भा.रा.भागवत

लहानपण म्हणल्यानंतर अनेक सुरेख आणि गोड आठवणी मनात येऊ लागतात.आई, बाबा,
आज्जी, आजोबा,काका.मामा, भावंडे ह्यांच्या बरोबरचे दिवस आठवतात.शाळेतले
सोबती, अभ्यास, शिक्षक आणि शिक्षाही आठवतात.त्याचबरोबर येते दिवाळीची आणि
मे महीन्यातली सुट्टी आणि सुट्टीत केलेले उपद्व्याप आणि गमती जमती.ह्या
सगळ्यांबरोबरच एक नाव हटकून मनात यायच....अजूनही येत, ते म्हणजे
भा.रा.भागवत.
भा.रा.भागवतांनी माझ्या सारख्या अनेक मुलांच्या सुट्ट्या
सोनेरी बनवल्या आहेत.कित्ती कित्ती लिहिल त्यांनी आमच्या साठी. फास्टर
फेणे तर २/३ पिढ्यांचा लाडका असेल.त्या शिवाय बिपिन बूकलवार, नंदु नवाथे
हे वेगळेच.एवढ कमी होत म्हणून की काय त्यांनी अनेक परकीय कथातील साहीत्य
मराठीत आणल.जुल्स व्हर्नच्या कादंबऱ्यांचे किती सुरेख अनुवाद केलेत
त्यांनी. सुर्यावर स्वारी, मुक्काम शेंडेनक्षत्र, चंद्रावर
स्वारी,झपाटलेला प्रवासी अबबबब!!!यादी तरी किती द्यायची? मुळातच त्यांनी
मुलांसाठी इतक लिहिलय की विचारू नका, आणि किती सुरेख, किती छान!!
खजिन्याच्या बेटावर संजु राजु असो, कि ब्रह्म्देशातला खजिना असो, भुताळी
जहाज असो, कि जयदीप ची जंगल यात्रा असो, त्यांच्य लिखाणातील ताजेपणा,
टवटवीतपणा कधीही लोपला नाही. त्यांच पुस्तक उघडल की लगेच त्यांच्या त्या
दुनियेत रमायला होत! सगळ विसरून स्वत:ला हरवून जायला होत.
जुल्स
व्हर्न, एच.जी.वेल्स आदि लेखकांच्या विज्ञान कथांचे त्यांनी मराठीत जितके
सुरेख अनुवाद केले, तितकेच सुरेख अनुवाद होम्स कथांचे केले.सर आर्थर कोनन
डॉयलचा हा जगद्विख्यात मानसपुत्रही भारांच्या लिखाणतूनच ओळखीचा झाला.
जयदीपची जंगलयात्रा, भुताळी जहाज, ब्रह्मदेशातला खजीना,खजिन्याच्या बेटावर
संजु राजु ह्या साहसकथा कित्ती वेगळ्या आणि अद्भुतरम्य वाटतात. त्यांची
पात्र काल्पनिक होती पण शेवटी ती माणसच होती, त्यामुळेच अव्वल
कथालेखकांच्या पात्रांना असतात तशा विविध छटा त्यांच्या पात्रांना होत्या.
खजिन्याच्या बेटावर संजु राजु मधला दुष्ट परंतु संजु विषयी मायेचा ओलावा
असणारा किल्वर, किंवा थापेबाजीची आणि कल्पना रंगवण्याची आवड असलेला नंदु
नवाथे ही पात्र वेगळी आहेत.
अनेक वर्ष भा.रा.भागवत अखंडपणे मुलांसाठी
लिहीत राहिले. त्यात कधीच खंड पडला नाही. दर वर्षी ऊन्हाळ्याच्या आणि
दिवाळीच्या सुट्टीत त्यांची पुस्तके येणार हे ठरलेले असायच आणि तितक्याच
उत्कंठेने बाल वाचक वाचणार हे ही ठरलेल असायच.
भा.रा. गेल्याला फार
काही वर्षे लोटली नाहीत. सध्या एतद्देशियांना हॅरी पॉटर नामक एक वावटळीने
झपाटलय. त्या पासून स्फुर्ती घेऊन परिसंवाद झाले आणि मराठीला एक जे के
रोलिंग हवा असा सुर निनादला..पण त्यातल्या कोणालाच भागवतांची आठवण आली
नाही ही दुर्दैवाची गोष्ट!!!दुर्दैव भागवतांच नव्हे तर त्या विचारवतांच,
कि त्यांना भागवतांनी काय करुन ठेवलय ह्याची आठवणच राहीली नाही.
अजूनही
जर आपण डोळे उघडून पाहील तर आपल्याला भारांनी लिहीलेली बाल साहित्यातील
अनेक लेणी दिसतील आणि आपण आपल्या पोरांना आपल फा.फे.ऐकवत मोठ करू. दु:ख
हॅरी पॉटर पॉप्युलर असल्याच नाही.तो छानच आहे, दु:ख हे की आम्ही आपल्या
फाफे ला विसरून पॉटर मागे धावतोय.परदेशात, ऍलिस इन वंडरलँड अजूनही
आहे.तीची पारायण केली जातात, आपल्याकडे एक क्षीणसा प्रयत्न ही होत नाही.
जाऊ दे!!!!!.
भारांनी
रॉबिनहूड च्या प्रस्तावनेत लिहिल होत,चि.लविन्द भाक्कल भागवत ह्यास त्याचा
आवडता लोबिनहोड,त्या लविन्दप्रमाणेच अनेकांना भागवतांच्या लेखणीतुन उतरलेल
साहित्य वाचायला मिळो हीच सदिच्छा.