कालाय तस्मै नम: ॥

जसा जसा काळ पुढे सरकतोय, तसं तसं जग बदलतंय.....फार बदलतंय.  मूलभूत गरजा सुद्धा बदलल्या आहेत.    आधी अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गोष्टी असल्या तरी आयुष्य निभत होतं.  ह्या शिवाय जे काही हवं असायचं,  त्या होत्या सुख सुविधा !!  आता मात्र सगळंच बदललंय.  अन्न, वस्त्र, निवाऱ्याखेरीज अजूनही खूप गोष्टी हव्या असतात जगायला आणि त्यांना सुख सुविधा म्हणून चालणार नाही.....त्या ही गरजाच झाल्या आहेत.  
इंटरनेट ही अशीच माणसानं स्वत:साठी निर्माण केलेली गरज.   आधी कॉम्प्युटर्स नव्हते तेव्हा ही आयुष्य चालत होतंच की.  पण आता जरा नेट बंद झालं की जीव अगदी कासावीस होतो.  नेट बंद झालं की एकदम आउट ऑफ टच वाटतं.  त्यादिवशी असंच झालं.  संध्याकाळी अचानक फोन बंद झाला आणि खरंच श्वासच बंद झाल्यासारखं वाटलं.   फोन बंद झाला तरी मोबाईलवरुन बोलता येतं.  पण फोन बंद झाला तर इंटरनेट पण बंद पुकारतं......त्याचं काय करावं.....!!  थोडा वेळ वाट बघितली...मग खाली जाऊन कनेक्शन बघितलं.  तरी काहीच होईना.  घरात इन-मीन-तीन माणसं.  पण प्रत्येकाचा त्या इंटरनेटशी जिव्हाळा वेगळा.  ह्यांना ऑफिसमधे वर्तमानपत्र वाचायला वेळ मिळाला नव्हता त्यामुळे वर्तमानपत्रं वाचायची होती.   शिवाय त्याच्या केमीकल इंजीनिअरिंगच्या काही नव्या साईट्स कळल्या होत्या त्या बघायच्या होत्या.  पिल्लूला फेसबुक, ऑर्कुट.....शिवाय फार्म वील मधे त्याचे क्रॉप्स हार्वेस्टिंग साठी तयार झाले होते.  मी...... माझी नुकतीच एक गझल लिहून झाली होती....ती लग्गेच कुणाला तरी दाखवायची होती.  मायबोली, मिसळपाव, मनोगत........झालंच तर सुरेश भट.इन..... सगळीकडेच टाकायची होती.  मग थोड्या थोड्या वेळाने प्रतिक्रिया बघण्याची मज्जा काही वेगळीच !!  गुगल टॉक आणि याहू चा पण तो आवाज नाही.....सगळं काही शांत.  जणूकाही सगळ्या जगाशी संपर्कच तुटला होता.  
अस्वस्थ मनानेच जेवणं झाली.....घालमेल सुरुच होती.  समोर टीव्ही सुरु होता तरी त्यात लक्ष नव्हतं.  कसंबसं झोपलो. काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं.  खरंच...किती आहारी गेलो आहोत नेटच्या हे तेव्हा जाणवलं.  मग विचारचक्र सुरु झालं.  माणसाच्या प्रगतीनं माणसाने खूप काही कमावलं पण त्याबरोबरच खूप काही गमावलं सुद्धा.  आता हेच बघा ना.  आपल्या लहानपणी कुठे होता टिव्ही, कुठे होता कॉम्प्युटर आणि नेट ?  तरीही आनंदी होतोच ना आपण.  उलट त्यावेळी एकमेकांसोबत किती छान वेळ जायचा.  किती गप्पा, थट्टा, मस्करी व्हायची.  सोबत वेळ घालवायला कुठल्याच साधनांची आवश्यकता नव्हती  त्यामुळे नकळतच आपुलकी, जवळीक वाढायची.  मिळून मिसळून सगळे सण, वार साजरे व्हायचे.
आता मात्र माणूस माणसापासून दुरावलाय.  इतका की आपल्या रक्ताच्या माणसांसाठीही त्याच्याकडे द्यायला वेळ नाहीये.  सगळ्या सुखसुविधा आहेत पण एकमेकांसाठी वेळ मात्र नाहीये.  त्यामुळे माणसं तुटत चालली आहेत.  जवळची नातीही दुरावताहेत.  कोणाकडे यायला जायला वेळ नाही.  पत्र लिहायला वेळ नाही.  त्यामुळे कितीतरी आनंदाला मुकते आहे ही पिढी.  आमंत्रण, पत्रं, पोस्टमनची वाट, भेटीचा आनंद, विरहाचं दु:ख.......काहीच नाही.  सगळं काही इमेल, फोन यावरच निभतं.  इतकं सगळं मेकॅनिकल झालंय ना....की त्यात काही संवेदनाच उरली नाहीये.   मोकळ्या हवेत खेळ, फिरायला जाणं, ते संवाद साधणं..काहीच नाही.  नवी पिढी तर इतकी घरघुशी झाली आहे ना........की ते बघून आपलाच जीव गुदमरतो.  
कधीतरी असं वाटतं नको ह्या काही सुखसुविधा.  मस्तपैकी घड्याळाच्या गजराने, रेडीओवरच्या "वंदे मातरम" ने होणारी सकाळ अनुभवावी.  सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जावं,  घरी आल्यावर आईने केलेले गरम गरम पोहे, उकरपेंडी असं खावं.  बादलीतल्या पाण्याने आंघोळ , मग शाळेचा गृहपाठ,  थोडं इकडे तिकडे उंडारुन, देवाच्या पूजेची तयारी.....आईला फुलं तोडून द्यावी....मस्तपैकी जेवून सायकलवर शाळेत जावं.  शाळेत पण दामटून अभ्यास, खेळ, कानगोष्टी, एकमेकांच्या डब्यातला खाऊ, कधी मैत्रिणींशी कट्टी तर कधी गट्टी.  रमत गमत घरी आल्यावर दूध प्यायलं की निघावं खेळायला.  फ्रीजमधल्या थंड पाण्याऐवजी ते वाळा घातलेलं माठातलं पाणी, दुपारी चारनंतर ते  "टॉक" करुन एकमेकांना बोलावणं, दिवेलागणी होईस्तोवर तुफान खेळणं......आल्यावर भूक भूक, देवासमोर प्रार्थना करुन......मग वाफाळलेलं गरम गरम आईच्या हातचं जेवण.   रात्री सगळे मिळून गप्पा.  काय मस्त दिवस होते ते ! 
आजकालच्या मुलांना मात्र हे काहीच अनुभवता येणार नाही.  अती प्रगतीनं माणसानं स्वत:चंच नुकसान करुन घेतलंय.   नव्या पिढीला आयुष्य आपल्यासारखं मोकळं, स्वच्छंदी कधीच जगता येणार नाही.   ह्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी करावी लागणारी अखंड मेहेनत.....आणि त्यामुळेच वाट्याला येणारा कमी वेळ... हे सगळं कुठे थांबणार आहे देव जाणे !!
असो......!! सकाळी बरोबर साडे नवाला फोन सुरु झाला...लगेच नेट आणि नेटवरची कामंही !!  आता कसली फुरसत मिळतेय हा विचार पुढे कंटिन्यू करायला......!  कालाय तस्मै नम : ॥