उकडीचे मोदक

  • तांदूळ पीठी - २ वाट्या
  • गुळ - दिड वाटी
  • खवलेले खोबरे - दिड वाटी
  • वेलची, बेदामे काप
  • खसखस भाजून
  • साजूक तूप
२० मिनिटे
११ मोदक

गूळ - खोबरे एकत्र करून गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे, त्यात वेलची व खरपूस भाजलेली खसखस घालून पाहिजेत तर बदाम काप बेदाणे घालून तयार ठेवावे. फार कोरडे नको.

पातेल्यात पाणी तापवावे. त्यात १ चमचा तूप १ चमचा तेल व चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात तांदूळ  पिठी घालून उलथण्याने चांगले ढवळावे आणि झाकण ठेवावे. १ ते २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
उकड तयार.

उकडीची पारी करून त्यात सारण भरून मोदक वळावेत, अधे मध्ये हवे असल्यास पाण्याचा हात लावावा. सर्व मोदक करून घेऊन  कूकरमध्ये जश्या इडल्या उकडतो त्याप्रमाणे मोदक त्यामध्ये घालून  उकडून घ्या. कालावधी ५ मिनिटे. 

गरम गरम मोदकांवर साजूक तूप खावे. वरील प्रमाणात साधारण ११ ते १२ मोदक होतात

११/ २१ असे यथा- शक्ती (खरोखर आहे, मोदक वळायला पेशन्स फार लागतो ) मोदक करून चांदीच्या भांड्याने तूप ओता आणि गणरायाला नैवैद्य दाखवून खुष करा   मग घरच्या लोकाना, मित्रमंडळीना पंगतीला बसवून फडशा पाडा

सौ. आई.