अमेरिकेचे राष्ट्रीय ग्रंथालय

   ग्रंथालय म्हणजे एखाद्या इमारतीतील लहानशी खोली,  कोंदट वातावरण, पुस्तके कपाटांमध्ये कशीतरी रचून ठेवलेली आणि एक माणूस खुर्चीवर बसविलेला, अशीच प्रतिमा ग्रंथालयाशी संबंध नसलेल्या आम जनतेची असते. या आम जनतेत इंजिनिअर, डॉक्टर, वकील आदी सुप्रतिष्ठित लोकही असतात. शाळा आणि महाविद्यालयाव्यतिरिक्त ग्रंथालयाशी संबंध आलेला नसतो. ज्ञान अगदीच अद्ययावत असेल तर शहराचे मध्यवर्ती ग्रंथालय ऐकून माहीत असते. केवळ शाळा-महाविद्यालये आणि शहरांमध्ये ग्रंथालय नसते तर देशाचेही एक राष्ट्रीय ग्रंथालय असते, ही माहिती अनेकांसाठी पूर्ण नवी असते.
     अमेरिका.  जगातील सर्वोच्च सत्ता राहिलेल्या या देशाने स्वतःचे राष्ट्रीय ग्रंथालय जपले आणि वाढविलेले आहे. लायब्ररी ऑफ कॉग्रेस (LOC)हे त्या भव्य ग्रंथालयाचे नाव आहे.
     अठराशे साली स्थापन झालेल्या या ग्रंथालयाने दोनशे वर्षे ओलांडून आता तिसऱ्या शतकात प्रवेश केलेला आहे. अमेरिकन जनतेला ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या सर्व साहित्य खुले करून देणे व ग्रंथालयात जगातील सर्व महत्त्वाची पुस्तके संग्रहित करून ठेवणे हे लायब्ररी ऑफ कॉंग्रेसचे ध्येय आहे.
     अठराशे साली तत्कालीन अध्य़क्ष जेम्स अँडरसनच्या पुढाकाराने अमेरिकेच्या संसदेत एक लहानसे ग्रंथालय सुरू झाले. पुस्तकांच्या संग्रहासाठी अँडरसनने जवळजवळ संपूर्ण आय़ुष्य खर्च केले होते. त्यावेळी त्या ग्रंथालयाचा खर्च केवळ ५००० डॉलर एवढाच झाला. १८१४ मध्ये ब्रिटिश फौजांनी लावलेल्या आगीत हे ग्रंथालय जळून खाक झाले. जळल्यानंतरही अँडरसन हिंमत हरला नाही. ग्रंथालय नव्या जागेत नेण्याची योजना तर त्याने बनविलीच शिवाय, त्याचे धोरणही आखून दिले. साहित्याबाबत सर्वसमावेशकता, हे त्याचे मुख्य सूत्र होते. सुरुवातीला जगातील सर्व विषयांचे साहित्य असण्याची गरज काय, अशी त्याच्यावर टीका झाली पण तो स्वतःच्या मुद्यांवर ठाम राहिला आणि त्याचे फळ म्हणून लगेचच पुढील वर्षी ग्रंथालय सहा हजार पुस्तकांसह भरपूर अनुदान मिळवून उभे राहिले. १८६४ ते १८९७ या कालावधीत तत्कालीन ग्रंथपाल रँड यांनी अँडरसनच्याच पावलांवर पाऊल टाकून संग्रह खूप विकसित केला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला इमारतीच्या नव्याने बांधणी झाली आणि याच सुमारास केवळ संसदेसाठी असणारे ग्रंथालय सामान्य जनतेसाठी खुले झाले.
      ग्रंथालयाचा भर अमेरिकन साहित्य ठेवण्याकडेच आहे. आजमितीस १३० मिलियन पुस्तके या ग्रंथालयात आहेत. परंतु, सर्वसमावेशकतेच्या सूत्रास अनुसरून या १३० मिलियन पुस्तकांमध्ये जगातील तब्बल ४६५ भाषांमधील महत्वाची पुस्तके या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत. यात मराठी भाषेचा समावेश असून महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची, पु.ल.देशपांडे यांची सर्व पुस्तके या ग्रंथालयात आहेत. केवळ या ग्रंथालयाची माहिती देणारी असंख्य पुस्तके संग्रही आहेत. दररोज सुमारे २२,००० पुस्तके या ग्रंथालयात स्वीकारली जातात आणि त्यापैकी सुमारे १०,००० पुस्तके प्रत्यक्ष संग्रहात रुपांतरीत होतात. नवी दिल्ली, कैरो, रिओ दि जानेरो, जाकार्ता, नैरोबी आणि इस्लामाबाद येथील शाखांद्वारे ही पुस्तके घेतली जातात आणि या ग्रंथालयात यथावकाश पोचविली जातात. साधारणपणे जगातील कोणत्याही पुस्तकाचा आकार ए चार हा असतो किंवा त्यापेक्षा थोडा लहान अगर मोठा. येथील सर्वात लहान पुस्तक पाव इंच गुणिले पाव इंच एवढ्या आकाराचे आहे आणि त्याचे नाव आहे ओल्ड किंग कोल. गंमतीदार बाब म्हणजे या पुस्तकाची पाने केवळ सुईच्या साहाय्यानेच उलटली जाऊ शकतात. बोटांनी पाने उलटणे केवळ अशक्य आहे. सर्वात मोठे पुस्तक पाच फूट रुंद व सात फूट लांब असे आहे. या पुस्तकात पुरातन काळातील भूतानची सचित्र माहिती आहे. मजकुरापेक्षा छायाचित्रांनीच हे पुस्तक व्यापलेले आहे आणि अर्थातच पुस्तकाचा आकार अतिशय पूरक आहे. सुमारे चौदा मिलियन छायाचित्रे या ग्रंथालयात आहेत. शिवाय, बावीस मिलियन ध्वनिफिती आहेत. ध्वनिफीत विभागाचे वैशिष्ट्य असे की, फ्लूट या एकाच प्रकारच्या नादाच्या सर्वाधिक ध्वनिफिती जगातील केवळ याच ग्रंथालयात आहेत. पारंपरिक अमेरिकन फोक संगीताचा सर्वाधिक संग्रह या ग्रंथालयात आहे. शारिरिक व्यंग असलेल्यांसाठी, विशेषतः अंधांसाठी या ग्रंथालयात बोलणारी पुस्तके ठेवण्यात आली असून दिवसेंदिवस त्यांचा संग्रह वाढतोच आहे. टेलिफोन डिरेक्टरीज हे या लायब्ररी आफ कांग्रेसचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. सुमारे शंभर देशांतील महत्वाच्या डिरेक्टरीज येथे आहेत. कामिक्सचा जगातील सर्वाधिक संग्रह याच इमारतीमध्ये असून जगातील सर्वात जुन्या वृत्तपत्राचा पहिला अंक मूळ स्वरूपात य़ेथे ठेवण्यात आला आहे.
    १३० मिलियन पुस्तके आहेत, याचा अर्थ ती जागाही मोठी असणार. ग्रंथालय तीन भव्य इमारतींमध्ये विभागलेले आहे. थॉमस जेफरसन बिल्डिंग १८९७ साली बांधली गेली. हीच मुख्य आणि जुनी इमारत.१९३८ मध्ये जॉन अडम्स बिल्डिंग बांधली गेली आणि १९८१ मध्ये जेम्स मॅडिसन बिल्डिंग बांधली गेली. कल्पनाही केली जाऊ शकणार नाही, एवढ्या संख्येने या ग्रंथालयात कर्मचारी आहेत. 
      किती कर्मचारी असू शकतील, याचा क्षणभर विचार करा...
      सुमारे साडेतीन हजार कर्मचारी या तीनही इमारती मिळून काम करीत आहेत!  
      संगीत, छायाचित्र या विभागांसह ग्रंथालयात अनेक महत्वाचे विभाग आहेत. कॉपीराईट विभाग हा त्यापैकीच एक. कॉपीराईट म्हणजे काय येथून ते मिळविण्याच्या अंतिम प्रक्रियेपर्यंत हा विभाग साह्य करतो. असाच आणखी एक विभाग म्हणजे कायदा विभाग. हा केवळ विभाग नसून कायदा ग्रंथालय हे त्याचे नामकरण झालेले आहे. कायद्याचे सबकुछ या ग्रंथालयात उपलब्ध आहे. वेळप्रसंगी चर्चासत्रे, शिबिरे घेऊन गरजूंना मार्गदर्शन केले जाते. युरोप हा तसा काव्यप्रेमी प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि अमेरिकेचा हा पैलू नेहमीच दुर्लक्षिला जातो. अमेरिकेतही कवितेची परंपरा आहे, हे कळते कविता विभागाकडून. या क्षेत्रातील विविध घडामोडींची माहिती या विभागातून मिळते. संशोधन विभाग हा  महत्वाचा विभाग पध्दतशीरपणे वाढविलेला आहे. कोणत्याही विषयातील संशोधन करायचे असो, हा विभाग त्यात मोलाची कामगिरी बजाविल्यावाचून राहातच नाही. एलओसी च्या एकूण कार्यपध्दतीचा बारकाईने अभ्यास केला तर हे लक्षात येते की, जगात जे जे नवीन आहे ते ते आपलेसे करून त्यावर माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
     विविध शाखांद्वारे पुस्तकांची भर पडतेच पण या व्यतिरिक्त नागरिकांनी स्वतःकडील दुर्मिळ पुस्तके व इतर कागदपत्रे दान करावीत, असे आवाहन ग्रंथालयाने केलेले आहे. अशा दुर्मिळ पुस्तकांची जबाबदारी ग्रंथालयाने उचललेली आहे. या आवाहनाला प्रतिसादही भरघोस मिळत असतो.
     या भव्य वास्तूला दररोज भेट देणारे पर्यटक हजारो आहेत. शिवाय, या ग्रंथालयात सांस्कृतिक कार्यक्रम बहुसंख्येने होतात. वेळापत्रक आखून चित्रपटही दाखविले जातात.
     ज्या ग्रंथालयात तीन हजारांवर कर्मचारी काम करतात आणि जिथे वैविध्यपूर्ण कामे चालतात, तिथे नोकऱ्यांच्या संधी मुबलक असाव्यात यात नवल नाही. विविध पदे तेथे सतत निर्माण होत असतात आणि भरली जात असतात. अर्थात, निवडीचे नियम व अटी भरपूर आहेत आणि त्यांची अंमलबजावणीही अत्यंत काटेकोरपणे केलेली असते. बहुतांशी, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या शाखेचे व्यावसायिकच या पदांवर काम करीत आहेत. 
     केवळ पुस्तकांचा साठा करून ग्रंथालय थांबलेले नाही. जेफरसन इमारतीतील काही महत्वाची दालने ग्रंथालयाकडून विविध कार्यक्रमांसाठी उपलब्ध केली जाऊ शकतात. ग्रंथालय हे न-नफा तत्वावर चालणारी गोष्ट आहे पण चतुर वापर केला तर ग्रंथालय हे उत्पन्नाचे साधनही होऊ शकते. Is your organization interested in having its next dinner or reception on Capitol Hill? अशी आकर्षक जाहिरात ग्रंथालयाने केली आहे. 
    जालस्थळाशिवाय आता जीवन कठीण होईल की काय, अशी परिस्थिती जगभर आहे. अमेरिका संगणक क्षेत्रात क्रमांक एकवर असल्याने ग्रंथालयाचे स्थळ सतत अद्ययावत केले जात असते, हे साहजिकच. 
    अमेरिकेच्या सर्व आजी व माजी अध्यक्षांनी या ग्रंथालयाचे कौतुक केलेले आहे आणि प्रसंगी मदतही केलेली आहे. या ग्रंथालयाच्या स्थळावर पोर्टल्स टु द वर्ल्ड या लिंकवर भारताबद्दल खूप लिंक ठेवलेल्या आहेत.  
     अमेरिका म्हणजे बिल गेटस, पैसा आणि मुक्त संस्कृती एवढेच नाही. त्याहूनही अधिक काही आहे. त्या अधिक काहीमध्ये हे ग्रंथालय आहे.