तसा मी कधीपासुनी तोच होतो

कळेना कुठे सर्व लंपास झाले
किती राहिले नी किती श्वास झाले

प्रसंगाप्रसंगातुनी तेढ आली
क्षणानी क्षणानी जसे तास झाले

सदा तांडवे फक्त परिपक्वतेची
कधी कोवळेसे पदन्यास झाले?

कशाला तुका, माउली, मीर वाचा?
स्वतःला स्वतः जाणले, बास झाले

तुला पाहुनी आजही ओळ झाली
जसे शब्द आले, अनुप्रास झाले

'तुझा मी नि माझीच तू' वाटले... पण
तुला भास झाले, मला भास झाले

तसा मी कधीपासुनी तोच होतो
खरे सांगण्याने अविश्वास झाले

तुझी पावलापावलाला प्रचीती
मला वाटले फक्त आभास झाले

असे तत्त्व नाही तिथे मी असावे
'जुने जून झाले, नवे खास झाले'

मनांना दिला मी दिलासा जरासा
स्वतःच्याचपुरते किती व्यास झाले

तुझा जन्म हा 'बेफ़िकिर' छान गेला
जरी शेवटी शेवटी त्रास झाले