मधुबाला - २

कै. श्री. हरिवंश राय 'बच्चन' ह्यांच्या "मधुबाला" (१९३६) ह्या
कविता-संग्रहातील काही कवितांचा हा भावानुवाद आहे.

ऋणनिर्देश : मी बरेच दिवस ह्या
कविता-संग्रहाच्या शोधार्थ होतो, पण अनेक दुकाने फिरूनही तो मला मिळाला
नाही. हे कळल्यावर छायाताई राजे ह्यांनी निःस्वार्थीपणे मला
त्यांच्याकडील प्रत दिली. ह्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ( मात्र अनुवाद पसंत न पडल्यास कृपया
त्यांना दोष देऊ नये!
)

मनोगतच्या धोरणांनुसार
इथे अनुवादासोबत मूळ हिंदी कविता देता येत नाही. ज्यांना मूळ कविता व
भावानुवाद एकत्रपणे वाचण्याची इच्छा असेल त्यांनी इथे पाहावे.

मधुशाला-मालक


१.
ह्या
मधुशालेचा मालक मी,
मी मधुशाला-मालक आहे !

मधुघट, साकी, सुरा
आणले,
पेले शोभीवंत आणले,
मद्यगृहाला रूप आणले,

मधुपान करविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
२.

येऊन पहा मम
मधुशाला,
साकीबालांची अन्‌ माला,
मधुमय सुरई, मधुमय प्याला,

मी हिला सजविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
३.

सांडती मधु त्या
पिउनी, पहा,
त्यांच्या पुलकित नजरेस पहा,
स्कंधांवर चंचल बटा पहा,

धुंद त्यांस बघणारा आहे.
मी मधुशाला-मालक
आहे !
४.

मधुशोभित त्यांचे अधर पहा,
मृदु कर, कंबर कमनीय
पहा,
पद-नूपुर, कटि मेखला पहा,

मी मनास हरणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
५.

मधुघट घेउनि
चालल्या पहा,
फडफडती कैसे पदर पहा,
घुंघट झगमग हालती, पहा,

मी चित्त चोरणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
६.

त्या प्याले
चुंबुनिया देती,
मधुचे प्याले वाटत फिरती,
गजगती कधी,कधी हरिणगती,

मदमत्त
बनविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
७.

नामांकित येथे
पीणारे,
कुणी उभ्या-उभ्याही घेणारे,
बसणारे, कुणी पसरणारे,

मी सभा जमविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
८.

लालसा कुणी घेउन
येती,
उपकार कुणी घेउन जाती,
अन्‌ कुणी आढ्यतेने पीती,

सर्वां तोषविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
९.

आता चिंतांचा
भार नसे,
ह्या क्रूर जगाचा मार नसे,
काळाचाही अधिकार नसे,

मी भय
विसरविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
१०.

आता अज्ञान नि
ज्ञान कुठे,
पद-पदवीचेही भान कुठे,
वंश-जातिचा अभिमान कुठे,

समभाव निर्मिणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
११.

व्हायचे मस्त
त्यांनी यावे,
मित्रांना सोबत आणावे,
जेव्हढे हवे तितके प्यावे,

मी ’पुरे’ न म्हणणारा आहे.
मी मधुशाला-मालक
आहे !
१२.

चालूया साथीने सारे,
मातीचे तर पुतळे सारे,
उच्च-नीच
वा सत्‌-खल सारे,

मी स्वागत करणारा
आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
१३.

संकोच सोडुनी या आता,
जे मनात ते सांगा आता,
का
चिंता पैशाची करता,

मी मोफत देणारा
आहे.
मी मधुशाला-मालक आहे.
१४.

मी मद्य आग्रहाने देइन,
आशीर्वच सर्वांचे घेइन,
तोषवुन
तुम्हाला खुश होइन,

आनंद वाटणारा आहे.
मी
मधुशाला-मालक आहे.
१५.

कटु जीवनात मधुपान करा,
रुदनास जगाच्या गान करा,
मादकतेचा
सन्मान करा ─

हा धडा शिकविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !