"मेनी हॅपी रिटर्न्स"? काहीतरीच काय?

नाट्यसंपदेच्या "मेनी हॅपी रिटर्न्स" या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आज दुपारी साडेबाराला 'बालगंधर्व'ला झाला. मराठी नाट्यसृष्टीची इत्थंभूत, सांगोपांग इ माहिती मला अजिबात नाही. त्यामुळे या नाटकाच्या चमूतील कुणाचेच नाव मी कधी ऐकले नव्हते. माझा दोष.

एक मराठीचा प्राध्यापक (चिंचोलीकर पाटील), त्याची खेडवळ (अ-प्रमाण) भाषा बोलणारी बायको (जयश्री), तिचा राजकारणी भाऊ (राजा) आणि या कुटुंबाच्या जवळच्या इमारतीत राहणारी बायकोची मैत्रीण (अंजली) या चार पात्रांचे हे दोन अंकी नाटक.

नाटकाचे वर्णन निवेदकाने सुरुवातीलाच "हसवणारे आणि हसवता हसवता बोचकारणारे" असे केले. त्यामुळे चेहरा, फुप्फुसे आदि अवयव परजून तयार झालो.

नाटकाची सुरुवात मुंबईत झालेल्या दंगलीने होते. चिंचोलीकर नवराबायको घरात आहेत. दंगलीमुळे प्राध्यापक कामावर गेलेले नाहीत. ते कायम टीव्ही वा वृत्तपत्रात गुरफटलेले असतात म्हणून बायको चिरचिर करते आहे. मध्येच आपण बायकोचा वाढदिवस विसरलो असे नवऱ्याला वाटते (पण ते तसे नसते). हसू येण्यापुरेसा मसाला अजिबात नव्हता.

मग बायकोच्या भावाचे, राजाचे, आगमन झाले. तिथे तरी काही विनोदी विराम मिळेल असे वाटले, पण तिकडूनही निराशाच झाली. राजा विनोदी वाटेल असे गंभीर (किंवा गंभीर वाटेल असे विनोदी) बोलून परत गेला.

मग नवराबायकोची तणातणी झाली. कडाकडा आवाज झाले. आता चिंचोलीकर पाटील बायकोच्या कानाखाली लगावतो की काय अशी वातावरणनिर्मिती झाली. पुरुषप्रधान संस्कृतीचे बोचकारणारे दर्शन? पण त्या दोघांना 'फ्रीज' करून अंधारच झाला. नाही म्हणायला, 'फ्रीज' झालेले ते दोघे विनोदी दिसले.

परत उजेड झाला तेव्हा काही तास उलटून गेले होते. मग जयश्रीने बायकोने नवऱ्याला केक देऊन आपल्या मैत्रिणीच्या घरी पाठवले. मैत्रिणीचा वाढदिवस या घटनाक्रमाच्या दिवशीच होता म्हणे. पहिला अंक संपला.

दुसरा अंक त्या मैत्रिणीच्या घरात. प्राध्यापक केक घेऊन हजर. मैत्रिण एका जाहिरात आस्थापनेत काम करणारी, लग्न न झालेली तरुणी. ती अगदी त्याप्रमाणेच दिसली. हसायचे कारण नव्हते.

मग तिने केक कापला. प्राध्यापकाला भरवला. त्याने तिला भरवला. त्यांना हे असे करायला घरून फोन करून प्राध्यापकपत्नीनेच सांगितले आणि तिच्या घराच्या खिडकीत उभे राहून पाहिले. तिला दिसावे म्हणून हा केक-कार्यक्रम मैत्रिणीच्या घराच्या खिडकीत पार पडला.

मग त्याला अजून काहीतरी 'स्वीट' खायला देऊन अंजली "थांबा हं जरा" म्हणून अंघोळीला गेली. दिवसभराच्या चिकचिकीने वैतागली होती म्हणून (तिनेच सांगितले स्पष्टपणे).

चिंचोलीकर पाटलाला थांबायला कशाला सांगितले? तो काय टॉवेल देणार होता? हाच प्रश्न चिंचोलीकर पाटलांनाही पडला, आणि ती अंघोळे उरकून यायच्या आतच पाटीलबुवा सटकले. पण खाली पोलिसाची लाठी खाऊन (आठवा मुंबईतली दंगल) विव्हळत परतले.

तोवर अंजलीचीही अंघोळ उरकत आली होती. ती डोक्याला टॉवेल आणि अंगावर टर्किशचा गाऊन घालून दार उघडायला आली. घाईघाईत गुंडाळूनही डोक्याचा टॉवेल एखाद्या पगडबंदाने बांधल्यासारखा झोकदार होता. याबद्दल हसता आले असते, पण नाही हसलो.

मग जरा वेळ तिथेच थांबायचा निर्णय घेऊन प्राध्यापकबुवा थांबले. अंजली जाहिरात क्षेत्रात काम करणारी असल्याने ती मद्यपान नि धूम्रपान करणार हे ओघानेच आले. तिने प्राध्यापकालाही या दोन्ही गोष्टी  देऊ केल्या. खिडकीकडे नजर ठेवून त्याने त्या घेतल्या. जयश्रीचे सारखे फोन येऊ लागले म्हणून त्या दोघांनी तिचे भ्रमणध्वनी व भूस्थिरध्वनी बंद करून टाकले. त्याचा भ्रमणध्वनी तो घरीच ठेवून आलेला होता. जयश्री खिडकीतून इकडच्या खिडकीत चमचे फेकत बसते म्हणून खिडकीही बंद करून टाकली.

मग दोघांनी मिळून साधारण अडीचशे मिली वाईन प्राशन केली आणि स्वतःबद्दल दुसऱ्याला काहीबाही सांगितले. त्यात हसण्यासारखे काही नव्हते. दोघेजण मध्येच (म्हणजे कथानकाच्या आणि रंगमंचाच्या मध्येच) नाचले त्यानेच जे काही हसू आले तेवढेच. मग अंधार झाला आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी उजेड झाला. खिडकी उघडली. जयश्रीने परत चमचेफेक सुरू केली.

त्यातला एक चमचा हाती धरून प्राध्यापकबुवा घरी जायला निघाले. आधी फेकलेल्या चमच्यांपैकी दोन चमचे हातात धरून अंजलीने त्या बेताला दुजोरा दिला. नाटक संपले.

हे असे हसवतो म्हणून फसवणारे नाटक.

निर्मीती 'नाट्यसंपदा' या संस्थेची आहे. त्यामुळे नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत इ सगळे अगदी यथायोग्य होते. पण मुळात नाटकातच जीव नसेल तर ही टरफले काय करणार? नाटकाचे नाव "कशाचा कशाला मेळ नाही" हे असते तर अगदी यथायोग्य झाले असते. लेखक मनोज महाजन कदाचित मराठी धारावाहिकांसाठी संहितालेखन करीत असावेत आणि त्यातले चार भाग पिशवीत टाकून त्यांनी निर्मात्यांच्या हाती ठेवले असावेत.

दिग्दर्शक आणि नेपथ्य दोन्हीही राजेंद्र बडे यांचे आहे. त्यातले नेपथ्य दिसते, दिग्दर्शन नाही. शुभारंभाचा प्रयोग असूनही पात्रे आपापले संवाद व्यवस्थित बोलली म्हणजे तालमी तेवढ्या व्यवस्थित झालेल्या दिसतात.

पात्रांपैकी मुख्य पात्र प्राध्यापकाचे. त्याचे काम करणारे दीपक दामले यांना उंची चांगली लाभली आहे. (कोणात काय नाही हे पाहण्यापेक्षा काय आहे हे पाहावे. आशावादी दृष्टीकोन).

जयश्रीचे काम हेमांगी कवी यांनी एकदम झकास वठवले. तथाकथित खेडवळ बाईचा नोकझोक त्यांनी अप्रतिम सादर केला. त्यांची भूमिका लेखनातच कच्ची असूनही त्यांनी त्या भूमिकेला एक लोभस रूपडे दिले.

राजा झालेले शोण भोसले यांनी बहुधा 'रंगमंचावर येऊनच दाखवतो' अशी कुणाशीतरी पैज मारलेली असणार हे निश्चित. ती जिंकण्यासाठी ते रंगमंचावर आले, काही संवाद बोलले आणि पैज जिंकल्याची खात्री झाल्यावर निघूनही गेले. अजिबात त्रास दिला नाही.

अंजलीचे काम करणाऱ्या रेखा बडे पात्राच्या गरजेप्रमाणे दिसल्या बोलल्या. सिगारेट ओढताना बहुतांशी मराठी नायिकांप्रमाणेच त्यांचीही तारांबळ उडाली, त्यामुळे तीनचार झुरक्यांतच त्यांनी ते प्रकरण मिटवले. वाईन म्हणून रंगीत पाणी तेवढे त्या सराईतपणे प्यायल्या. त्यांच्या इंग्रजी उच्चारांना मात्र अगदीच मराठी झाक होती.

नवीन कलाकारांना पुढे आणण्यासाठी म्हणून 'नाट्यसंपदे'ने हा खटाटोप केला असेल तर त्यामागील हेतू निश्चितच स्वागतार्ह आहे. पण केवळ हेतू चांगला असून भागत नाही हेही त्यांना कुणीतरी सांगायला हवे.