नाही उरले ...

डोळ्यांत आसवांचे, सजणेच नाही उरले,

जगण्यांत 'हाय' आंता, जगणेच नाही उरले.

अंधार जाहला अन विकला प्रकाश त्यांनी,

स्वप्ने उजाडण्याची, बघणेच नाही उरले.

टाळून राजवाडे, पाऊस काल पडला,

निष्पाप पाखरांचे, घरटेंच नाही उरले.

झाला असा करार, कौरव नि पांडवांचा,

द्दुतात द्रौपदीचे, हरणेच नाही उरले.

साऱ्यांच माणसांचे, आयुष्य पेटलेले,

सरणावरी कुणाचे, जळणेच नाही उरले.