कारची काळजी कशी घ्यावी?

मी सुद्धा अशीच सेकण्ड हॅण्ड (मराठीत काय? ) मारुती ८०० घेतली होती. माझ्या अनुभावाने मला जे कळले ते तुम्हाला सांगतो. ( आपल्या गाढवपणा मुळे घडलेल्या घोडचुकांना अनुभव असे म्हणतात. )

प्रथम तुमच्या प्रष्णांची उत्तरे.

१. महामार्गावर काय किवा शहरात काय, ईंजीन गरम व्हायला नको असेल तर तीन बाबी महत्त्वाच्या,

रेडिएटर मध्ये घाण नको , पुरेसे कुलण्ट / पाणी हवे त्याचे सर्क्युलेशन चांगले हवे , (पुढच्या सर्व्हिसिंग मध्ये रेडिएटर काढून साफ करून घ्या. गरम स्थिती मध्ये रडिएटर चे झाकण कधीही उघडू नका फवाऱ्या ने, वाफेने भाजून निघाल)

रेडिएटर समोरचा पंखा नीट काम करणारा असावा तो जरी स्वयंचलित असला तरी त्याला आपण सुरू करण्या साठी एक बटण बसवून घ्या म्हणजे स्वयंचलित यंत्रणेने दगा दिला तरी तो तुम्हाला सुरू करता येईल.

इंजीन फार गरम झाले तर किंवा फार जुने होण्या मुळे इंजिनची गास्केट खराब होते अशा वेळी इंजीन बंद पडते. ही वेळ न येण्या साठी इंजिनाचे तापमान  मोजण्याच्या डायल वर ५०% च्या पुढे जात असेल तर १५-२० मिनीटे थांबावे. मोठ्या प्रवासात घाटाच्या आधी थांबावे हा वेळ चहा पाण्यासाठी वापरावा. गास्केट खराब होणे सुरू झाले तर रेडिएटर मध्ये वारंवार पाणी/ कुलण्ट ची भर टाकावी लागते. इंजिनचे झाकण उघडल्यास इंजीन ऑइल मध्ये फेस दिसतो. गास्केटचे काम=किमान रु. २००० चा खर्च!!

२. चाकांमध्ये २५-२८ ( मला वाटते पाउण्ड/ वर्ग इंच. ) ठेवतात. पण लांब प्रवासाकरता थोडा कमी ठेवा (२४) कारण महामार्गावर एक्स्प्रेस वे वर बराच वेळ वेगाने गाडी चालवली तर उष्णतेमुळे प्रसरण पावल्याने चाकांमधला दाब वाढल्यामुळे टायर फुटून अपघात झाले आहेत. तसेच व्हील अलाइन्मेण्ट ( चाके समांतर असणे) व बॅलन्सिंग (टायरचे वजन सर्व वर्तुळात एकसारखे असणे) वर्षात एकदा तरी करावे याचा फायदा असा की टायर  ची झीज कमी होते व ड्रायव्हींग मध्ये स्थिरता अनुभवास येते, वेगात असताना ब्रेक लावला की गाडी घसरत नाही.   सरळ रेषेत थांबते. टायर रोटेशन (मागची चाके पुढे, पुढची मागे करणे) ही वर्षात एकदा तरी करावे. हवा भरताना स्टेपनी मध्ये हवा भरणे विसरू नये.  

३.   एचपी/ बीपी, गल्फ ऑइल/ कॅस्ट्रॉल  कंपनीचे ऑइल चांगले. कुलण्ट  बद्दल आठवत नाही. इंजीन ऑइल/ ब्रेक ऑइल/ गिअर ऑइल यांचा दर्जा व पातळी अधून मधून तपासावे. गाडी पार्क करतो तेथे जमीनीवर ऑइल चे डाग दिसतात का या कडे लक्ष ठेवावे, दिसल्यास गळती कुठून होते आहे ते शोधून बंद करावी. वर्षात एकदा तरी ऑइल बदलावे सोबत फिल्टर ही बदलावा.

४. ऍक्सिलरेटर दाबून ही गाडी पुरेसा वेग घेत नसेल(हॅण्डब्रेक दाबला नसून ही)  तर ते क्लच प्लेट खराब होत आल्याचे लक्षण आहे. हे चढाव आल्या वर घाटात अधिकच लक्षात येते. फार खराब होण्या आधी काम करायला हवे.

ब्रेक बद्दल लिहायचे म्हणजे चारही चाकांचे ब्रेक सारख्याच प्रमाणात लागायला हवे नाही तर गाडी सरळ रेषेत थांबत नाही, घसरते. या साठी ब्रेक ची यंत्रणा तपासून पॅडस बदलणे/ ब्रेक किट बदल अशी कामे करावी लागतात. येथेही चाकांवर आतल्या बाजुला ब्रेक ऑइल चे ओघळ आहेत का ते अधून मधून तपासावे. माझ्या बाबतीत ब्रेक ऑइल ब्रेक पर्यंत वाहून नेणाऱ्या नळ्या गंजून फुटल्या व ब्रेक फेल झाले होते नशिबाने वाचलो.

५. क्लच दाबला की इंजीन  गियर पासून मोकळे होते. वेगात असताना ब्रेक दाबताना सोबतच क्लच दाबला तर जास्ती आर पी एम ला फिरणारे इंजीन एकदम मोकळे होउन तसेच जास्त   वेगात फिरत राहिल   व इंधन वाया जाईल म्हणून तसे करू नये. पण गाडीचा वेग कमी झाल्यावर गियर बदलणे भाग आहे त्यावेळी क्लच दाबावा लागेलच याचा अंदाज तुम्हाला हळुहळू येइलच.

६. गाडीचा वेग  गियरने कण्ट्रोल करणे ही अनुभवाने शिकण्याचीच गोष्ट आहे, वारंवार तसे केल्यास अर्थातच झीज अधिक होइल पण आणीबाणीच्या परिस्थितीत त्याचा उपयोग होतो (जसा मला ब्रेक फेल झाले तेव्हा झाला. )

अन्य छोट्या गोष्टी  म्हणजे फ्युजबॉक्स हा सुकाणू(स्टियरिंग) च्या दाराकडिल बाजुला खाली असतो. त्यात वेगवेगळ्या क्षमतेचे अनेक वितळतार (फ्युज) वेगावेगळ्या कारणासाठी असातात. ते समजून घ्यावे, गाडीमध्ये प्रत्येक क्षमतेचा एक तरी असे वितळतार घेउन ठेवावे म्हणजे तेव्हड्यासाठी मेकॅनिक कडे जावे लागत नाही.  

महत्वाचे म्हणजे विद्युतघट (बॅटरी)!! अधून मधून तपासायला हवी. अल्टर्नेटर नीट काम करणारा असावा ( गाडी थांबलेल्या स्थितीत ऍक्सिलरेटर दाबला तर गाडीचे दिवे आतील/बाहेरील प्रखर होत असतील तर ठीक. ) गाडी चा वापर होत नसेल तर आठवड्यात एकदा तरी जागीच नुस्ती १० मिनिटे सुरू करून बॅटरी चार्ज्ड ठेवावी.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाडी वापरावी, वापरात नसलेली गाडी जास्त महाग पडते. उंदीर वायरी कुरतडतात.

तुम्हाला व हे वाचणाऱ्या सर्वांना उत्तम वाहनसुखासाठी शुभकामना.!!