बकुळ भिंगर्‍या

बकुळ भिंगर्‍या, घेत गिरक्या, पाण्यावरती, पडल्या अलगद,
सांगत होत्या त्या, जणू मजला, कुणीतरी, येणार अवचित.

उगाच नाही, अवखळ वारा, मातुलल्या, फांद्यांना झुलवत,
त्यास वाटते ,झोळीत तुझीया ,सौरभ हा, व्हावा समर्पित.

तुझ्या ओठीच्या, त्या पूरियातील, अंतरे मी, गेलो विसरत,
मनी राहिले, आता जे ध्रुपद, ते पुन्हापुन्हा, असतो आळवितं.

यावेस तू, ह्या सांजधुक्यातून, तुझ्यामागची, वाट मालवत,
तुझ्यासाठी, ह्या गारठ्यात मी, वृक्षाखाली, आहे निर्वासित.

हलक्या हाते तू, फुले वेचिता, जरी व्हावी ही, भेट ओझरतं
उमलावे, ओठांवर आपुल्या, संवाद काही जे, असती समीहित.

लाल केशरी, आभाळासंगे, सांजसावल्या परि, गेल्या सरकत,
वाट पाहुनी, बुडल्या भिंगर्‍या, पाण्याखाली, निजल्या निपचीत.

- अनुबंध