स्वीकार आशयाची

प्रत्येक सज्जतेचा बीमोड होत आहे
बेजार जीवनाची धरसोड होत आहे

खटल्यात जीवनाच्या मृत्यू वकील झाला
एकेक साक्ष त्याची बिनतोड होत आहे

अप्रीय होत होतो दुखवून माणसांना
वाटायचे मला 'मी बेजोड होत आहे'

हा वाढता दुरावा की भास एक मानू?
दररोज कालपेक्षा ती गोड होत आहे

इतके कळायलाही आयुष्य लागले की
'माझ्यामुळेच माझा हिरमोड होत आहे'

आहे मनात जे जे, ते ते मनात जपणे
माझ्याकडून हल्ली ही खोड होत आहे

आता जुनी उभारी शब्दांपुढे न चाले
स्वीकार आशयाची जी तोड होत आहे