( प्रत्येक ओळीत अनुप्रास/ऍलिटरेशन साधत केलेली कविता)
पापण्यातले पाश पुसुनी प्रसन्न पिवळी पहाट होते..
सरसर सरसर सकाळ सगळी साकल्यावर सांडत जाते..!
लगेच लपते नभात लाली, लगबग लगबग प्रकाश होतो
भरभर भरभर घड्याळ पळते, असा भास भरदिवसा होतो
टळटळणारी दुपार सगळे टाळे लावून टाळत जाती..
नीरव दुपारी निवांत निद्रा नशीबवान नेत्रांना येती..
मध्यान्हीच्या मधाळ वेळी मनामनाची मरगळ जाते
कातरवेळी कुठे कुणाचे 'काळीज' कोणी कापत जाते...
हुरहुरण्याचा हव्यास हळवा हाती घेउन हसते रात्र,
गळपटलेल्या गरीब गावी गाढ झोपते- गात्रन गात्र..!
बसल्या बसल्या कसा बघा ना, 'बरा' कवीही बहकत जातो...
आयुष्याला असा अचानक "अनुप्रास" आवडता होतो..!
+++++++++++++++++++++++++++++++++