तिची माझ्या भोवतीची मिठी घट्ट झाली की
तिला तिच्या प्रियकराची आठवण होते आहे
हे कळण्याइतपत
मी आता सुज्ञ झालो आहे..
मग मी माझ्या शरीराला त्या मिठीत
ओलीस ठेवून
माझ्या मनाला सोडवून घेतो आणि
रात्रभर भटकतो
चमकत्या ताऱ्यांमधून,
अंधारल्या गल्लीबोळांमधून
दुःख विसरण्यासाठी आलेली आमंत्रणे नाकारत...
आणि पहाटे
परत जाऊन झोपतो.. माझ्याच मिटलेल्या डोळ्यात.. अलगद!
तेव्हा ती स्वप्नात तृप्त हसत असते स्वतःशीच
अन् ती मिठी तशीच असते
आणि मी
तृषार्त किंवा कृतार्थ कोण जाणे?
पण
नक्कीच कालपेक्षा अजून सुज्ञ!
-------------------------------------------------------
(जयन्ता५२)