पूर......

गडडोंगर

कधी नव्हे ते ह्या वर्षी दिवाळीला १० दिवसांची रजा मिळाली. ४-५ दिवस दिवाळसण, नातेवाईक, मित्र यामध्ये कधी गेले ते कळलेच नाही. मग मात्र सुट्टी रेंगाळायला लागली.

एक दिवस सकाळी असाच गावातल्या शाळेत चक्कर टाकून येऊ म्हटलं. बरेच वर्ष झाले शाळेकडे गेलो नव्हतो. एकटाच शाळेकडे निघालो.

शाळेची इमारत गावकुसाबाहेर अंतरावर होती. शाळेत पोहोचलो. शाळा भव्य इमारतीमध्ये रूपांतरित झालेली होती. लांबच लांब इंग्रजी 'सी' आकाराची बिल्डिंग होती. सभोवताली कपांउंड वॉल बांधून छान रंगवलेली आहे. आतल्या बाजूला अनेक छान छान सुभाषितं लिहिलेली होती. भिंतीलगत ओळीने झाडे लावली आहेत. एकदोन वर्गांमध्ये दहावीचे जादा तास चालू होते. इमारतीच्या दर्शनी भागात उंचावर सुंदर अक्षरात 'शारदा विद्यालय'चा बोर्ड झळकत होता.

'शारदा विद्यालय' हा बोर्ड पाहिल्याबरोबर मी भूतकाळात गेलो. दहावीला सहामाही परीक्षेच्या वेळेस आलेल्या पुराच्या आठवणी जाग्या झाल्या. पुरात माझ्या डोळ्यादेखत वाहून चाललेली 'शारदा' मला दिसायला लागली.

त्या वर्षी मी दहावीला होतो. सहामाही परीक्षा संपत आली होती. शेवटचा गणिताचा पेपर तेवढा बाकी होता.

आदल्या रात्री संध्याकाळपासून पावसानं सारखी रिपरिप लावली होती. मध्येच एखादी जोराची पहाळी येऊन जाई. कौलांवर ताडताड आवाज होई. लवांचा वेगही वाढत जाई. मध्येच कौलांमधून एखादा गार वाऱ्याचा सपका तुषारांसह अंगावर येई व सर्वांगावर काटा येई. बाहेर काळागुडुप अंधार पसरला होता. वारा भणाणा करीत वाहत होता. वाऱ्यावावधानामुळं लाइट गेलेली होती.

मी मित्राकडे अभ्यासाला गेलो होतो. अंथरुणावर मधोमध डब्यावर कंदील ठेवून, अंगावर गोधडी पांघरून पाटीवर गणितं सोडवायचा आमचा उद्योग चालू होता.

सगळीकडे सामसूम झाली होती. मध्येच एखादा कुत्र्याचा भुंकण्याचा अंधुकसा आवाज येई. असा बराच वेळ आमचा अभ्यास चालू होता. पेंग यायला लागली म्हणून आम्ही बाहेर आलो, धार मारली. किती वाजले म्हणून वर आभाळाकडं पाहिले. आभाळ ढगांनी गच्च भरलं होत. त्यामुळं तिकांडं काही दिसलं नाही. झोप जोरात येत होती म्हटल्यावर साडे अकरा-बारा तरी वाजले असावेत.

पहाटे लवकर उठून बराच वेळ अभ्यास करून, तांबडं फुटल्यावर मी घरी गेलो. आन्हिक उरकून, दुधभाकरीचा काला खाऊन शाळेला निघालो.

तेव्हा आमच्या गावात ४थी पर्यंत शाळा होती. ५वी ते १०वी हायस्कूलसाठी आम्हाला शेजारच्या गावात जावे लागे. आमच्या गावापासून साधारणपणे ४-५ किमीचे अंतर असावे. आमच्या गावालगतच एक दरी ओलांडून, डोंगराच्या पोटाने काही अंतर पुढे गेल्यावर अजून एक मोठा ओढा पार करून, एक डोंगर चढून जाऊन, पठारावर अंदाजे २ किमी चालल्यावर आमची शाळा येत असे.

गावालगतच्या ओढ्यावर पाझरतलाव बांधलेला आहे. शाळेत जाताना तलावाच्या भिंतीवरून जावं लागे. रात्रभर चालणाऱ्या पावसाने तलाव भरत आला होता. एक फूट पाणी कमी होत सांडीवाटे वाहायला.

तलावाची भिंत ओलांडून आम्ही पुढे चाललो होतो. दररोजची चिकन पायवाट आज पावसाने माती वाहून गेल्याने बरीचसी खडबडीत झाली होती. बारीक बारीक खडे अनवाणी पावलांना टोचत होते. डोंगर धुवून काढल्यासारखे स्वच्छ दिसत होते. आमुनी, एखळ, गंध्यारी, करवंदीच्या जाळ्या, मोरइ, सालइ, साग, धावड्याची झाडं शुचिर्भूत झाल्यावाणी वाटत होती. वाऱ्याबरोबर गवताच्या लाटाच्या लाटा पळत होत्या, आणि त्या लाटांच्या मागं चमकी उधळल्यासारखं सगळं रान चमकत होतं.

पुढे गेल्यावर दुसरा ओढा लागला. गढूळ पाणी खळाळत वाहत होत. पोटऱ्यांपर्यंत पाणी होत. ओढा ओलांडून सहजगत्या आम्ही पुढे गेलो. मुलं-मुली टोळक्या टोळक्याने चालले होते. कुणी चेष्टा-मस्करी करीत चालले होते. कुणी चालता चालता दप्तर खांद्याला अडकवून, फडक्यात बांधलेली भाकर हातावर घेऊन खात होते. कुणी आजच्या पेपरचा अभ्यास करत चालले होते.

दररोजचा आमच्या पायवाटेतला ओळखीचा ओढा एवढा खुनशी पण आहे. हे आम्हाला कधीच वाटलं नव्हत, पण पुढे आमच्या नशिबात वेगळंच संकट वाढून ठेवलेले होत.

आम्ही सर्व मुलं शाळेत पोहोचलो. प्रार्थना झाली. प्रार्थनेला आज विद्यार्थी कमी दिसत होते. प्रार्थना झाल्यावर आम्ही ज्याच्या त्याच्या वर्गात जाऊन बसलो. पेपर घेऊन येणाऱ्या सरांची वाट पाहत बसलो. बराच वेळ झाला तरी सर आले नाहीत. मग मुलांनी गोंधळ करायला सुरुवात केली. असा बराच वेळ मुलांनी गडबड-गोंधळ घातल्यावर अखेर सर आले. त्यांच्या हातात प्रश्न-उत्तर पत्रिका यापैकी काहीही नव्हते. मोकळे हात हालवीत सर आले होते.

प्रथम सरांनी सर्वांना शांत बसायला सांगितले. थोडावेळ सर्व वर्गावर शांतपणे नजर फिरवली, संपूर्ण वर्गात शांतता पसरली. मग त्यांनी संथपणे बोलायला सुरुवात केली.
" रात्रभर पाऊस पडल्यामुळे व ओढ्यांना पूर आलेला असल्यामुळे आजूबाजूच्या बऱ्याच गावातील विद्यार्थी आज परीक्षेला येऊ शकले नाहीत. गैरहजर संख्या जास्त आहे. त्यामुळे आजचा पेपर रद्द केला आहे. हा पेपर दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर घेण्यात येईल. " अस सांगून सर वर्गाबाहेर निघून गेले.

आणि मग वर्गात एकच कल्लोळ उसळला. सर्वांनी दप्तरं काखेत मारून वर्गाबाहेर धूम ठोकली. आम्ही पळतच घराकडे सुटलो.

दमगीर होऊन आम्ही ओढ्याजवळ पोहोचलो. सकाळी खळखळाट करून वाहणारा ओढा आता कर्कश आवाज करीत वाहत होता. पाण्याची पातळी वाढली होती. ते फेसाळणारं लालभडक पाणी मध्येच उसळ्या मारीत होत. आमच्या मागून आलेल्या सर्व लहान-मोठ्या मुलांना आम्ही थांबवून घेतलं. त्यांना सांगितलं की मोठी मुलं पहिल्यांदा मानवी साखळी तयार करून, खालच्या बाजूला उभे राहतील, मग तुम्ही साखळी धरून पलीकडे जायचे आहे. आमच्यातील मोठ्या मुलांनी प्रथम पाण्याचा अंदाज घेण्याचा निर्णय घेतला. ओढ्याची रुंदी साधारणपणे पंधरा फूट होती. मग आम्ही सहा जण हातांची साखळी करून अंदाजा अंदाजाने एकामागे एक पाण्यात शिरलो. पाणी आमच्या गुडघ्यांच्याहीवर उसळ्या मारीत होत व वाहताना जोरात धक्का मारीत पुढे जात होत. हळूहळू पाण्याची पातळी वाढत होती. खांद्यावर अडकवलेल्या दप्तरात पाणी जात होत. पायाखाली अंदाज घेत एकामागे एक आम्ही पुढे जात होतो. पहिला पाण्यात गेलेला मुलगा हळूहळू ओढ्याच्यापलिकडे गेला, चार जण मुख्य प्रवाहात पाय रोवून, एकमेकांना आधार देत उभे राहिलो, एकजण अलीकडच्या बाजूला राहिला. साखळी तशीच ठेवून प्रथम सर्वांची दप्तर ओढ्यापार केली. काही छोट्या मुलांना हातोहात/खांद्यांवरून पलीकडे सोडले.

अलीकडच्या बाजूला उरलेल्या मुला-मुलीच्या मानवी साखळ्या बनवून, आम्ही उभे होतो त्याच्या वरच्या बाजूने त्यांना ओढा पार करायला सांगितले. ५-६ मुला-मुलींचा एक ग्रुप, असे ५ ग्रुप तयार झाले. एकेक ग्रुप सावकाशपणे पायाखाली अंदाज घेत ओढा ओलांडत होता. असे चार ग्रुप सुखरूप पलीकडे गेले. आता शेवटचा ग्रुप फक्त बाकी होता. त्यात सर्व मुली होत्या. त्यांनी बाचकतबिचकतच पाण्यात पाय टाकला. सावकाशीनं त्या पलीकडे सरकत होत्या. शेवटच्या दोन मुली मुख्य प्रवाहात असतानाच वरतून पाण्याचा मोठा लोंढा धावत आला आणि काही कळायच्या आतच त्या शेवटाला असणाऱ्या दोन मुलींचे हात सुटले, साखळीतून त्या अलग झाल्या. काठावरच्या मुलामुलींनी एकच गागाट केला. गेल्या....... सुटल्या....... धरा..... पकडा असे आवाज आले. कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळ्या ऐकू आल्या. क्षणार्धात दोन्ही मुली आमच्या साखळीवर येऊन आदळल्या. आजूबाजूच्या मुलांचे हात सोडून देऊन डोळ्याच पातं लवत न लवत तोच झडप घालून मी एका मुलीला पकडले, पण हात सोडल्यामुळे माझा तोल गेला नि मीसुद्धा दानकण पाण्यात आदळलो व जोरात खाली वाहायला लागलो. माझ्या नाकतोंडात पाणी गेलं होत. दोन-चार गटांगळ्या खाऊन पंधरावीस फुटावर जाऊन आम्ही कडेला लागलो. एका हाताने ओढ्याच्या कडेचा पारसा मी घट्ट धरून ठेवला. ( खरं तर पारस्याच झाड म्हणजे एकदम ठिसूळ. पण त्या दिवशी कदाचित आम्हाला जीवदान देण्यासाठीच तो भक्कमपणे उभा राहिला असावा) दुसऱ्या हाताने त्या मुलीचा हात मी पकडलेला होता. तिला मी जोरात ओरडून पारसा पकडायला सांगत होतो पण ती काहीही ऐकण्याच्या पलीकडे गेली होती. तोपर्यंत पलिकडेला अगोदर पोहोचलेल्या मुलांनी आरडाओरडा करत काठाला आमच्या जवळ गर्दी केली होती. पाणी आम्हाला प्रवाहात ढकलायचा प्रयत्न करत होत. मी पारस्याला पॅक धरून ठेवलं होत. मुलांनी प्रथम त्या मुलीला (सरिताला)डोक्याला, कपड्यांना धरून फरफटतच बाहेर ओढले. मग मलाही तसंच बाहेर घेतलं.

दुसरी मुलगी तिचं नाव शारदा होत. साखळीत माझ्या एका बाजूला मुकुंदा, माझा वर्गमित्र होता. मी साखळी तोडल्यामुळे त्याचा एक हात रिकामा झाला होता. त्याने शारदाला एका हाताने पकडायचा प्रयत्न केला, त्यात तीच्या डोक्याची एक बट फक्त त्याच्या हातात आली आणि पाण्याच्या लोंढ्याबरोबर शारदा वाहत गेली.

मी बाहेर आल्यावर ओढ्याच्या कडेने मुलं पळताना दिसली म्हणून विचारल्यावर त्यांनी मला वरील घडलेला प्रकार सांगितला. मग आम्हीही सगळे तिकडे पळायला लागलो. ओढ्याच पाणी भन्नाट वेगाने वाहत होत. शारदा आमच्या कितीतरी पुढं निघून गेली होती, तिला पकडणं शक्य नव्हत तरी आम्ही सर्वजण धरा... पकडा अस ओरडत काठाने पळत होतो. काही क्षण ती पाण्यावर वाहताना दिसे, मग मध्येच गायब होत असे. परत ती पाण्यावर दिसे परत अदृश्य होई. पण हे काही मिनिटेच..... त्यानंतर ती आम्हाला दिसलीच नाही. तरीही बराच वेळ आम्ही पळतच होतो.....

तोपर्यंत गावातून बरेच बाया, गडीमाणसं, पोरी, पोरं, म्हातारे लोकं पळत आले होते. (पहिल्यांदा छोट्या मुलांना आम्ही पलीकडे सोडल्यावर, हि मंडळी धुमाट पळत गावात गेली आणि पुराची बातमी सर्वांना सांगितली, त्यामुळे झाडून सगळं गाव पळत आलं होत. ) सगळेच काठाने खालच्या बाजूला पळत होते.

आता माझ्या डोळ्यासमोर अंधार व्हायला लागला होता. सर्व अंग ठणकत होत आणि डोक्यात सण्णकन सणक मारून येत होती. मी तिथच जाग्यावर बसकण मारली. क्षणभर डोळे झाकून घेतले. मला ग्लानी आल्यासारखं वाटत होत. मी उठून परत चालायला लागलो. तेवढ्यात माझा मोठा भाऊ तिथं आला आणि कावराबावरा होऊन माझ्याकडे बघायला लागला. त्यानं विचारले " कपाळाला काय लागलंय तुझ्या? दप्तर कुठय तुझं??

मला काही समजेना, तो काय म्हणतोय ते. त्यानं परत दरडावून मला विचारलं ' कपाळाला भली मोठी खोक पडलीय तुझ्या, काय झालं? '

मग मी कपाळाला हात लावला, पाहतो तर माझा सबंध तळहात लालभडक रक्ताने माखला होता. मघाशी ओढ्यात पाण्याच्या दणक्याने पडलो तेव्हा माझा कपाळमोक्ष झाला होता आणि दहा-पंधरा फूट पाण्यात आदळत वाहत गेल्याने सगळ्या अंगाला सडकून मार बसला होता.

हा माझा भाऊ एकदम गरम डोक्याचा प्राणी, त्याला मी फार घाबरायचो. मला काय बोलाव तेच सुचेना. तरी मी अडखळत सांगायला लागलो 'मी...... ती पोरगी..... वाहून चालली होती...... '
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच फाssssडकण माझ्या कानफटात बसली आणि शब्द ऐकू आले ' आपलं, आपलं निघून यायचं घरी... तर बसलाय तिथ लोकांचे धुने धूत..... ' तो अजूनही काहीतरी मार्मिक बोलला... पण ते शब्द काही माझ्या कानापर्यंत पोहोचले नाहीत, कारण एवढ्या वेळात मी भेलकांडून खाली बसलो होतो.

तेवढ्यात सरिताची आई, कुणीतरी बापै गड्याने उचलून घेतलेली सरिता, अजून बरीच माणसं आमच्या बाजूला येताना दिसली. सरिताची आई उर बडवतच तिथ आली. ती मोठमोठ्याने गळे काढून रडत होती. जवळ आल्यावर तिने माझी अलाबला घेतली. कानशिलावर कडाकडा बोट मोडली. अजून कायकाय बोलत व्हती. एवढा वेळ हे सर्व पाहत असणाऱ्या आमच्या बंधूंनी मग मला पोटाशी कवटाळलं व आम्ही सगळे घराकडे निघालो.

घरी गेल्यावर आईने माझ्या कपाळावरच्या जखमेत मिस्त्री भरली. स्वच्छ धोतराच एक पटकूर फाडून पट्टी बांधली. ती जखम त्या दिवाळीच्या सुट्टीतच भरून आली पण उजव्या डोळ्याच्या भुवईवर अजूनही तो व्रण शिल्लक आहे.......

नकळत माझा हात माझ्या उजव्या भुवईवरून फिरला, तेवढ्यात मागून माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. मी मागे वळून पाहिलं. तो माझा शिक्षक भाऊ होता...... आता गावात हायस्कूल झाले आहे. हा भाऊ दहावीला इंग्रजी शिकवतो. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये इंग्रजीचा जादा तास संपल्यावर, मी आवारात एकटाच बसलेला पाहून तो माझ्याकडे आला होता......