भाग - ३)

ललच्या आणि कामराजच्या गप्पांना खंड नव्हता. या दोघांच्या वाढत्या मैत्रीकडे मद्यखान्यातले लोक असूयेनं बघत होते. ललला मद्यखान्यात आलेल्या लोकांपैकी बरेच जण ओळखत होते. जाता येता ते कुणी हलकेच तिच्याशी दोन शब्द बोलून जायचे, कुणी तिला प्रेमानं जवळ घ्यायचं तर कुणी थोडीशी लगट करायचं.  लल कामराजची प्रत्येकाशी ओळख करून देत होती.   
"मीट माय फ्रेंड कॅमी... "
"हाय... नाईस मीटींग यू... "
"कॅमी, ही इज आरिफ.  फार मोठा बिझिनेस आहे याचा... शिपिंग कंपनी.." लल दुसऱ्या माणसाबद्दल माहिती पुरवायची.  

इथे हरतऱ्हेचे लोक होते. कुणी सिनेमात काम करणारा, कुणी शिपिंगवाला, कुणी कसला उत्पादक, कुणी कुठल्यातरी कंपनीचा संचालक, कुणी डॉक्टर.. आणि व्यावसायिक सल्लागार तर बरेच होते. कामराजशी ओळख करून घेण्यात स्त्रियाही मागे नव्हत्या. पार्श्व संगीताचा आवाज आता खूप वाढला होता.  रंगीबेरंगी दिव्यांचे झोत इकडून तिकडे फिरत होते. मद्यखान्याच्या मधल्या मोकळ्या जागेत आता बरेच पुरुष आणि स्त्रिया अंगविक्षेप करत नाचत होत्या.   

"कॅमी, तू परदेशात राहतोस? " ललनं विचारलं. पार्श्व संगीताच्या ढणढणाटामुळे ललला कामराजच्या कानाच्या जवळ तोंड नेऊन बोलावं लागत होतं. यात तिचा गाल कामराजच्या गालाला घासला जायचा.  कामराजला अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं वाटायचं.   
"हो... पण आता इकडेच राहावंसं वाटतंय, " कामराज.
"रिअSSली? कुणासाठी? इथे कुणीतरी खास आहे वाटतं! " ललनं चेष्टेच्या सुरात विचारलं.   
"दुसऱ्या कुणासाठी असणार.. लल? " एकीकडे पोटात जात असलेल्या मद्यानं कामराज जास्त जास्त आत्मविश्वसित होत होता.

"तुझा कसला बिझीनेस आहे? म्हणजे व्हॉट डू यू डू? " ललिता कामराजची जास्त जास्त माहिती काढायचा प्रयत्न करत होती.
"अं.. म्हणजे ते सांगणं खूप अवघड आहे... म्हणजे आमच्या कामात अमुक असं काही नसतं... "
"ओह.. यू मीन नथिंग टँजिबल? "
"हं. करेक्ट.. नथिंग टँजिबल... "
"ओह, ओके... म्हणजे व्हर्चुअल... ओह, म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्री? "
"सॉफ्टवेअर... सॉफ्टवेअर... " हसत हसत कामराजनं उत्तर दिलं.
"वॉव.. आय न्यू... यू वूड बी अ बिग गाय.. आय कॅन रीड पीपल लाईक अ बुक... "
दोन मिनिटं कुणीच कुणाशी काही बोललं नाही. लल आता उठून कामराजच्या शेजारच्याच खुर्चीवर येऊन बसली.   
"कॅमी इंडियात बिझिनेस करण्यात इंटरेस्ट आहे का तुला? " ललनं कामराजच्या अगदी कानाजवळ ओठ नेत विचारलं. बोलता बोलता तिनं कामराजच्या कानाचं नकळत चुंबन घेतल्याचा कामराजला भास झाला. कामराज या सुखद स्पर्शानं सुखावला.  
"यस... व्हाय नॉट, इफ यू आर विथ मी... "
"मग इन्वेस्टमेंट करशील?... "  ललनं कामराजच्या डोळ्यात बघत विचारलं.  
"मी ऑलरेडी तुझ्यात इन्वेस्टमेंट केलीये... " कामराजनं हसत हसत उत्तर दिलं.  
"कम्मॉSSन... " लाडिकपणे ललनं कामराजच्या खांद्यावर डोकं घुसळलं. तिनं  स्वतःची खुर्ची आणखी थोडी कामराजच्या जवळ सरकवली. ते दोघंही आता एकमेकांना जवळ जवळ चिकटूनच बसले होते.  कामराजनं एक हात तिच्या पाठीमागनं तिच्या खुर्चीवर ठेवला होता. लल कामराजला एकीकडे अधिक अधिक उत्तेजना देत होती आणि दुसरीकडे बोलत होती.   
"डार्लिंग... एक चांगला बिझिनेस प्लान आहे.. अँड आय ऍम काउंटिंग ऑन यू फॉर ईट... म्हणजे यू विल बी द मेजर शेअर होल्डर इन इट... " कामराजच्या शरीरावर थोडासा दाब देत ललनं म्हटलं. कामराजला खरंतर हे सगळं ती काय बडबडतीये हे काहीच कळत नव्हतं. त्याचं तिकडं फारसं लक्षही नव्हतं.
"असं का?  .. बरं बघू या की.. " काहीतरी बोलायचं म्हणून कामराज बोलला.
"फार मोठी इन्वेस्टमेंट नाहीये... मे बी अराउंड टेन सीआर... पण अगदी सेफ... आणि व्हेरी गुड आरोआय... " लल कामराजचा अंदाज घेत बोलत होती.
"हं.. ठीक आहे... विल सी.. " कामराजला काय उत्तर द्यायचं ते माहित नव्हतं. पण लल मात्र या उत्तरानं खूष झाल्यासारखी दिसली.  

रात्रीचे दोन अडीच वाजून गेले होते. मद्यखान्यातली मैफिल अजून रंगलेलीच होती.  
"चल कॅमी... बाहेर जाऊन एखाद्या शांत ठिकाणी बसूया? किंवा छान कुठेतरी जाऊन आईसक्रीम खाऊया... " ललनं थोडसं बाजूला होत विचारलं, "म्हणजे आपल्याला आपल्या बिझिनेस प्लानवरही थोडं डिस्कशन करता येईल... "
कामराज ललितावर पूर्ण लुब्ध झाला होता.   त्याला त्याचं तिच्याविषयीचं प्रेम तिच्याकडे व्यक्त करायचं होतं.   ते कसं करावं याचा तो विचार करत होता. विचारावं की न विचारावं या संभ्रमात त्यानं अगदी हलक्या आवाजात तिला विचारलं
"आपण असं करू या लल... अं... म्हणजे आपण ताजमध्येच जाऊया? आय हॅव अ रूम देअर.. "
"एSSS.. " कामराजचं बोलणं तोडत अन लज्जेनं लालीलाल होत लल उद्गारली, " माय गॉSSSड.. कॅमी डार्लिंग... तू तर एकदम छुपा रुस्तुमच निघालास कीSSS.. नो याSSS...   माय गॉSड". कामराजला हे अगदी अनपेक्षित होतं. तो अगदी बावरून गेला.
"नाही.. नाही.. लल.. तुझा गैरसमज होतोय.. मला.. म्हणजे मला तुझ्याशी स्पष्टपणे काही गोष्टी बोलायच्या आहेत. आय मीन आय वाँट टू टेल यू द एंटायर स्टोरी.. अ.. आय मीन.. बाहेर असं सार्वजनिक ठिकाणी मला कदाचित नाही नीट बोलता यायचं.. सो.. "
"ओके, ओके.. नो प्रॉब्लेम.. आय अंडरस्टँड.. चल जाऊया आपण ताजवर... पण फक्त दहाच मिनिटं हं... कारण असं म्हणजे ऍक्चुअली... यू नो... " लटके आढेवेढे घेतल्यासारखं करत लल म्हणाली.

ताजच्या रुममध्ये शिरता शिरताच ललनं पुन्हा दहा कोटीच्या बिझिनेस प्लानचं बोलणं चालू केलं. कामराजनं फोन करून पुन्हा एकदा दोघांसाठी मद्याचा ग्लास मागवला.
"कॅमी.. लास्ट वन हां. जस्ट वन फॉर द रोड" ललनं नाटकीपणे म्हटलं. "ये ना  रे... कॅम.. इथे बस ना माझ्या शेजारी. " कामराजला शेजारी बसवून घेत ललनं त्याच्या हाताचं चुंबन घेतलं. "आय नो सो मेनी एचेनाईज.. आणि एनीबडी विल फंड माय प्रॉजेक्ट.. पण ते सगळे.. यू नो.. जाऊ देत. तुझी मात्र बातच और आहे. म्हणूनच तर मी तुला शब्द टाकलाय डार्लिंग. तीन वर्षात आपण मोठा आयपीओ करू. इटस अ वंडर्फूल प्रोजेक्ट.. यू विल बी सीएमडी.. आय नो, टेन क्रोअर इज नॉट अ बिग डील फॉर यू.. हो नंSS? "

कामराज ललकडं सस्मित नजरेनं पाहत होता. तिच्या नजरेनं त्याला आवाहन केलं.  त्यानं तिला आपल्या जवळ बाहुपाशात ओढून घेतलं आणि तिच्या कोमल ओठांवर अलगद आपले ओठ टेकले.  ललिता या खेळात पारंगत होती.  कामराजला आणखी घट्ट बिलगत तिनं त्याला उत्तेजित केलं.  काही सेकंद गेली  आणि पुन्हा थोडसं बाजूला होऊन ललनं पुन्हा बोलायला सुरवात केली,

"मग काय ठरवलंस तू कॅम?  डू आय गिव्ह यू डीटेल्ड बिझनेस प्लान?  पुढं कसं जायचं? "
"लल या सगळ्या आधी मला तुझ्याशी चार गोष्टी स्पष्ट बोलायच्या आहेत... " कामराज थोडा भानावर येत बोलला. 
"बोल नं रे राजा... "
"लल.. अगदी खरं सांगू? मी... म्हणजे मी तुझ्या प्रेमात अगदी पूर्ण बुडलोय... लल..."
"हुं.. " मान खाली घालून हसत हसत ललनं हुंकार दिला. 
".. आणि लल देअर इज अ प्रॉब्लेम.. म्हणजे आय वाँट टू टेल यू एव्हरीथिंग... पण... इटस व्हेरी डिफिकल्ट... लल तू समजतीयेस तसा मी नाहीये... म्हणजे आय ऍम डिफरन्ट... ऑर यू कॅन से आय ऍम नॉट फ्रॉम धिस वर्ल्ड.. "
"कॅम .. यू थिंक आय डोण्ट नो ऑल धिस? " ललचा हा प्रश्न गोंधळात टाकणारा होता, "आय नो यू कॅमी सोSS वेल नाऊ.. आय कॅन रीड पीपल लाईक अ बुक.. आय कॅन सी यू आर डिफरंट... पण म्हणूनच तू मला आवडलायस.. " कामराज मनातल्या मनात खूश झाला. "दॅटस व्हाय आय वाँट यू टू बी विथ मी इन माय बिझिनेस.. "
"लल, मला एक सांग.. मी तुला खरंच आवडलोय? "
"ऑफ कोर्स डार्लिंग.. " ललनं कामराजची नजर चुकवली.
"मग माझ्याकडे बघून नीट स्पष्टपणे सांग लल.. माझं जेवढं तुझ्यावर प्रेम आहे तेवढंच तुझंही.. माझ्यावर प्रेम आहे? "
"कॅमी डार्लिंग, तू फाSर ओल्ड फॅशंड आहेस बाबा.. " ललनं सरळ उत्तर द्यायचं टाळलं, "मला एक सांग, माझ्या प्रेमाचा आणि तू पैसे गुंतवण्याचा काय संबंध आहे? प्रेम असलं तरच तू पैसे गुंतवणार आहेस?" मादक स्मित करत ललनं विचारलं.
"लल.. पैसे इन्व्हेस्ट करायचं सोड... आणि तू म्हणतीयेस तेवढे पैसेही खरं तर माझ्याकडे नाहीयेत.. पण.." कामराज बोलला आणि ललनं धक्का बसल्यासारखं कामराजकडे बघितलं. 
"व्हॉट? तुझ्याकडे पैसे नाहीत?" ललिताचा स्वर एकदम बदलला होता.
"नाहीत.. "
"आय डोण्ट बिलिव्ह धिस.. कॅम आर यू शुअर... तुम्ही सगळे मोठे लोक पैश्याचा विषय आला की असंच खोटं बोलता .. "
"खोटं?.. ललिता तुला वाटतं मी तुझ्याशी खोटं बोलीन... अगं या खऱ्या खुऱ्या प्रेमाच्या शोधात तर मी इथपर्यंत आलोय.. मी कशाला खोटं बोलीन ललिता? "
ललिताच्या चेहेऱ्यावरचा प्रेमभाव मावळून गेला होता आणि त्याची जागा करारीपणानं  घ्यायला सुरुवात केली होती.
"कॅम.. धिस इज अनबिलिव्हेबल... आय नो यू बिझिनेसमन आर ऑल अलाईक.."  आणि बोलता बोलताच ती उठून ताडकन उभी राहिली " यू ओन्ली नीड विमेन.. टू यूज अँड थ्रो.. "
"नाही नाही.. ललिता, तुझा गैरसमज होतोय.. प्लीज मझं अगदी खरं खुरं प्रेम आहे तुझ्यावर.. मनापासून"
"चल, मला निघायला पाहिजे.. " कामराजचं बोलणं तोडत ललिता म्हणाली. 
"ललिता.. परत कधी भेटायचं? "
"अ.. बघू... मे बी.. टुमॉरो.. चल बाय.. उशीर झालाय.. घरी वाट बघत असतील माझ्या.. " एवढं बोलून आणि कपडे नीटनेटके करून झपाट्यानं ललिता बाहेर पडली.  

- क्रमशः