मधुबाला - १

कै. श्री. हरिवंश राय 'बच्चन' ह्यांच्या "मधुबाला" (१९३६) ह्या कविता-संग्रहातील काही कवितांचा हा भावानुवाद आहे.

ऋणनिर्देश : मी बरेच दिवस ह्या कविता-संग्रहाच्या शोधार्थ होतो, पण अनेक दुकाने फिरूनही तो मला मिळाला नाही. हे कळल्यावर छायाताई राजे ह्यांनी निःस्वार्थीपणे मला त्यांच्याकडील प्रत दिली. ह्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ( मात्र अनुवाद पसंत न पडल्यास कृपया त्यांना दोष देऊ नये! )

मनोगतच्या धोरणांनुसार इथे अनुवादासोबत मूळ हिंदी कविता देता येत नाही. ज्यांना मूळ कविता व भावानुवाद एकत्रपणे वाचण्याची इच्छा असेल त्यांना इथे वाचता येईल.

मधुवर्षिणि,
मधुची वृष्टी कर,
वृष्टी कर,
वृष्टी कर.
 झंकारू दे कानी माझ्या
तुझ्या करांतिल चंचल कंकण,
कटिचि मेखला,
पदिचे नूपुर--,
सुवर्ण नूपुर,
'छन्‌-छन्‌' नूपुर.
मधुवर्षिणि,
मधुची वृष्टी कर,
वृष्टी कर,
वृष्टी कर.
१.
मी मधुबाला मधुशालेची,
मी मधुशालेची मधुबाला !

प्रिय मधु-विक्रेत्याला आहे,
मधुघट माझ्या पायी वाहे,
प्याल्यांची मी सुषमा आहे,

रूप न्याहाळत असती माझे
मधु-तृषार्त नयनांची माला.
मी मधुशालेची मधुबाला !

२.

जग-ज्वाळांना जो विसराया
मागे शीतल करण्या काया
ह्या निऽळ्या पदराची छाया,

मधु-मलमाचे लेपन करुनी
भरते त्याच्या उरिचा घाला.
मी मधुशालेची मधुबाला !

३.

मधुघट घेउन करता नर्तन,
मम नूपुर करता छुम-छननन
लय होते विश्वाचे क्रंदन,

झिंग येउनी मानव-जीवन
क्षण-क्षण लागे डोलायाला.
मी मधुशालेची मधुबाला !

४.

मी ह्या अंगणिचे आकर्षण,
कटाक्षांवरी मधुचे सिंचन,
वाणीतुनी टपटपती मधुकण,

मदोन्मत्त मी करते आणिक
श्रेय तरी घेते मधुशाला.
मी मधुशालेची मधुबला !

५.

पूर्वीही होती मधुशाला,
मातीचा घट आणिक प्याला,
नव्हति परंतु साकीबाला,

निरुद्योग होता विक्रेता
कपाटात ठेवुन मद्याला.
मी मधुशालेची मधुबाला !

६.

येथे त्या काळी तम होता,
भय होते, आणिक भ्रम होता,
दु:खहि होते, शोकहि होता,

दीप उषेचा शिरी घेउनी
मी आले घर उजळायाला.
मी मधुशालेची मधुबाला !

७.

स्वर्णिम मधुशाला लखलखते,
मद्य माणिकासम चमचमते,
दशदिशात अन्‌ मधु घमघमते,

करी मद्यपी घेउन प्याला
सुरा प्राशण्याकरिता आला.
मी मधुशालेची मधुबाला !

८.

मदिराघर मृत-मूकचि होते,
मूर्तिसम घट निश्चल होते,
जडवत्‌ पेले पडले होते,

स्पर्शुन मी जादुई करांनी
सचेत केले जडतत्त्वाला.
मी मधुशालेची मधुबाला !

९.

मज स्पर्शुन मधुघट आंदोले,
मधु पीण्या आतुरले प्याले,
डोळे चोळत मालक उठले,

देत पिळोखे उठुन बैसली
चिर सुप्त-विमूर्च्छित मधुशाला.
मी मधुशालेची मधुबाला !
१०.

तृषार्त आले, मी ओळखले,
झरोक्यातुनी हळुच पाहिले,
मधुपांचे ते दळ नटलेले

उत्कंठित होउन बोलले,
'वेड लाव गे, भर तू प्याला !'
मी मधुशालेची मधुबाला !
११.

द्वार उघडले मद्यगृहाचे,
घोष जाहले मम विजयाचे,
चिंतेचे ना लेश भयाचे,

आवाज एकची चोहीकडे,
'मधुप्याला दे, दे मधुप्याला !'
मी मधुशालेची मधुबाला !
१२.

हर एक तृप्तिचा दास इथे,
पण एक चीज ही खास इथे,
वाढे पिउनी हव्यास इथे,

सौभाग्य मात्र इतके माझे
देण्याने वाढे ही हाला.
मी मधुशालेची मधुबाला !
१३.

मी दिली कितीही तुज हाला,
रिचविलास प्याल्यावर प्याला,
लागलास जरि डोलायाला,

तुज सत्य सांगते मी अंतिम,
शांतणार नाही ही ज्वाला.
मी मधुशालेची मधुबाला !
१४.

इथे कोण मधु पीण्या येते?
कोणाचे प्याल्यांशी नाते?
मज पाहुनिया धुंदी चढते

ज्यांच्या तंद्रिल नयनि टाकते
मी सुखस्वप्नांच्या जालाला.
मी मधुशालेची मधुबाला !
१५.

ही स्वप्न-विनिर्मित मधुशाला,
हा स्वप्न-रचित मधुचा प्याला,
स्वप्निल तृष्णा, स्वप्निल हाला,

स्वप्नांच्या दुनियेत हरखुनी
फिरत राहतो मानव भोळा.
मी मधुशालेची मधुबाला !