परतून घरी गेल्यावर, माणसे 'माणसे' होती,
डोळ्यांत ओळखीच्या का, प्रतिबिंब पोरकी होती?
मी त्याच निरागसतेने, भेटाया गेलो जेव्हा,
मज थांबवणारी तेव्हा, शांतता बोलकी होती.
भरलेली घागर हाती, बोलावे कोणासंगे?
माझेच रक्त गिळताना, रोहिणी फाटकी होती.
जे वाटत होते माझे, वाटून संपले होते,
अन आठवणींवर सुद्धा, दुसऱ्यांची मालकी होती.
चेहरे नवे हे आता, रोवून नव्या ह्या भिंती,
घुसमटली मने त्यांची, मायेस पारखी होती.
घुमणारा गंध पुराणा, कोण आहे अंधारात?
पाळण्याची दोर माझ्या, घेऊन देवकी होती.
- अनुबंध