भिजते बऱ्याच वेळा

आतून आसवांनी भिजते बऱ्याच वेळा
वरवर उगाच कांदे चिरते बऱ्याच वेळा


बंधात याचसाठी मी राहणार नाही
बंधात एकटी घुसमटते बऱ्याच वेळा


कुठल्या मृताप्रमाणे माझे न अंत्यकर्म
इच्छा चितेविनाही जळते बऱ्याच वेळा


आणू नकोस आता हा मोगरा पुन्हा तू
माळून त्यास मीही सुकते बऱ्याच वेळा


सोयीनुसार माझे नाते हवे तुम्हाला
शय्येस सोबती सापडते बऱ्याच वेळा


सारेच मर्द येथे असतात जीवघेणे
आई बहीण कोठे स्मरते बऱ्याच वेळा


प्रत्येक श्वापदाला मानू नकोस साधे
बघण्यात चूक अपुली असते बऱ्याच वेळा


देहासमोर माझ्या कोणीतरी अधाशी
फुकटातही स्वतःला लुटते बऱ्याच वेळा


- मानिनी मांडणी बऱ्याच वेळा ... वरून घेतली आहे