इथे तर पानगळ बहरात आहे

*प्रदीप कुलकर्णी यांची ह्याच काफियांची गझल नुकतीच आली आहे.हा एक सुखद योगायोग आहे.

ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ  बहरात आहे

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच  ह्या जहरात आहे

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे

विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?
.

--------------------------------------------------------
जयन्ता५२