विसंवादः भाग १ (बसथांबा)

स्थळः कुठलाही बसस्टॉप
पात्रेः एक भुकेला भिकारी आणि एक कवी.
(भुकेल्या भिकाऱ्यासाठी 'भू' आणि कवीसाठी 'क' हे अक्षर वापरले आहे. )

-----------------------------------------------------------------

भू: (दीनवाणा) साहेब, दोन दिवस झाले काही खाल्लं नाही..
क: का रे बाबा? असे करायचे नाही. रोजच्यारोज काहीतरी खायला आणि लिहायला पाहिजे.
भू: साहेब, काही दोन पाच रुपये..
क: "भिकाऱ्या मागतो आहेस पैसे माणसांपाशी,
    अरे त्याच्याचसाठी ते इथे आहेत आलेले.
."
भू: काय सांगता? वाटत नाई तुमच्याकडं बघून..
क: वाच्यार्थ घेऊ नकोस.. ध्वन्यार्थ घे.. गर्भितार्थ घे!
भू: कुटलाबी पदार्थ चालेल.. खायला घाला.
क: अरे वेड्या.. मी तुला इतकी मौल्यवान गोष्ट दिल्यावरही तू खायला काय मागतोस? ’कणा’ आहे की नाही तुला? "खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला" असे वृत्त हवे.. आय मीन, अशी वृत्ती हवी.
भू: येतो साहेब..
क: अरे थांब..
आज तू खाशील थोडे मी दिल्यानंतर
काय तू करशील पैसे संपल्यानंतर?
भू: फुडं अजून बष्टाप हायेत साहेब.
क: "अरे वेड्या, कवितेची ताकद कळायला हवी तुला. कुबेराची संपत्ती क्षुद्र वाटेल असे विचारधन तुला देतो आहे. अरे, माणसाच्या वैयक्तिक आणि दैनंदीन जीवनाच्या व्यामिश्र अनुभवांच्या कल्लोळातून उठलेल्या तरंगांना शब्दबद्ध करू शकणारे प्रतिभासंपन्न संवेदनशील मन प्रखर वास्तवाच्या दाहक आघाताने उत्तेजीत होवून जी आवर्तने निर्माण करते, ती अंत:करणाच्या सूक्ष्म पटलावर परावर्तीत होऊन जाणीवेच्या आरशापुढे आल्यावर त्यातील प्रतिबिंबाचे नादमय आघात....."
भू: बस्स..
क: काय?
भू: तुमची बस आली सायेब..
क: असू देत. पुढे ऐक.
भू: जाउ द्या सायेब,धंद्याचा टैम आहे.
क: हाच फरक असतो. तुमच्यासारख्यांमधे आणि माझ्यासारख्यांमधे.
भू: ते कसं काय? आत्ताच तुम्ही म्हनलात तुमीबी पैसे मागाय आलात म्हनून.
क: अरे, तसं नाही. ती कविता आहे.
भू: कविता म्हंजे?
क: हां.. आता कसं! माझा आवडता प्रश्न विचारलास. कविता म्हणजे टीपकागदासारख्या संवेदनशील मनावर जणिवेच्या ओरखड्याने निर्माण झालेली नादमय आवर्तने.
भू: कायसुधा कळ्ळं नाय.
क:(हताशपणे) अरे कविता म्हणजे गाणं.
भू: असं व्हय.. मग सरळ सांगा की.
क: तुला माहितीये का एखादी कविता?
भू: तर.. "जमीन आप्ली उन्हानं ताप्ली लाल्लाल झालीया माती.."
क: अरे ती कविता नाही. मुक्तछंद आहे तो. बातमी आहे ती नुसती बातमी. कविता अशी असते- म्हणजे बघ, समजा तुझ्या आयुष्यावर कविता करायचीये, तर नाव काय म्हणालास तुझं?
भू: दामू.
क: हां तर दामू, ऐक-
"काळ तेव्हा छान होता चालला
तो सुखी संसार होता थाटला
की जणू वेलीस यावे फूल हो
त्या घरी ’दामू’ असा हा जन्मला

जन्मला दामू.. किती आनंद हो,
गोकुळी आला जसा की नंद हो
हाय! त्या वेळीच आली ही बला
की सुखाचे दार झाले बंद हो

बाप दामूचा निघे गुत्त्यातूनी
चालतो बेधुंदसा रस्त्यातूनी
पाहिले नाहीच त्या गाडीस रे
मारले होते जीने धक्क्यातूनी..

शोक दामूच्या घरी जो चालला
बाप त्याचा का अवेळी संपला...
आणि आई बोलते...."

भू: बस्स.
क: आता कुठे आलीये बस? अजून २७ कडवी बाकी आहेत.
भूः नाई, बस नाई आली. समजलं मला तुम्हाला काय म्हनायचं ते.
कः नुसतं समजून काय फायदा रे. तुझ्याजवळ कवीचे मन कुठे आहे? तुला कशा जमणार कविता?
भूः असं म्हनता? मग ऐका-
"घास घ्यावा तोच ज्याला चावल्यानंतर
भूक मंदावेल थोडी आजच्यानंतर

बुडबुडे काढू नये प्रत्येक दिवसाला
काय ते उरणार मागे आपल्यानंतर?

तो कवी नाहीच जो झोपेल आनंदे
तुच्छ दुसऱ्याला कुणाला लेखल्यानंतर

जाणवावे लागते पांडित्य अर्थांनी..
सिद्ध नाही होत नुसते बोलल्यानंतर

काव्य नाही होत वेड्या शिंकल्यानंतर
रक्त आहे.. रक्त येते कापल्यानंतर"

कः (ओशाळून) अरे वा! भिकारी असूनही कविता करतोस?
भूः कविता करत करतच भिकेला लागलोय सायेब.. काही खायला घालता का?

(समाप्त)
(किंवा गरज भासल्यास क्रमशः)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++