मी जरा ताजीतवानी होऊन येते!

तीन चार महिने झाले की माझी चुळबूळ सुरू व्हायची. चार महिने म्हणजे खूप झाले. विनायकला सांगायचे मी जाऊन येते रे पुण्याला. खरे तर मुंबईवरून पुण्याला जाणे म्हणजे काही खूप लांब जाणे नाही, अगदी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याइतपत जवळ आहे. ही चार पाच दिवसांची ट्रीप म्हणजे जाताना जितका उत्साह तितकाच किंवा त्याहूनही अधिक उत्साह मला येताना असायचा. खूप फ्रेश होऊन यायचे मी. बॅग पण छोटी सुटसुटीत असायची. ही छोटी बॅग भरताना पण मला भारी उत्साह असायचा. जाता येताना डेक्कन एक्सप्रेस ठरलेली असायची. रेल्वेमध्ये ही एक छान सोय असते. बायकांचा एक वेगळा डबा असतो. आपण एकटे जरी असलो तरी इतर बायकांच्या गप्पा आपल्या कानावर पडतात. ऐकून करमणूक होते आणि प्रवासही छान होतो.

पंजाबी ड्रेस घालून, गळ्यात एक पर्स लटकवून व बॅग घेऊन मी डेक्कनमध्ये प्रवेश करायचे. गाडी सुटताक्षणी कानातले गळ्यातले सेट घेऊन विक्रेते यायचे. हा एक छान टाईमपास असतो. तीन चार चौकोनी बॉक्स असायचे ते सर्व बायकांमध्ये फिरायचे इकडून तिकडे. हे बघण्यात पण छान वेळ जातो. खिडकीत जागाही कदाचित मिळायची थोड्यावेळाने. कर्जत आले की बटाटेवडे खाणे हे ठरलेले. खिडकीतल्या बायकांना विनंती करून बाकीच्या "ए माझ्यासाठी घे गं पटकन" अशा सांगायच्या. मग खिडकीतून हळूच बटाटेवडे घेऊन ते बायकांकडे द्यायचे व पैसे बटाटेवडेवाल्याकडे. सगळ्यांचे मग बटाटेवडे व त्यावर कॉफी चहा वगैरे सुरू व्हायचे.

सर्व बायका थोड्या स्थिरस्थावर होऊन मग "तुम्ही कुठे निघालात? " "कोणत्या स्टेशनवर उतरणार? शिवाजी नगर की स्टेशन? " "मुंबईत कुठे राहता? " अशा थोड्या गप्पा टप्पा सुरू व्हायच्या. नंतर घाटातले सृष्टीसौंदर्य पाहण्यात खूप मजा यायची. घाट पाहता पाहता मनातच "हं आता तासाभरात येईलच शिवाजी नगर" कधी एकदा पुणं येतंय आणि मी आईकडे जाते असे होऊन जायचे मला. शिवाजी नगरला उतरायचे मी. स्टेशन येताक्षणी अगदी लगेचच उतरायचे. भराभर जिना चढून पूल ओलांडून पलीकडच्या पायऱ्या पण अगदी पटापट उतरायचे. मला अजिबात धीर नावाचा प्रकार नाही. असे भराभर चालून गेले की मग शिवाजी नगरला पटकन रिक्षा मिळते नाहीतर नंतर थोडे कठीण होऊन बसते.

रिक्षात बसल्यावर पण किती ही रहदारी! केव्हा येणार घर! असे मनातल्या मनात पुटपुटायचे. आईच्या घरासमोर रिक्षा थांबली रे थांबली की हातातले पैसे देऊन धावतच बॅग टाकून आईला आवाज द्यायचे आले गं मी! आई पण लगेच म्हणायची आलीस का! आम्ही वाटच बघतोय! चल लगेच हात पाय तोंड धुऊन घे. जेवायलाच बसू या. मी आमटी गरम करत ठेवते. का आधी चहा ठेवू? " नको चहा नको. माझे खाणेपिणे झाले आहे मधेवाटेत" इति मी. जेवायलाच बसूया लगेच. मला खूप भूक लागली आहे. जेवता जेवता "आई तुझ्या हातचं जेवायला किती चांगलं वाटतं गं!! एकीकडे गप्पा सुरू व्हायच्या लगेच आमच्या. जेवल्यावर बहिणीला फोन. ती पण लगेच ऑफिस सुटल्यावर घरी यायची आणि सई पण माझी भाची! मग आमच्या तिघींची जी टकळी चालू व्हायची ती अगदी मी निघेपर्यंत! बडबड करून डोके दुखायला लागायचे. रात्री झोपताना पण "आता झोपू या हं १२ वाजून गेलेत, सकाळी उठवत नाही मग" आई म्हणायची. ५ ते १० मिनिटेच शांत जात असतील. परत कुणाला तरी काहीतरी आठवायचे की परत वटवट सुरू.

आईकडे गेल्यावर एक दिवस चतुर्श्रुंगी व कमलानेहरू पार्क हे कार्यक्रम ठरलेले. चतुर्श्रुंगीला देवीचे दर्शन घेतल्यावर पुढे एक गणपतीचे देऊळ आहे तिथेही जायचो. या दोन ठिकाणी जाऊन आले की मन प्रसन्न व्हायचे. कमला नेहरू पार्कला तर खूपच मजा यायची. सई जायची घसरगुंडी खेळायला. बाबा पार्कला एक चक्कर मारून यायचे व येताना सईला परत घेऊन यायचे. तोपर्यंत आम्ही तिघी म्हणजे आई, मी, माझी बहीण हिरवळीवर बसून निवांत गप्पा मारत बसायचो. तिथे आमच्या ओळखीचा एक भेळपुरीवाला व पाणीपुरीवाला होता. तिथे मनसोक्त खादाडी करायचो. भेळपुरी, पाणीपुरी, दहीबटाटापुरी व रगडा पॅटीस. जाताना व येताना आईबाबा व सईला रिक्षेत बसवून द्यायचो. त्यामुळे आम्हा दोघी बहिणींच्या वेगळ्या गप्पा व्हायच्या. रिक्षेत बसल्यावर आई बजावायची, " लवकर या बरं का! "  आम्ही दोघी "हो गं आई. " आम्ही दोघी मुद्दामूनच रमत गमत यायचो कारण की तोच वेळ आमच्या दोघींच्या गप्पांसाठी असायचा! या दोन कार्यक्रमांच्या आधी १-२ दिवस मी सासरी जाऊन यायचे. तिथे माझी जाऊ व पुतणी सायली माझी वाटच पाहात असायच्या कारण की आमच्या तिघींचाही कार्यक्रम ठरलेला असायचा तो म्हणजे तुळशीबाग व पुष्करिणी भेळ!!

मुंबईला परत निघायच्या दिवशी मी थोडे लवकर जेवायचे. नंतर एक छोटी डुलकी काढून साबणाने स्वच्छ तोंड धुऊन पावडर कुंकू लावायचे. तोपर्यंत आईचा चहा व्हायचा. चहा घेऊन आजीआजोबांच्या फोटोला व आईबाबांना नमस्कार करून निघायचे. निघताना आई हळदी कुंकू लावायची. सोबत डिंकाचे लाडू, साजूक तूप, थालीपिठाची भाजणी, मेतकूट काही ना काही द्यायचीच!! मुंबईला निघताना मी एकदम फ्रेश असायचे. बहीण भाची किंवा कधी कधी आईबाबा मला सोडायला यायचे पुणे स्टेशनवर. पुणे स्टेशनला बसायला जागा मिळायची. गाडी सुटल्यावर  जे कोणी सोडायला येणार असेल त्यांना हात हालवून टाटा करत राहायचे मी खिडकीतून ते दिसेनासे होईपर्यंत!

गाडी सुरू होऊन फलाट सोडायची. आता मात्र थोडे अश्रू वाहायचे डोळ्यातून. थोड्यावेळाने चहा यायचा. चाय चाय! गरम चाय!...... कितने को दिया?..... गाडीनेही भरपूर वेग घेतलेला असायचा.

शु. चि. वापरला आहे.