मातृत्व

"अग आसावरी लवकर आवर पाहुणे यायची वेळ झाली", आईची हाक आता आसावरीसाठी नेहमिचीच झाली होती. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यासमोर खरी आसावरी कुठेतरी गाडून, ओठांवर हसू फुलवून स्वतःच्या शालीनतेचं प्रदर्शन करण्याचा आता तिला अगदी वीट आला होता.
आसावरी अविनाश निंबाळकर. नवऱ्याने सोडून दिलेली परित्यक्ता. कोणतंच कारण नसताना नियतीची चेष्टा सहन करणारी निरागस आसावरी.
 तसं बघायला गेलं तर अविनाश आणि आसावरी दोघेही अगदी एकमेकांसाठीच असलेले. दोघेही व्यवसायाने डॉक्टर.
आसावरी गोड, हसरी, खट्याळ, बालिश तर अविनाश देखणा, थोडासा गंभीर, वास्तववादी. पहिल्या नजरेतच आसावरीला तो आवडून गेला. आसावरीही कुणालाही आवडेल अशीच होती. सुरवातीला जमलेली निखळ मैत्री प्रेमात कधी रूपांतरित झाली कळलंच नाही. खरं तर आसावरी या बाबतीत निरागसच होती. प्रेमाची पहिली अनुभुती झाली ति अविनाशलाच. अखंड बडबड करणारी बालिश आसावरी त्याच्या मनात कुठेतरी घर करत गेली. अन एक दिवस त्याच्या मनाची स्वामिनीच झाली.
इकडे आसावरी या सगळ्यापासून अनभिन्नच होती. तिच्या दृष्टीने अविनाश एक निखळ मित्रच होता. तिच्याभोवती भिरभिरणारा, तिची चेष्टा मस्करी करणारा वेडा मित्र.
पण हळूहळू आसावरीला जाणवू लागलं की ति नसताना अविनाश खूपच गंभीर होतो, कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो अन त्याच एका बेमालूम क्षणी आसावरीला हे सगळं हवहवस वाटायला लागलं. जगाच्या व्याख्येत जसं प्रेम असत तसं त्यांचं प्रेम फुलत गेलं. दोघांनाही वाटायचं ते फक्त एकमेकांसाठीच आहेत.
अविनाशच आसावरीच्याभोवती रुंजी घालणं, तिच्या आवडीनिवडी जपण हे सगळं घडताना आसावरीला अविनाश दररोज नव्याने भेटायचा. थोडासा हट्टीपणाही होता अविनाशच्या वागण्यात. पण प्रेमात पडणाऱ्या सगळ्या माणसांप्रमाणे आसावरीलाही अतिआत्मविश्वास होता अविनाशला बदलण्याचा. त्याला बदलण्याच्या नावाखाली किंवा त्याच्या मनाप्रमाणे वागताना तिची अस्मिता क्षणाक्षणाला लोपत होती हे तिला कळतच नव्हत.
प्रेमात मनसोक्त डुंबून झाल्यावर आसावरीला आता अविनाशबरोबर सप्तपदी चालून त्याच्याशी सात जन्माच नात जोडायचं होतं. दोघांनीही आपापल्या घरी सांगितल्यावर दोन्हीकडून होकार मिळाला. चांगली सून अन चांगला जावई मिळाला म्हणून दोन्ही घरी आनंद होता.
घराचा उंबरठा ओलांडून जेव्हा आसावरी अविनाशच्या घरी अली तेव्हा तिला काय माहीत की ज्याच्या आधारावर तिने घराचा उंबरठा ओलांडला तो आधारच कुचकामी ठरणार होता. नववधूची सुंदर स्वप्ने आज आसावरीच्याही डोळ्यात होती. पण त्या स्वप्नांच वास्तव नियती ठरवणार होती.
स्वतःच्या आवडत्या माणसाला इतके दिवस जपून ठेवलेलं संचित देताना खरंतर आसावरीला स्वर्ग दोन बोटे उरला होता.
अविनाशही तसा खुशीतच होता. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायला मिळणार याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
सुरवातीचे फूलपंखी दिवस भराभर संपून गेले अन आता खरी अविनाश आणि आसावरीच्या संसाराला सुरुवात झाली.
व्यवसायाने डॉक्टर असणारी आसावरी आणि अविनाश दोघेही व्यवसाय आणि घर या दोन्ही डोलकाठ्यांवर बागडत होते.
माहेरी एकटी मुलगी म्हणून लाडाने वागवलेल्या आसावरीला सुरुवातीला थोडं जडच जात होत लाडावलेली असली तरी समंजस होती आसावरी. तिच्या अविनाशसाठी ति तिच्या आवाक्यातल्या कोणत्याही गोष्टींचा त्याग करायला  तयारं असायची.
म्हणता म्हणता लग्नाला दोन वर्ष पूर्णं झाली. आसावरीला अलीकडे आपण कुठेतरी अपूर्ण आहोत अस वाटायला लागलं होतं. तिच्या अपूर्णत्वाला पूर्णत्वं मिळणारं होतं ते फक्त तिच्या आई होण्यानं. मनात कुठेतरी अनामिक हुरहुर असायची स्वप्नातसुद्धा तिला लहान लहान गोजिरवाणी मुलेच दिसायची हे सगळं घडताना आसावरीने ठरवलं या विषयावर अविनाशशी बोलायचं. या सगळ्या गोष्टीनंतर जवळजवळ एक महिन्याने आसावरीला संधी मिळाली.
त्या दिवशी शनिवार होता. हॉस्पिटलला सुट्टी असल्यामुळे दोघेही घरिच होते. आसावरीच्या संस्कारी मनाला हे कुठेतरी डाचत होत की मुलाबद्दल आपण अविनाशाशी कस बोलायचं? पण मनाचा हिय्या करून आसावरी अविनाशला म्हणाली, "अविनाश मला तुला काहीतरी सांगायचंय". अविनाश पेपर बाजूला ठेवून आसावरीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, "बोल ना, काय सांगायचंय? "
आसावरी म्हणाली, "अविनाश मला तुझ्या बाळाची आई व्हायचंय. "
अंगावर पाल पडल्यासारखा अविनाश किंचाळला, "काय तुला वेड तर लागलं नाही ना? मला नाही आवडत लहान मुलं"
आसावरीला क्षणभर वाटलं की अविनाश थट्टाच करतोय. म्हणून तिने लाडात येऊन म्हटलं, "अस काय रे अवी? हि कसली भलतीच थट्टा? " अविनाश रागाने म्हणाला, " हि थट्टा नाही आहे, मला खरंच लहान मुलं आवडत नाहीत. आणि मला मूल नकोय हा माझा अंतिम निर्णय आहे. तुला हवं तर तू मूल दत्तक घेऊ शकतेस. तेही सर्वस्वी तुझ्या जबाबदारीवर. मूल जन्माला घालण्यास मी समर्थ नाही हा गैरसमज तर अजिबात करून घेऊ नकोस. हवं असेल तर मी सर्व चाचण्या करून घ्यायला तयार आहे. "
त्याची हि वाक्य ऐकून आसावरीच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या अविनाशवर तिने प्रेम केलं तो अविनाश हाच होता का याचा क्षणभर आसावरीला संशयच आला. तिला क्षणभर ओरडून विचारावंस वाटलं"मला मूल दत्तकच घ्यायचं होत तर तुझ्या बरोबर लग्न करायची काय गरज होती.
असं म्हणतात कोणत्याही स्त्रीच्या मातृत्वावर जेव्हा गदा येते तेव्हा त्या स्त्रीची अस्मिताच हरवून जाते. आसावरींचंही असच झालं. नुकतंच वाढत चाललेलं रोपटं वादळामुळे उन्मळून पडावं तसं.
आसावरीने अविनाशला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण सगळंच व्यर्थच ठरलं. अविनाशला बदलण्याची स्वप्न बघणारी आसावरी स्वतःच पुर्णपणे बदलून गेली.
आसावरी आजकाल थाऱ्यावरच नसायची. तिचे विझले डोळेसुद्धा नवं स्वप्न पाहायला घाबरायचे. प्रत्येक वेळी एकच  विचार मनात यायचा माझं काय चुकलं. पण त्या वेडीला काय माहीत प्रत्येकावेळी माणूसच चुकत नसतो तर त्याचं नशीबही कधी कधी चुकतं.
दिवसामागून दिवस जाता जाता सहा महिने उलटून गेले. आता आसावरीला काहीतरी ठाम निर्णय घेणं भागच होत.
त्याप्रमाणे तिने पुन्हा अविनाशला विचारलं. त्याच्या कडून नकार आल्यावर ति त्याला फक्त एवढंच म्हणाली, "अविनाश मला घटस्फोट हवाय". अविनाशलाही हा धक्का अपरिचितच होत. पण जणू आपण त्या गावचेच नही अशा पद्धतीने त्याने तिच्या निर्णयाचा स्वीकार केला.
स्वतःच्या निर्णयावर दोघांनीही सामोपचाराने घटस्फोट घेतला स्वतःच्या वेगळ्या वाटा शोधण्यासाठी. राखेतून पुन्हा असाहाय्य भरारी मारण्यासाठी. खरंतर त्या रात्री आसावरी खूप रडली अगदी नियतीलाही लाज वाटावी इतकी रडली. पण तिचे अश्रू पुसायला, तिला आधार द्यायला तिचा अविनाश तिचा राहिला नव्हता.
इकडे माहेरी आल्यावर आसावरीच्या आईबापालाही धक्काच बसला. पण त्यांनी जेव्हा आसावरीकडून सारी परिस्थिती ऐकली तेव्हा त्यांना आसावरीचा अभिमानच वाटला अन तिच्या नशिबाची कीवही आली.
आता परत आसावरीला तिचा प्रवास नव्याने सुरू करायचा होता. अगदी एकटीने. तिच्या अविनाशशिवाय. म्हणूनच तर तिने तिच पूर्णं लक्ष तिच्या वैद्यकीय व्यवसायात घातलं.
पण म्हणतात न वर्तमानकाळ जगताना माणसाच्या भूतकाळातली भूत आठवणी बनून माणसाचा पाठलाग करतात. तसंच झालं होत आसावरीचं. सुरुवातीला तर तिला तिची सौ. अविनाश हि प्रतिमा पुसून टाकायची होती. कारण हॉस्पिटलमध्ये तिला प्रत्येकजण याच नावाने ओळखत होता.
कधी कधी एकांतात असताना आसावरीला नेहमी वाटायचं हे सगळं माझ्याबरोबरच का?

ज्या माणसावर तिने अतोनात प्रेम केलं त्या माणसाने असं वागावं. तिचा खरं तर चांगुलपणावरचा विश्वासच उडाला होता.
इकडे अविनाशही वेड्यासारखाच वागायचा. त्याला कळतच नव्हतं तो वागला ते योग्य होत की अयोग्य. प्रत्येकावेळी त्याला आसावरीची उणीव जाणवायची. पण त्याच अहंकारी मन ते मानायलाच तयार नसायचं.
हॉस्पिटलमध्ये भेटल्यावर दोघांच एकमेकांपासून नजर फिरवणं, एकाच केसमध्ये व्यावसायिकदृष्ट्या भेटणं हे सगळं आसावरीसाठी अगदीच कठिण होत.
तसं पाहायला गेलं तर अविनाशही काही आनंदी नव्हता. पण तो तसं दाखवत होता.
आसावरी मात्र कणाकणाला विझत होती. जिथे देव म्हणून विश्वासाने डोकं ठेवावं तिथे दगडच निघाला. आसावरीचा काही दोष नसताना आसावरीला शिक्षा मिळाली.
आसावरी दिवसामागून दिवस ढकलतं होती अन कणाकणाने उभारी घ्यायचा प्रयत्न करत होती. इकडे अविनाशला आता स्वतःची चूक कळून यायला लागली होती अन विशेष म्हणजे त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना दिसत होती. असेच दिवसामागून दिवस निघून गेले. आता अविनाशला आसावरीची उणीव जास्तच भासू लागली. अन विशेष म्हणजे त्याच्या डोळ्यात ते सगळं प्रतिबिंबित होत होतं.
अविनाश आता आसावरीशी बोलण्याची संधी शोधायचा अन त्यांप्रमाणे त्याला एकदिवस तशी संधी  मिळाली.
त्यादिवशी आसावरी तिच्या केबिनमध्ये एकटींचं बसली होती. तेवढ्यात अविनाश आत आला. त्याला आलेला बघून क्षणभर आसावरीला काय करायचं तेच कळेना. अजूनही तिच्या मनात त्याच्याबद्दल कुठेतरी प्रेम होतं.
अविनाशने प्रस्तावना न करता सरळ सरळ मुद्द्यालाच हात घातला. तो म्हणाला, "आसावरी मला माफ कर. " आसावरीला क्षणभर कळेचना तो काय म्हणतोय ते. पण तिने स्वतः:ला सावरून घेतलं अन ति भरकन केबिनबाहेर निघून गेली.
त्यानंतर प्रत्येकावेळी अविनाश आसावरीशी बोलायचा प्रयत्न करायचा. अगदी पहिल्यांदा जसा तो आसावरीभोवती रुंजी घालायचा अगदी तसा. पण आसावरी मात्र कुठेतरी दूर क्षितिजावर असायची. तिला कळतच नव्हतं हा अविनाश खरा की तो अविनाश खरा.
खरंतर आता तिला यात फरक शोधायचाच नव्हता. अविनाशच आसावरीसाठीच तळमळणं दिवसेंदिवस वाढतच चाललं होत. आसावरीलाही वाईट वाटायचं काहीच कारण नसताना त्यांच्या संसाराला दृष्ट लागली.
पुन्हा एकदा अविनाशने आसावरीला हॉस्पिटलमध्ये गाठलं आणि तो म्हणाला, "आसावरी खरंच मी चुकलो, मला माफ कर"
पण आसावरी शांतच होती. पण का कोण जाणे तिला वाटलं हिच योग्य वेळ आहे बोलण्याची.
आसावरी अविनाशला म्हणाली, "अविनाश, तुला जेव्हा हवं तेव्हा तू परत आलास. सुरुवातीला मला जाणवत होत की थोडा हट्टी आहेस म्हणून. पण मला वेडीला वाटायचं माझं प्रेम तुला बदलेल. पण तू तर माझ्यातल्या आसावरीलाच बदललंस. अविनाश तू प्रत्येकावेळी शब्दांच्या भिंती तयार करत गेलास अगदी तुझ्यामाझ्याही नकळत. तुझ्यामाझ्यातलं अंतर अविनाश वाढतच गेलं. पण तू स्वतःची चूक कबूल करायला खूप वेळ लावलास. तुझा आवाज खरंतर आता माझ्या मनापर्यंत पोहचतच नाहियाय.
अविनाश खरंतर मी तुझ्यावर कधीच रागावू शकत नाही. पण मला वाईट इतक्याच गोष्टीच वाटतं की ज्या माणसावर मी मनापासून प्रेम केलं त्या माणसाने माझं मातृत्वच नाकारावं.
आता अविनाश आपल्या दोघांचेही नदीचे काठ झालेत. मलाही तुझ्याशी खूप बोलायचा असत. पण आता तू माझ्या डोळ्यांसाठी अनोळखी झाला आहेस. तुझं परत येणं बघून वाटलं होत पुन्हा एकदा नवीन सुरुवात करून पाहावी. पण आता माझं मनच बिचारं कुठेतरी बिचकतं. "
अविनाश म्हणाला, "आसावरी मला एक संधी दे, मी पुन्हा आपले गेलेले दिवस परत आणेन. "
आसावरीने फक्त तिची मान फिरवली स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपविण्यासाठी. अविनाशही काय समजायचे ते समजला. अन एखाद्या पराभूत माणसाप्रमाणे तो जायला निघाला तेवढ्यात आसावरी म्हणाली, "अविनाश तू पुन्हा नव्याने सुरुवात कर एका नव्या जोडीदाराबरोबर. असा एकटा दु:खात राहू नकोस. त्याचा मला त्रासच होईल. अन तू तुझ्या आसावरीला कधी त्रास होईल असं वागणार नाहीसं हे माहित्येय मला. "
अविनाशला खरंच खूप वाईट वाटलं आसावरीला गमावल्याबद्दल अन थोडं समाधानही वाटलं आसावरीला त्याची काळजी आहे हे बघून.
त्यानंतर दिवस भरभर गेले. जनरितिप्रमाणे आसावरीला सगळे दुसरं लग्न कर म्हणून सांगू लागले. खरंतर आता तिला जुगार खेळायचाच नव्हता पण आईबाबांच्या आनंदासाठी ति तयार झाली.
पण इथेही नियती तिची थट्टाच उडवणार होती. तिला जि स्थळ यायची त्यांना मुलगी घटस्फोटित असली तरी विनापत्य हवी असायची अगदी मूल होण्याला असमर्थ असणारी.
इथेही आसावरीच्या मातृत्वावर प्रश्न उभा राहिला. पण आता आसावरी पूर्विची कुठे राहिली होती. ति जगत होती मरता येत नाही म्हणून, एक कर्तव्य म्हणून. अणी म्हणूनच आसावरी या सगळ्या अटी मान्य करून पुन्हा लग्नाला उभी राहिली.
आजही ति एका विधुरापुढे स्वतःच्या शालीनतेचं, आनंदी असण्याच प्रदर्शन करणार होती. स्वतःच मातृत्व गाडून त्याच्या मुलांची दत्तक आई होणार होती.