एडस

शुभक्षणी वाजली वाजंत्री
पाऊल नब्या उंबरठ्यावर
रम्य स्वप्न ते हाकेवर
अन जवळच कुत्री सुरात रडली

हरवली सुसूत्रता त्याच्या गुणांची
व्यभिचारात तो माखल्यावर
विस्कटली ती लयबद्ध स्वप्नकारंजी
मृत्यूच घोंगावल्यावर

सुन्न, भण्ण बुद्धीकेंद्र
अन हेंदकाळली आयुष्यपारंबी
हिरब्या पानांची झाली जाळी
पैलतीर हसल्यावर

संसार-संस्कारांची सालपटे
नियंत्याने सोललेली
संधी सुधारायची नाकारली
अन पार फिसकटली रांगोळी

ही लेकरे तुझी, बुद्धी तुझी
हे ऐश्वर्य तुझेच, मग चुकही तुझीच
होरपळल्या शब्दांचीच आता झोंबी
का नाही रे ऐकत देवा,
     ही तुटक्या फांदीची किंकाळी.

*नव्याने लग्न झालेल्या एका मुलीचा नवरा सहा महिन्यातच मरतो आणि मरताना तिला ह्या रोगाची देणगी देउन जातो.
   त्याला त्याचा आजार आधीपासून माहित होता. ह्या उद्वेगात ही रचना लिहीली आहे.
  कोणाला उद्देशून काहीही नाही.
  कुणाच्या भावना दुखावणे हा हेतू नाही. ज्याला एडस झाला असेल त्याचा राग, द्वेषही नाही.
  पण एक निरपराध जीव  उगिच शिक्षा भोगतो हे बघवत नाही.
  प्रकाशकांना योग्य वाटत नसल्यास कृपया प्रकाशित करू नये.