राखी : देवस्थळी ते सावंत!

राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते. तेवढं एक बंधन अतूट राहिलं.
त्या काळी वर्गातल्या, शेजारच्या मुलीशी बोलणंही पाप मानलं जायचं. वर्गात दंगा करणाऱ्या मुलाला शिक्षा म्हणून मुलीशेजारी बसवायचे! सातवीत एकदा अशीच "शिक्षा' आमच्या अख्ख्या वर्गाच्या वाट्याला आली होती. मग आम्ही बेंचवरच आपापली "हद्द' कर्कटकाने आखून घेतली होती. त्या हद्दीच्या पार कुठली वस्तू आली की जप्त करायची किंवा शेजारच्या मुलीला काहितरी शिक्षा करायची, असा नियम होता!
आमच्या घराच्या पल्याड काही अंतरावर राखी देवस्थळी नावाची एक मुलगी राहायची. घराशेजारी राहणाऱ्या, वर्गातल्या, नात्यातल्या, किंवा परिचयातल्या कोणत्याही समवयस्क मुलीच्या नावानं मुलांना चिडवण्याचा त्या काळी दंडकच होता! त्यामुळं मलाही तिच्या नावानं चिडवलं जायचं. हातावरच्या राखीनंतरची आयुष्यातली दुसरी "राखी' ही! बाकी, मामेबहिणी, अन्य शेजारणींच्या नावानंही चिडवणं व्हायचंच.
शाळेत रक्षाबंधनाचा सामूहिक, पारंपरिक, बंधनकारक सोहळा व्हायचा. मुला-मुलींची समसमान वाटणी करून प्रत्येकाला साधारणपणे एक या प्रमाणात राखी बांधण्याचा सार्वजनिक कार्यक्रम असायचा. या कुंभमेळ्यात आपली "लाइन' ("शाळा'! ) आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी सर्वांची धडपड असायची. शाळेत ज्याच्या नावानं आपल्याला चिडवलं जातं, त्याला राखी बांधण्याचीही भयंकर प्रथा त्या काळी अस्तित्त्वात होती. मग या दहशतीमुळे अनेक जण राखीपौर्णिमेच्या दिवशीच नेमके आजारी पडायचे! तरीही नंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यांना गाठून हा कार्यक्रम पार पाडला जायचाच! एकदा का त्या मुलाला राखी बांधली, की आपण "पवित्र' झालो, असा अनेक मुलींचा समज होता बहुधा!! पण राखी बांधली, तरी आम्ही "दादाभाई नवरोजी' व्हायला तयार आहोत, असा आमचा दावा असे.
हातावरची राखी जास्तीत जास्त दिवस टिकवणं हेदेखील एक पवित्र कर्तव्य होतं. आंघोळ करताना तिला पाणी लागू न देण्याचं कसब त्यासाठी पार पाडावं लागे. चित्रपटांच्या नावांच्या, भल्या मोठ्या स्पंजच्या आणि हल्लीच्या "पेस्ट्री'ला लाजवतील, अशा राख्याही बाजारात असायच्या. पण त्या हातावर बांधणं म्हणजे आपण अगदीच "ह्यॅ' असल्याचं लक्षण मानलं जायचं. शाळेत मिळायच्या त्या संघाच्या राख्या. मऊसूत गुंडा आणि एक साधा, केशरी दोरा. बस्स!
कॉलेजात असताना शेवटच्या वर्षात एकुलत्या एक वेळेला प्रेमात पडलो होतो. ही बया आपल्याला आता राखी बांधते की काय, अशी प्रचंड भीती त्या वर्षीच्या राखीपौर्णिमेला होती! पण सुदैवानं तसं काही झालं नाही. आणि तसं झालं असतं, तरी फरक पडला नसता, हे कॉलेज संपल्यानंतर उमगलं.
पुण्यात आल्यानंतर काही वर्षं बहिणींनी पोस्टानंही राखी पाठवली. साधारणतः राखीपौर्णिमा झाल्यानंतर आठवडाभराने ती मिळायची. त्यानंतरही ती हातावर बांधून मिरवण्यात एक प्रकारचं समाधान असायचं. विशेषतः एकटा राहत होतो, तेव्हापर्यंत!
... अगदी अलीकडच्या काळात आणखी एक "राखी' आयुष्यात आली. म्हणजे, खासगी नव्हे, तर सार्वजनिक आयुष्यात! ही राखी भलतीच मजबूत, बोल्ड आणि आकर्षक (हॉट? ) होती! तीच ती... "महाराष्ट्राची खंत'. कुण्या पंजाब्यानं तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोण तीळपापड झाला होता अंगाचा!!
... पण हाय रे कर्मा! तिचं अगदी दोनच दिवसांपूर्वी लग्न ठरलं. आमचा मेव्हणा सातासमुद्रापारचा कुणी राजकुमार आहे म्हणे! आता त्याचे कान उपटायला जाईन म्हणतो!!