बहिणाबाईंचे काव्य आजच्या काळातही मार्गदर्शक

बहिणाबाईंचे काव्य आजच्या काळातही मार्गदर्शक
मन वढाय वढाय.... असं म्हणत मानवी मनाचा गुंता जिने आपल्या कवितेत रेखाटला, कशाला काय म्हणू नये हे जिने जाणलं, संसाराची व्याख्या जिला पुर्णपणे कळली, माणूस. माणूस कधी होईल याचा जिला ध्यास लागला, वाटच्या वाटसरुलाही जिने मार्ग दाखविला अशी महान कवयित्री बहिणाबाई’,,,,
जांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द काव्य होऊन बाहेर पडायचा. बहिणाबाईंना जाऊन ५७ वर्ष पूर्ण झाली परंतु त्यांच्या कविता आजच्या काळातही चपलख लागू होतात.
घरापासून मळ्यापर्यंत हा बहिणाबाईंचा रोजचा प्रवास होता, कागद पेन दूरच पण अक्षरांची साधी ओळखही ज्यांना नव्हती त्यांची गाणी. कविता ओव्या आजच्या काळाही मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. मळा, मोट, पाणी चूल, तवा शेतीची कामे, घरोटा या आपल्या नित्याच्या वापरात असलेल्या साधनांचे दाखले देत बहिणाबाईंनी साऱ्या विश्वाला मोठे तत्वज्ञान सांगितले आहे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाच भांडार खुलं झालेलं आहे. तरीही अशी वाड:मय निर्मिती झाली नाही परंतू जीवनात जे दिसलं, जे अनुभवलं ते सहज मांडलं आणि त्यातून बहिणाबाईंनी जबरदस्त वाड:मयाची निर्मिती केली.
आजचं युग ग्लोबलायझेशनचे युग आहे, प्रत्येकाला काही ना काही मिळवण्याची आस आहे. त्यातही माणूस समाधानी नाही. अशा असमाधानी वृत्तीतून अनेकांची नैराश्याकडे वाटचाल चाललेली दिसते, स्व:त करत असलेल्या कामावर श्रद्धा नसल्याने काम पूर्ण केल्याचे समाधान मिळत नाही. कामाच्या समाधानापेक्षा गलेलठ्ठ पगार आज सर्वांची गरज बनत चाललीय. प्रत्येक गोष्ट सहज आणि कमी श्रमात मिळावी अशी अनेकांची इच्छा असते पण कष्टाला शाँर्टकट नसतो. श्रमाशिवाय काही नाही. हाताला चटका बसल्याशिवाय भाकर मिळत नाही हे बहिणाबाईंनी सांगितले आहे
अरे संसार संसार
जसा तवा चुल्हयावर
आधी हाताला चटके
तवा मिळते भाकर
कामाच्या ताणतणावाखाली जगणाऱ्यांना बहिणाबाईंची ही कविता उत्तम मार्ग दाखविणारी ठरेल. त्या म्हणतात
येरे येरे माझ्या जिवा
काम पडलं अमाप
काम करता करता
देख देवाजीचं रूप
काम करताना देवाचं रूप पाहिलं, कामालाच देव मानल तर काम निभावून नेणं सहज शक्य होईल. मनाला समाधान न मिळाल्यानं माणूस मन:शांती, ज्योतिषी अशा गोष्टींकडे ओढला जातो. आजकाल अनेक वाहिन्या, ज्योतिषीच्यांचे कार्यक्रम दाखवतात. वास्तुशास्त्र, फेंगशुइ प्रतिष्ठांचे बनले आहे. पण ज्योतिष म्हणजे काय हे बहिणाबाईंनी कित्येक वर्षापूर्वी जाणलं. दारी आलेल्या ज्योतिषीला त्यांनी परत पाठवले. माझं नशीब मला माहित आहे असं सांगणाऱ्या बहिणाबाईं खंबीर महिलेचे दर्शन घडवतात.
बापा नको मारू थापा
असो खऱ्या, असो खोट्या
नही नशीब नशीब
तय हाताच्या रेघोट्या
नको नको रे जोतिष्या
नको हात माझा पाहू
माझं दैव मला कये
माझ्या दारी नको येऊ
आजच्या काळात जी स्थिती ज्योतिषाची तीच देवधर्माची. आजकाल मंदिराचाही बाजार मांडलेला दिसतो. देवाला हिरेजडित मोबाईल, गणपतीच्या चरणी २०० कि. सोनं, देवदर्शनाला सेलिब्रेटी अशा अनेक बातम्या वृत्तपत्रात, वाहिन्यांवर वारंवार दिसतात आणि देवाला गरीब श्रीमंत अशा भेदभावात तोललं जातय. याची जाणीव बहिणाबाईंना झाली होती.
सोन्यारूपान मढला, मारवाड्याचा बालाजी
शेतकऱ्याचा इठोबा, पानाफूलामधी राजी
अरे बालाजी. -इठोबा दोन्ही एकज रे देव
गरीबीनं सम्रीतीनं केला केला दुजाभाव
गरीब आणि श्रीमंत अशा दुजाभावात देवाला भक्तांनी अडकवल्याचे वर्णन जितक्या प्रभावीपणे त्यांनी केलय़ तितक्याच भावपूर्ण शब्दात दर्शनाला जाऊ न शकणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा मांडलेय. राज्यात दुष्काळ, कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या काळात एखाद्या शेतकऱ्याच्या तोंडी ही ओवी चपखल बसू शकते.
अरे पांडूरंगा तुझी
कशी भक्ती करू सांग
तुझ्या रूपा आड येत
सावकाराचं रे सोंग
बहिणाबाईंची गाणी केवळ तत्त्वज्ञान सांगणारी नव्हती तर बहिणाबाईंना विनोदाचीही जाण होती. आज पी. जे. ग्राफिटीचं युग आहे. २४ तास टिकत नाही तिला टिकली क म्हणतात?
असा प्रश्न आजचा तरुण सहज विचारतो तसे काही प्रश्न बहिणाबाईंनीही विचारले आहेत. परंतु त्यांच्या विनोदामध्ये भावार्थ दडला आहे. ज्याच्यातून पीठ येत त्याला जातं म्हणू नये, तसेच गुढी उभारतो त्याला म्हणती पाडवा आणि ऊभा जमिनीमध्ये आड त्याला म्हणती उभ्याले. असे गमतीदार प्रश्नही त्यांच्या गाण्यातून प्रकटलेले दिसतात.
माणसाचं आयुष्य, मानवी मन याचा फार मोठा अभ्यास बहिणाबाईंना अनुभवातून झालेला दिसतो
.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याले उतारे मंतर
उतारे नसललं माणसाचं मन कालही तसच होतं आजही तसच आहे. माणूस माणूसपण विसरल्याची उदाहरणे समाजात मोठ्या प्रमाणत दिसतात. भ्रष्टाचार, अत्याचार, प्रांतिक-भाषिक वादिवाद, बाँंबस्फोट अशा घटनांनी माणसाचं माणूसपण हरवून गेलं आहे
मानसा मानसा कधी व्हशील मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस
इतके वर्षांनंतर आजही बहिणाबाईंनी रेखाटलेले मानवीवृत्तीचं दर्शन कुठे बदललय?
सहज कुठेही कधीही सुचलेली बहिणाबाईंची गाणी आजच्या युगातही खूप काही सांगून जातात. ज्याला बहिणाबाईंची गाणी ज्याला कळली त्याला जीवन कळले असं म्हणावं लागेल.
बहिणाबाईंना जीवन कधीच कळलं होतं.
आला सास गेला सास
जीवा तुझं रं तंतर
असे जनम मरन
एका सासाचं अंतर
जीवनाचं अगाध तत्त्वज्ञानआपल्या सहज सुंदर कविता, गाणी ओवी, म्हणीतून मांडणारी ही महान कवयित्री आज आपल्यात नसली तरी तिची वाड:मय सम्रृद्धी पुढच्या काळातही
अबाधित राहिल अशीच आहे.
...........................................................................................
लेखक-सुनिल पाटकर
..............................................................................................................................................................................................................................