तनुवेलीवर यौवन फुलले,
पाहुनिया तुज हे जग भुलले,
हरले! सगळे प्रयत्न हरले !
सांभाळावे कसे मनाला? सांग तूच गे मला,
शिकावी कुठे कलंदर कला ?
नुकती सरली वर्षे सोळा
ज्वानीचा ह्या नूर निराळा...
भाव कसा मग असेल भोळा?
नजरेच्या एका घावातच जीव जाहला खुळा ॥
सावळकांती, आखिव बांधा,
चालीमधला झोक न साधा,
मदनालाही होइल बाधा
तुला पाहता, श्वास आतला आतच गं थांबला ॥
पदराआडुन हसते काही,
बघणाऱ्या मग भानच नाही,
तुझाच तो होउनिया राही
संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ॥
मनी तुझ्या जे काही दडले,
ओठ सांगताना अवघडले,
ते न इथे कोणाला कळले.
ह्या मौनाची 'तीट' लावुनी, देव जरा शांतला ॥
- चैतन्य दीक्षित