आजच्याइतके दीर्घकालीन खग्रास सूर्यग्रहण शतकात नाही!

आज भारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसण्याची पर्वणी आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. ह्या सूर्यग्रहणाचे एक आणखीही महत्त्व आहे. ते म्हणजे हे खग्रास सूर्यग्रहण एकविसाव्या शतकातले सर्वात जास्त काळ राहणारे खग्रास सूर्यग्रहण आहे.

ह्याचे कारण मोठे गमतीशीर आहे. २२ जुलैच्या सुमारास पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर असते. त्यामुळे सूर्य ह्या दिवशी सर्वात लहान! पण केवळ तेवढेच नाही तर चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. त्यामुळे सर्वात मोठा चंद्र सर्वात लहान सूर्याला सर्वात जास्त वेळ झाकणार! जास्त वेळ म्हणजे किती वेळ? तर ३९९ सेकंद - जवळ जवळ पावणे सात मिनिटे!

वरील हालत्या चित्रात  निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या वेळी सूर्य कसा आणि किती झाकला जाईल ते दाखवलेले आहे. हे चित्र शॅडो अँड सबस्टन्स च्या लॅरी कोह्न ह्यांनी तयार केलेले आहे.

भारतातातल्या आणि चीनमधल्या मनोगतींसाठी आणखी माहिती.

शॅडो अँड सबस्टन्स ह्या संकेत स्थळावर त्यांनी भारतात आणि चीन मध्ये निरानिराळ्या ठिकाणी दिसणारी सूर्याची अवस्था दाखवण्यासाठी फ्लॅशच्या साहाय्याने आंतरसक्रिय चित्रे ठेवलेली आहेत. ती अवश्य पाहावीत. व आपल्या येथून हे सूर्यग्रहण कसे दिसले ते नक्की लिहावे.

पावणे सात मिनिटे म्हणजे ही काही सर्वात जास्त वेळ नाही बरे का! गणिताच्या आधारे खग्रास सूर्यग्रहणाचा सर्वाधिक कालावधी साडेसात मिनिटे शक्य आहे.  अर्थात त्या मानाने पावणे सात हा कालावधी काही अगदीच कमी नाही. आजच्याहून अधिक लांबणारे खग्रास सूर्यग्रहण १३ जून २१३२ रोजी होणार आहे. त्या दिवशी आपली नातवंडे/पतवंडे मनोगत वाचतील तेव्हा तुम्ही आणि त्यांना दिसणाऱ्या सूर्यग्रहणांची तुलना करण्यात त्यांना किती मौज वाटेल बरे!

(असे म्हणतात की दीर्घकाल सूर्यग्रहण पाहणारांना आयुष्यभराचे वेड लागते! कसले? सूर्यग्रहणे पाहण्याचे! हजारो डॉलर खर्च करून हजारो मैल प्रवास करून हे लोक सूर्यग्रहणे पाहण्याची पर्वणी सोडत नाहीत. तेव्हा लक्षात असूद्या! )

ही सगळी माहिती काही माझ्या ज्ञानाने लिहिलेली  नाही बरे का! हे सगळे फिजऑर्ग ह्या संकेतस्थळावर येथे लिहिलेले आहे. चित्रही मी तिथूनच त्यांच्या सौजन्याने ओढून येथे सोडलेले आहे.