मधुबाला - ३ : मधुप

कै.
श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या "मधुबाला" (१९३६) ह्या
कविता-संग्रहातील काही कवितांचा हा भावानुवाद आहे.

ऋणनिर्देश : मी बरेच दिवस ह्या
कविता-संग्रहाच्या शोधार्थ होतो, पण अनेक दुकाने फिरूनही तो मला मिळाला
नाही. हे कळल्यावर छायाताई राजे ह्यांनी
निःस्वार्थीपणे मला
त्यांच्याकडील प्रत दिली. ह्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ( मात्र अनुवाद पसंत न पडल्यास कृपया
त्यांना दोष देऊ नये!
)

मनोगतच्या धोरणांनुसार

इथे अनुवादासोबत मूळ हिंदी कविता देता येत नाही. ज्यांना मूळ कविता व
भावानुवाद एकत्रपणे वाचण्याची इच्छा असेल त्यांनी इथे पाहावे.

मधुबाला

१.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !
झंकार नूपुरांची झाली,
पीण्याची अन्‌ आली हाळी,
मग आम्हां वेड्यांची टोळी
प्रस्थानाला आतुर झाली,
मधुशालेच्या दरवाजावर
आम्ही धडकी देण्या आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

२.
सोडली करातिल जपमाला,
फेकले भू-वरी पोथीला,
मंदिर-मस्जिद कारा तोडुन
घेतला करी आम्ही प्याला
अन्‌ दुनियेला स्वातंत्र्याचा
संदेश अम्ही देण्या आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

३.
क्रोधित मोमिन तंटा करतो,
मंत्रात बद्ध पंडित करतो,
परि अम्ही न अडतो वा बधतो,
जो मार्ग निवडला, आचरतो,
पथ-भ्रष्ट जगाला मस्तीचा
आता पथ दाखवण्या आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

४.
गुपचुप हे जग पीतच होते,
त्याविण, सांगा, कैसे जगते ?
सरले ते दिन, ते युग सरले,
जेव्हा हे मज उमजत नव्हते;
साकीसंगे मदिरा पीण्या
खजिन्यास खुल्या आता आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

५.
वाटेत खोल सागर आले,
किति तुडुंब भरले नद-नाले,
किति झरे, स्रोत, निर्झर आले,
परि पाय कुठेही ना ठरले;
तव छोट्याशा प्याल्यात अम्ही
स्वत्वाला विरघळण्या आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

६.
जाणतो असे नश्वर जीवन,
नश्वर ह्या जगण्याचा क्षण-क्षण,
तरीही अमरत्वाची आशा
उरि करत राहते आक्रंदन,
नश्वरता अन्‌ अमरत्वाच्या
द्वंद्वाला संपवण्या आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

७.
दूरिल स्वर्गांच्या स्वप्नांवर
रमविले जगा आहे इथवर,
साक्षात कधी दिसले नाहित,
विश्वास कसा ठेवू त्यांवर ?
आता इथेच भू-वरती ह्या
निर्माण स्वर्ग करण्या आलो !
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

८.
घे, साकी, तू जीवन अमुचे,
भर रंग त्यात तव मस्तीचे,
व्यवहार जीवनाचा करूया,
हे स्वस्त दाम अन्‌ मुक्तीचे;
साकी, तव मदिरालयास ह्या
मी तीर्थक्षेत्र करण्या आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

९.
चिरजीवी हो साकीबाला !
चिरकाल असो मधुचा प्याला !
बेधुंद अम्हाला करणारी
वसलेली राहो मधुशाला !
अपकीर्त आजवर ती होती,
गुणगान तिचे करण्या आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

१०.
तू मुक्तकरे दिधली हाला,
मनसोक्त अम्ही प्यालो प्याला,
हे न सुटणारे कोडे की -
शांतली न का अंतर्ज्वाला ?
मद्यगृहातून पीऊनही
का तहानले जाण्या आलो ?
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

११.
भ्रम असे सुरा आणिक साकी,
पीणारा असतो एकाकी,
मज रहस्य हे कळल्यानंतर,
समजण्या काय उरले बाकी ?
जी गाठ आजवर ना सुटली,
तिजला मी सोडवण्या आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !

१२.
हे दोन पळांचे स्वप्न असे,
हे भावुकतेचे फलित असे,
भोळ्या मानवते, जागी हो,
हे सर्व दगा अन्‌ कपट असे !
पस्तावतोच प्यालाविणही,
प्राशून खंत करण्या आलो.
मधु-तृष्णा आलो भागवण्या,
मधु-तृष्णा भागवण्या आलो !