जरा धुंडाळले जेव्हा मनाचे कोपरे काही
किती गुंते निघाले अन् स्मृतिंचे पुंजके काही
दिले होतेस स्पर्शांचे कधी रेशीम तागाने
मनी अद्याप वागवतो जुनेरी लक्तरे काही
तुझ्यावाचून जगण्याची सरावाने सवय झाली
तुझ्याजागी करी माझ्या अता प्याल्यातले काही
स्मृतींचा घेत धांडोळा उतरलो भूतकाळी मी
दिले छद्मी समुद्राने रिकामे शिंपले काही
किती उच्चार प्रेमाचा, किती आणा, किती शपथा
मनी होते विधात्याच्या इरादे वेगळे काही
जुनी दीपावली स्मरतो, जरी काळोख वाट्याला
जशी उल्केस आठवती जुनी तारांगणे काही
पुसावे शब्द चुकलेले जुने दोघातले आता
नव्याने आज प्रेमाचे लिहावे अंतरे काही