पावभाजी

  • उकडलेले बटाटे ३ मध्यम आकाराचे.
  • कांदा १ मध्यम
  • ढोबळी मिरची (कॅप्सीकम) अर्धी (मोठी असल्यास)
  • मटार दाणे मूठभर
  • टोमॅटो ३ मध्यम
  • पावभाजी मसाला १ टेबल स्पून
  • काश्मिरी मिर्ची पावडर १ टेबल स्पून
  • धण्याची पावडर १ टेबल स्पून
  • लसूण पेस्ट १ टेबल स्पून
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर मुठभर
  • अमूल बटर १०० ग्रॅम
४५ मिनिटे
४ ते ६ जणांसाठी

पावभाजी करण्यासाठी, भाजी चेचायला एक उपकरण मिळते ते घरात असावे.

उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
कांदा, ढोबळी मिर्ची, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
मटारदाणे वाफवून घ्या.

घरात मोठा तवा असल्यास उत्तम अथवा पसरट, छोट्या काठाचे पातेले अगर मोठ्ठा फ्राय पॅन घ्यावा.

त्यात १ टेबल स्पून अमूल बटर (न जाळता) गरम करावे. बटर गरम झाले की त्यावर कांदा परतून घ्यावा. कांदा जरा परतला की बारीक चिरलेली ढोबळी मिर्ची आणि बारीक चिरलेले टोमॅटो परतून मऊ शिजवून घ्यावे. आता त्यावर वाफावलेले मटार, बटाटे, पावभाजी मसाला, काश्मिरी मिर्ची पावडर, धण्याची पावडर, लसूण पेस्ट, चवीनुसार मिठ घालून भाजी चेचायच्या उपकरणाने सगळी भाजी चेचून एकजीव करून घ्यावी. हे करताना जरूरी प्रमाणे थोडे थोडे पाणी मिसळावे. बटर घालावे. आणि भाजी परतत राहावे. भाजी पूर्ण शिजवून बटर वेगळे होऊ लागले की कोथिंबीर घालावी. भाजी जरा अजून परतून नीट एकजीव करुन खाली उतरवावी. 

शुभेच्छा...!

ही भाजी पावा बरोबर खाण्यासाठी पाव पुढील प्रमाणे तयार करून घ्यावेत.

पाव मधून अर्धा कापून ( पण पूर्ण दोन तुकडे करायचे नाहीत) त्याला बटर लावून तव्यावर, तांबूस रंगावर, भाजून घ्यायचा.

प्लेट मध्ये एका बाजूला भाजी घेवून त्यावर चमचाभर बटर घालावे. त्याच्या बाजूला बारीक चिरलेला कांदा, लिंबाची फोड आणि भाजलेले दोन पाव असे खावयास घ्यावे.

लहान मुलांना भाजीवर चिझ किसून घातलेलेही आवडते.

 

माझा कुक.