ह्यासोबत
दुसरा संपूर्ण दिवस कामराजनं खोलीतच बसून काढला. काल रात्रीच्या स्वप्नवत वातावरणातून बाहेर यायला त्याचं मन तयार नव्हतं. ललिताच्या आठवणीनं तो व्याकूळ होत होता. ललिताचं दहा कोटी रुपयांचं प्रेम त्याच्या आकलनाच्या बाहेरचं होतं. "म्हणजे पैसे असतील तर प्रेम असं बाजारात विकत मिळतं? आणि मग तिचं ते प्रेमळ वागणं बोलणं, तो जिव्हाळा? ते सारं नाटकच होतं?.. " भावनांचा असा जीवघेणा खेळ त्याला माहितीच नव्हता. संध्याकाळी पुन्हा मद्यालयात जावं की नाही याचा त्याला निर्णयच करता येत नव्हता. एकीकडे ललिताला भेटण्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती पण दुसरीकडे ललिताचं प्रेमाचं ढोंग क्लेशदायक होतं. रात्री थोड्या उशीरानंच त्यानं जायचा निर्णय घेतला आणि भराभर कपडे करून तो बाहेर पडला.
मद्यपानगृहात कालच्याप्रमाणेच गर्दी होती. पाश्चात्य संगीत मोठ्या आवाजात चालू होतं. कालच्याप्रमाणेच व्यवस्थापकानं अदबीनं त्याची चौकशी केली. मद्याचा पहिला पेला आला. ललिता कुठेच दिसत नव्हती. काल भेटलेल्यातले काही लोक दिसत होते. काही लोकांनी त्याच्याकडे बघून ओळख दर्शक स्मित केलं.
"हाय बॉस.. अलोन टुडे? " ललितानंच काल ओळख करून दिलेल्या एकानं जवळ येऊन चौकशी केली.
"अ.. हेलो.. ललिची वाट बघतोय.. " कामराजनं उत्तर दिलं.
"ओह.. दॅट बिच.. फार नादी लागू नकोस हं मित्रा तिच्या.. " समोरच्या गृहस्थानं न विचारताच माहिती पुरवली आणि जवळ जात आणि एक डोळा बारिक करत हळूच विचारलं "बाय द वे डिड यू एंजॉय यस्टर्डे ऑर नो? " आणि खीः खीः करून तो गृहस्थ हसला. कामराजला त्याची शिसारी आली. कामराज वेगानं मद्य पीत होता. दोन पेले कधीच संपले होते आणि तिसराही मागवला होता.
"पण मित्रा तू इथंच का बसलायस? "
"म्हणजे? " कामराजला त्याचं बोलणं नकळल्यानं त्यानं विचारलं.
"आपली खास मंडळी सगळी आतच असतात. ऑल क्रीमी लेयर.. आणि तुझी बेबपण तिथंच सापडेल तुला." गृहस्थानं कामराजकडे बघत पुन्हा एकदा डोळा मारला.
"कुठे?" कामराजनं अधीरतेनं विचारलं. "कॅन यू हेल्प मी प्लीज? "
"ओके.. ओके.. कूल.. लेट मी सी.. " गृहस्थानं दिलासा दिला आणि व्यवस्थापकाला जवळ बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. व्यवस्थापकाचं आणि त्याचं दोनेक मिनिटं कुजबुजतं संभाषण झालं आणि मग कळाल्यासारखं करत व्यवस्थापकानं कामराजला अदबीनं सूचना केली "प्लीज कम विथ मी सर. " मद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेला दरवाजा व्यवस्थापकानं हातानं ढकलला आणि कामराजला आत चलण्याचा निर्देश केला.
आतल्या दालनात बाहेरच्या पेक्षा खूपच कमी प्रकाश होता. हिरव्या निळ्या दिव्यांची उघडझाप चालू होती. दिवे बंद झाले की मिट्ट काळोख व्हायचा, पुन्हा सुरू झाले की मंद प्रकाश पसरायचा. आतही चाळीस पन्नास लोकांची गर्दी होती पण कुणाचेही चेहेरे अंधारानं स्पष्ट दिसत नव्हते. आतमध्येही बाहेरच्याच सारखं पण वेगळं संगीत कर्णकर्कश्श आवाजात चालू होतं. कुणीतरी सेवकानं येऊन कामराजच्या हातात मद्याचा पेला दिला. एकाच दमात कामराजनं पेल्यातलं सगळं मद्य पोटात ढकलून दिलं. सारं वातावरण धूसर अन धुंद झालं होतं.
आता अंधाराला डोळे थोडे सरावले होते. या गर्दीत स्त्रिया पुरुष सारेच होते. कुणी नाचत होते, कुणी गंभीर चेहेऱ्यानी एकमेकांशी बोलत होते, कुणी विनोद करून जोरजोरात हसत होते, तर कुणी स्त्रियांशी लगट करत होते. कामराज डोळे फाडफाडून ललिताला शोधत होता. अन अचानक ती दिसली.. हो.. नक्कीच तीच.. कुणाच्या तरी मिठीत नाचत होती... बापरे.. कामराजला मेंदूत अक्षरशः ऍटमबॉंबचा स्फोट झाल्याप्रमाणे दणका बसला... वेगानं कामराज तिच्या दिशेनं झेपावला आणि तेवढ्यात दिवे बंद झाले.. क्षणभर काही दिसेनासं झालं.. क्षणात पुन्हा दिवे लागले.. ललिता आता दुसऱ्याच कुणाबरोबर तरी नाचत होती.. आता वेळ घालवून चालणार नव्हता.. पुन्हा दिवे बंद होण्याच्या आत तिला पकडणं आवश्यक होतं.. कामराजनं त्वरेनं हालचाल केली आणि तो तिच्या जवळ पोहोचला.. ललिताची आणि त्याची नजरानजर झाली. .. "हाः हाः हाः हाः ... " ललिता मोठ्यानं हसली आणि तिनं त्याला जवळ यायची खूण केली. कामराजनं ललिताला पकडायचा प्रयत्न केला आणि.. हे काय... त्याचे हात तिच्यातून आरपार गेले ? ... एखाद्या वायूच्या आकृतीतून फिरावेत तसे? ... पुन्हा तेच... कामराजला धक्का बसला... भीतीनं अंगावर शहारा आला.. हे काय होतंय?.. ललिता नाचत नाचत गोल फिरत होती... पार्श्वसंगीताचा वेग आणखी वाढला होता. ललिताही आणखी वेगानं नाचत होती. कामराज तिच्या मागे तिला पकडायला धावत होता... पुन्हा तेच.. कामराज तिला दोन्ही हातानी गवसणी घालू पाहत होता आणि ती मात्र सुळ्ळकन काहीच नसल्यासारखी सुटून जात होती... कामराज पुरता चक्रावून गेला होता.. ललिता हसत होती आणि पुन्हा पुन्हा खुणावून कामराजला जवळ बोलावत होती... आणि आता कामराजच्या हेही लक्षात आलं होतं की इथली सगळी गर्दीच अशी वायूरुप होती... ते त्याच्यातूनही असेच आरपार जात नाचत होते... ओळखीच्या खुणांसाठी त्यानं गर्दीतल्या लोकांच्या पायांकडे बघितलं.. आणि पुन्हा एकदा त्याला जोरदार धक्का बसला... भीतीनं गाळण उडाली... सगळ्यांचेच पाय त्याच्यासारखेच... उलटेच...
कामराज ला ताईची आठवण झाली... "ताई... ताई.. " त्याना मनातल्या मनात धावा केला अन त्याबरोबरच एकदम आठवला ताईनं दिलेला ताईत... बापरे ताईत??... कामराजनं घाईघाईनं खिसे चाचपले.. ताईत सापडत नव्हता.. ताईत कुठे गेला? ... वेड लागल्यासारखं तो पुन्हा पुन्हा खिसे चाचपडत राहिला... पुन्हा ललिताच्या खिदळण्याचा आवाज आला... आणि हे काय?.. ताईत ललिताच्या हातात होता... एका हातानं ती कामराजला ताईत दाखवत होती आणि दुसऱ्य हातानं जवळ बोलावत होती... तिच्या चेहेऱ्यावर छदमी खुनशी हास्य पसरलं होतं.... सगळी गर्दी वेगानं नाचत होती... त्याच्या अवती भवती... त्याच्या आरपार... एकमेकांच्या आरपार .. कामराज ललितावरची नजर ढळू देत नव्हता... ललिता जोरजोरात खिदळत होती आणि ताईत दाखवत त्याला बोलावत होती... "कॅम.. कम्मॉSSSन डार्लिंग... हाः हाः हाः हाः हाः ... " गर्दीचा नाचायचा वेग क्षणाक्षणाला वाढत होता. .. सारी भुतं नाचत होती... पार्श्वसंगीताचा तालही विलक्षण वाढला होता... आवाजानं कानठळ्या बसत होत्या... गर्दी कल्पनातीत वेगानं नाचायला लागली... तो वेग तो प्रचंड आवाज सहन न होऊन कामराजनं कानावर हात ठेवले... पण त्यानंही मेंदू फुटायचा थांबेना...
अन क्षणात कुणीतरी घाव घालून तोडल्यासारखं संगीत अन दिवे दोन्ही बंद झालं... पूर्ण विझलं... सुन्न... शांत झालं...
जुन्या आंब्याच्या वाळलेल्या लाकडाचं खोड मद्यालयाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात फेकलं गेलं.. कचऱ्यात जाऊन पडलं...
- समाप्त