इकडे कुठे रे आज या भागात आनंदा?
आहेस चुकलेलाच तर.... ये आत आनंदा
ये, बैस आल्यासारखा..... दु:खे, चहा काही?
मीही कधी जगणार आनंदात आनंदा?
कायमस्वरूपी बांधकामे वेदनांसाठी
परवानगी नाही तुला हृदयात आनंदा
मागेन जेव्हा हात मी..... वाटेल एकाकी
दिसशील का तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदा?
अगदी सहज भेटायचे असले तरच भेटू
नाचायला लावू नको तालात आनंदा
केव्हातरी कोठेतरी रस्त्यात दिसलेलो
कोणीतरी ठेवेल का लक्षात आनंदा?
तू पाहिला होतास तो मी 'बेफिकिर' नाही
जगण्या तुझ्यावाचून आरामात आनंदा